Monsoon Update : मॉन्सूनवर परिणाम करणारे घटक कोणते? त्यांचा पावसावर काय परिणाम होतो?

Monsoon Effect : भारतीय मॉन्सूनवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. आधुनिक साधनांमुळे नवीन निरीक्षणे समोर येऊन त्या घटकांमध्ये वर्षागणिक भरच पडत आहे. मात्र त्यातील ‘एल निनो’ हा घटक या वर्षी अधिक चर्चेत आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा हा प्रयत्न.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Monsoon Update : पावसाचा संबंध ढगांशी आणि वाऱ्यांशी. वाऱ्याचा संबंध हवेच्या तापमानाशी. हवेची वेगवान हालचाल म्हणजे वारे. हवेच्या दाबात फरक होतो तेव्हा ही हालचाल होते. पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरते. या फिरण्यामुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर सूर्याची किरणे सरळ वा वेगवेगळ्या कोनात तिरपी पडतात.

परिणामी, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत तापमान वेगवेगळे राहते. उदा. सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात असतो, तेव्हा तिथे तापमान जास्त, तर दक्षिण गोलार्धात कमी असते. तो दक्षिण गोलार्धात असतो, तेव्हा तिथे जास्त, तर उत्तर गोलार्धात थंडी अशी स्थिती असते.

पृथ्वीवरील जमिनीचा पृष्ठभाग आणि समुद्राचे पाणी यांच्या तापमानातही फरक असतो. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, तर पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. याचा परिणाम हवेवर होतो. हवा गरम झाली की तिची घनता कमी होते आणि ती वर वर जाते, त्या वेळी त्या हवेची जागा बाजूने येणारी थंड हवा घेते, यातून वाऱ्याची निर्मिती होते.

जमिनीचे तापमान सामान्यतः सूर्यकिरणांशी संबंधित असते. मात्र समुद्राच्या पाण्याच्या तापमानावर अनेक घटक प्रभाव टाकतात. कारण समुद्रात अनेक कारणांमुळे अनेक दिशांना प्रवाह सुरू असतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमानही सगळीकडे सारखे नसते.

कोण कोणते असतात हे प्रवाह? उदा. पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्याने समुद्रात तयार होणारे प्रवाह, समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या ताकदीमुळे तयार होणारे समुद्राचे प्रवाह, सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यातल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे तयार होणारे प्रवाह, जमीन आणि समुद्र यांच्या सीमांच्या असलेल्या आकारामुळे तयार होणारे प्रवाह, सूर्याचे उत्तर व दक्षिण गोलार्धात असल्यामुळे बदलणाऱ्या तापमानामुळे तयार होणारे प्रवाह, तसेच समुद्राच्या पाण्याच्या वेगवेगळ्या क्षारतेमुळे तयार होणारे प्रवाह इ. अशा सर्व प्रवाहांमुळे हजारो किलोमीटरच्या समुद्रात पाण्याचे अनेक प्रवाह वाहत असतात.

Monsoon Update
Monsoon Rain Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल थांबलेलीच

अशा अनेक प्रवाहामुळेच समुद्राच्या पाण्याचे तापमान पूर्ण समुद्रभर कधीही सारखे नसते. समुद्राच्या दोन टोकांमध्ये तापमानाचा फरक पडल्याने जमिनीप्रमाणेच समुद्रावरही हवेच्या दाबात फरक होतो. त्यातून समुद्रावर वाऱ्यांची निर्मिती होते. या वाऱ्याद्वारे बाष्प आणि ढग वाऱ्याच्या दिशेने नेले जातात.

आता जेव्हा पॅसिफिक महासागराचा (प्रशांत महासागर) पूर्वेकडील भागाच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. त्या परिस्थितीला ‘एल निनो’ असे म्हणतात. तर हेच तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमी असते, तेव्हा त्याला ‘ला निनो’ असे म्हटले जाते.

