
अॅग्रोवन वृत्तसेवा
Jlagaon News : जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढली आहे. कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी कापणीला सुरुवात झाली आहे. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे. यंदा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक आहे.
पीक निसवण जानेवारीत झाली. सध्या पीक काही भागात पक्व होत आहे. काही भागात पीक पक्व होऊन कापणी सुरू आहे. तर अनेक भागांत पीक हिरवे किंवा कणसांच्या अवस्थेत आहे. कोरडवाहू दादर ज्वारी जोमात येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेकांची कापणी व लागलीच मळणी करून घेण्याची लगबग आहे.
खानदेशात यंदा सुमारे ३९ हजार हेक्टरवर दादर व अन्य बागायती संकरित ज्वारीची पेरणी झाली आहे. ही पेरणी मका पिकापेक्षा कमी आहे. कारण ज्वारीचे दर मागील वेळेस कमी होते. तसेच पुढे चाऱ्याची समस्या कमी राहील, यासाठी ज्वारीच्या चाऱ्यासही मागणी कमी राहील. यामुळे अनेकांनी मका व इतर पिकांची लागवड केली आहे. परंतु गिरणा, तापी व पांझरा नदीच्या क्षेत्रात अनेकांनी आपल्या कोरडवाहू क्षेत्रात पारंपरिक व चांगले उत्पादनक्षम पीक म्हणून ज्वारीची पेरणी केली होती. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढली. कारण पाऊस चांगला झाल्याने जमिनीत ओलावा होता. पेरणीत मोठी वाढ यंदा झाली नाही.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या भागात ज्वारी पीक अधिक आहे. भडगावातील खेडगाव व लगत ज्वारीचे मोठे क्षेत्र आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यात ज्वारी पीक असून, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नंदुरबार भागात ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी होती, अशी माहिती मिळाली. अनेक शेतकरी यंदा दादर ज्वारीला एकदा सिंचन केले आहे. कारण एक पाणी दिल्यास पीक आणखी जोमात येते.
ज्वारीसाठी क्षेत्र नापेर
काही कृत्रिम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी कोरडवाहू ज्वारीचे पीक क्षेत्र नापेर ठेवून घेतले आहे. अनेकांनी दादर ज्वारीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते. त्यात पेरणी बऱ्यापैकी राहिली. सध्या पीक तरारले असून पिकाची वाढ गतीने होते. उंची १२ ते १३ फूट असते. यामुळे ज्वारीच्या पिकात माचवा करून त्यावर उभारून राखण करण्याचे चित्र पुढे दिसेल, अशी स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.