Pune Farming News : तेलबिया म्हणून ओळख असलेल्या करडई पिकाकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. यंदा रब्बी हंगामात करडई पिकाची पुणे विभागात सरासरीच्या दोन हजार ४१६ हेक्टरपैकी एक हजार १६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ४८ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
सध्या पिकांची अवस्था चांगली असली तरी अनेक ठिकाणी पिकांची वाढ चांगली आहे. सध्या थंडीची चाहुल लागल्याने पिके जोमदार होऊ लागली आहेत. प्रामुख्याने चार महिने कालावधी असलेल्या करडईची अनेकजण नोव्हेबरपर्यत पेरणी करतात.
त्यामुळे येत्या काळात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच बदलणाऱ्या हवामानामुळे काही प्रमाणात मावा, तुडतुडे या कीडीचाही पिकावर प्रादुर्भाव झाला होता. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या एक ते दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात करडईचे सरासरी २३ हेक्टर क्षेत्र आहे.
त्यापैकी २०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ८९६ टक्के पेरणी झाली आहे असून त्यापटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात अवघी ४३ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यातुलनेत यंदा चांगली वाढ झाली होती. यंदा सर्वाधिक पेरणी एकट्या बारामती तालुक्यात झाली आहे.
या तालुक्यात २०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यातही नगर, कर्जत या तालुक्यांत करडईची काहीशी पेरणी झाली आहे. यंदा नगरमध्ये ११, कर्जतमध्ये ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही करडईविषयी महत्त्व वाढले आहे.
त्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात करडईची पेरणी झाली आहे. यंदा सर्वाधिक पेरणी अक्कलकोट तालुक्यात झाली असून सुमारे १३७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर या तालुक्यातही चांगली पेरणी झाली आहे.
जिल्हा -- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्केवारी
नगर -- ३६१ -- १९ -- ५
पुणे -- २३ -- २०६ -- ८९६
सोलापूर -- २०३२ -- ९४४ -- ४६
एकूण -- २४१६ --११६९ -- ४८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.