या दोन्ही अवस्थांचा जगभरातल्या वाऱ्यांच्या दिशेवर परिणाम होतो. त्यांचा एकूणच हवामानावर व पावसावर खूप प्रभाव पडतो. भारतीय मॉन्सूनवर ही ‘एल निनो’चा विपरीत परिणाम होऊ शकतो, हा आजवरचा तरी अनुभव आहे. तसेच गेली तीन वर्षे ‘ला निना’ परिस्थिती कायम राहिल्याने भारताला मॉन्सून समाधानकारक राहिला, हे हवामान शास्त्रज्ञांचे अनुमान आहे.

‘एल निनो’ स्थिती दर दोन ते सात वर्षात कधीही घडते. त्याला काहीही नियमितता नाही. ही अवस्था नऊ महिने ते दोन वर्षे टिकते. जेव्हा ती सात ते नऊ महिन्यासाठी होते तेव्हा त्याला ‘एल निनो स्थिती’ आणि यापेक्षा याचा कालावधी अधिक असतो त्याला ‘एल निनो एपिसोड’ असे म्हटले जाते. गेल्या शतकभरात ‘एल निनो स्थिती’ तीस वेळा घडली आहे.

या एल निनोचा जीवसृष्टीवरही खूप प्रभाव पडलेला आहे. गेल्या काही हजार वर्षांचे (जीवाश्म व तत्सम) पुरावे याची पुष्टी करतात. तसेच जगातील ठिकठिकाणच्या मानव समूहांचा इतिहास, विविध मानवी संस्कृती यांचा उदयास्ताचा संदर्भही ‘एल निनो’शी जोडता येतो.

मध्ययुगीन व अलीकडच्या इतिहासातील प्रमुख घटनांचा कालखंडानुसार संदर्भ ‘एल निनो’च्या वर्षांशी जुळणार आहे. गेली काही दशके जगातील बहुतांशी हवामान शास्त्रज्ञांनी ‘एल निनो’च्या अभ्यासावर लक्ष केंद्र केले आहे. मात्र या विषयीचे पहिले निरीक्षण व नोंद इसवी सन १५०० ला झाली, तर ‘एल निनो’ या शब्दाचा उल्लेख १८९२ मध्ये पहिल्यांदा झाला.

इंडियन ओशन डायपोल’

प्रशांत महासागरातील वरील दोन्ही परिस्थितीप्रमाणेच हिंदी महासागरातील तापमान बदलाचाही भारतीय मॉन्सूनवर प्रभाव आहेच. हिंदी महासागराच्या सीमाही दक्षिण अंटार्क्टिकाला जाऊन भिडतात. तसेच पश्‍चिमेकडे आफ्रिका खंड, तर पूर्वेला इंडोनेशिया आहे. त्यामुळे या सागराच्या तापमानातही असमानता आहे.

अलीकडच्या अभ्यासातून हेही निरीक्षण नोंदवले गेले आहे, की हिंदी महासागराच्या पश्‍चिमेकडचा भाग जेव्हा त्याच्या पूर्वेकडच्या भागापेक्षा अधिक उष्ण असतो, तेव्हा भारतात मॉन्सूनचा पाऊस चांगला पडतो. ज्या वेळी याच्या उलट परिस्थिती असते,

तेव्हा मॉन्सूनची विपरीत अवस्था असते. ही परिस्थिती आलटून पालटून येत असते, यालाच ‘इंडियन ओशन डायपोल’ असे म्हणतात. या अवस्थेच्या संबंधावर आधारित हवामानाचे मॉन्सूनचे पूर्वानुमान काढले जाते.

हवामान बदल आणि मॉन्सून

पावसाचा सगळा खेळ हा जमीन व समुद्र यांच्यातील तापमान फरकावर आहे. हजारो, लाखो वर्ष या तापमानावर प्रामुख्याने प्रभाव होता तो सूर्याचा. पण औद्योगिक क्रांतीनंतर वाढत गेलेले औद्योगीकरण आणि त्यातही गेल्या पन्नास साठ वर्षांत वाढत गेलेल्या वाहनांच्या संख्येमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर वायू यांच्यात वाढ झाली. त्यामुळे हवेच्या तापमानात मोठा बदल घडत आहे.

त्यातूनच जगभरात ठिकठिकाणच्या हवेच्या दाबात होणारा फरक मोठ्या प्रमाणात अनियमित झाला आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा भरकटल्या आहेत. यातूनच मॉन्सूनची अनिश्‍चितता वाढलेली आहे. इथून पुढे ती वाढतच जाण्याची शक्यता आहे.

ढगफुटी कशाला म्हणायचे?

ढगफुटी (क्लाउडबर्स्ट) हे पावसाचे एक टोकाचे रूप आहे. क्लाउडबर्स्टची घटना पृथ्वीपासून अंदाजे १५ किमी उंचीवर घडते. खरे तर ‘ढगफुटी’ मुसळधार पावसासाठी एक वापरला जाणारा शब्द आहे. ही तांत्रिक संज्ञा नाही. एखादा पाण्याने भरलेला फुगा फुटला, तर एकाच ठिकाणी पाणी खूप वेगात पडते, अगदी तशीच परिस्थिती ढगफुटीच्या घटनेत दिसून येते.

अर्थात, ढग हे काही फुग्यासारखे किंवा पाणी भरलेले पोते नसते आणि ते फुटून अतिवृष्टी झाली असे म्हणता येत नाही. या नैसर्गिक घटनेला ‘क्लाउडबर्स्ट’ किंवा ‘फ्लॅश फ्लड’ असेही म्हणतात.

पर्वतावर पाऊस जास्त पडतो. कारण जेव्हा पाण्याने भरलेले ढग वाऱ्यासह फिरतात, तेव्हा ते पर्वताच्या दरम्यान अडकतात. पर्वतांच्या उंचीमुळे त्यांना पुढे जाता येत नाही. त्यांना अडकल्यामुळे ढग पाण्यात रूपांतरित होऊन पाऊस पडू लागतो. ढगांमधील थेंबांची घनता व वजन हवेला झेपण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने पाऊस सुरू होतो.

Monsoon Update
Monsoon Rain Update : रविवारनंतर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता

ढगफुटी म्हणजे १५ ते २० चौ.कि.मी. परिसरात ताशी १०० मि.मी. इतका वा त्याहून अधिक पाऊस असतो, त्याला ढगफुटी किंवा क्लाउडबर्स्ट म्हणतात. ही पावसाळ्यातच व विशेषतः डोंगराळ भागात होणारी घटना आहे. हल्ली काही वेळा मैदानी प्रदेशातही ढगफुटी झाल्याचे आढळले आहे, परंतु बऱ्याचदा अशा ठिकाणी पावसाचे निश्‍चित मोजमाप करण्याची सोय नसल्याने ठाम विधाने करता येत नाहीत.

ढगांचा पसारा काही किलोमीटर असतो, तसेच उंचीही काही किलोमीटर असते. काही वेळा ढग डोंगराला आदळून कोसळण्याआधी त्यांचा एक उभा ढग तयार होतो, त्याला हवामान शास्त्रज्ञ ‘उभा स्तंभ’ असे म्हणतात. हा उभा स्तंभ तयार होताना बाष्पाचे थेंब वेगाने वर जातात. जाताना अनेक थेंब एकत्र होत होत मोठे होत जातात.

या मोठ्या थेंबांनी युक्त उभ्या ढगातील थेंब वजनामुळे वेगाने जमिनीकडे झेपावतात. मग सगळा ढग खूप मर्यादित जागेत आणि मर्यादित वेळेतच रिकामा होतो. हेच ‘क्लाउडबर्स्ट’ वा ढगफुटी. सपाट प्रदेशात हेच काम डोंगराऐवजी गरम हवेचा झोत करतो. जमिनीलगत तापलेल्या हवेचा स्तंभ तयार होतो, तो ढगात घुसतो आणि बाष्प आणि थेंबांना एकत्र करीत वेगाने वर आकाशाकडे घेऊन जातो.

तेच थेंब मोठे झाल्यामुळे त्यांचा भार हवेला पेलेनासा झाला की ते जमिनीवर कोसळतात. काही काही घटनांमध्ये दोन व अधिक मोठे ढग एकत्र होऊन स्तंभ निर्मिती होऊन ढगफुटी होते. जुलै २००५ मध्ये मुंबईत सुमारे ९५० मि.मी. पावसाची नोंद झाली. मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शहरावर मोठे आसमानी संकट ओढवले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com