थोडक्यात माहिती:१. विद्राव्य खते पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि पिकांना अन्नद्रव्ये त्वरीत उपलब्ध करून देतात.२. दाणेदार खतांच्यापेक्षा विद्राव्य खते जमिनीवर परिणाम करत नाहीत.३. फवारणी, ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे देणे सोपे व कार्यक्षम आहे. ठिबक सिंचनाद्वारे ३०% खतांची बचत होते.४. योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य ग्रेड वापरल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.५. अचानक पावसामुळे आलेली अन्नद्रव्यांची कमतरता विद्राव्य खते त्वरीत भरून काढतात..Foliar Spray Fertilizers: दाणेदार खतांचा पिकाला १००% फायदा होत नाही. बाकी राहिलेली खते जमिनीमध्ये तशीच राहून मातीच्या सुपीकतेवर परिणाम करतात. या तुलनेत विद्राव्य खते पिकासाठी फायदेशीर ठरतात. ही खते अचानक निर्माण झालेल्या अन्नद्रव्यांच्या आवश्यकतेवेळी पिकांना उपयोगी ठरतात, कारण पिकांना दाणेदार खतांच्या तुलनेत लवकर उपलब्ध देखील होतात आणि मातीच्या सुपीकतेवरही परिणाम करत नाहीत. या खतांच्या वापरासंबंधी संपूर्ण माहिती घेतल्यास शेतकरी खतांच्या संपूर्ण कार्यक्षमतेने वापर करु शकतात. .पाण्यात विरघळणाऱ्या खतांना विद्राव्य खते म्हणतात. सूक्ष्मसिंचनातून आणि ठिबक सिंचनातून दिले जातात, याचसोबत फवारणीद्वारेही या खतांचा वापर करता येतो. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिल्यास खतांची ३० टक्क्यांनी बचत होते. मात्र, सध्या अनेक भागात जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलेले असल्यामुळे फवारणीद्वारे विद्राव्य खते द्यावीत, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मृदाशास्त्र व कृषि रसायन विभागाचे प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांनी दिला..Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ.फायदेही खते रासायनिक दाणेदार खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात. त्यामुळे अन्नद्रव्याचा तातडीने पुरवठा करायचा असल्यास ही खते फवारणीद्वारे देता येतात.जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणं शक्य झाले नाहीतर विद्राव्य खते फायदेशीर ठरतात.विद्राव्य खताचा वापर केल्यास खताची नासाडी होत नाही. पिकाच्या वाढीच्या काळात, फुलोऱ्याच्या काळात, फळधारणेच्या काळात, फळांच्या वाढीसाठी जेव्हा अन्नद्रव्यांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते अशा वेळेला विद्राव्य खतांची फवारणी फायदेशीर ठरते. .ही खते पिकांच्या गरजेनुसार द्यायची असतात. विद्राव्य खते पिकातील अचानक निर्माण झालेल्या अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढू शकतात जी सध्या अचानक आलेल्या पावसामुळे झाली आहे. विद्राव्य खतांमुळे जास्त मनुष्यबळाची गरज लागत नाही. विद्राव्य खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनात फायदा होतो. जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खतांमधून जमिनीवर बऱ्याचदा वाईट परिणाम होतात. मात्र विद्राव्य खतांमुळे जमिनीच्या गुणधर्म आणि सुपीकतेवर परिणाम होत नाही. .विद्राव्य खते आणि त्यांचे उपयोग१) १९:१९:१९ व २०:२०:२० (स्टार्टर ग्रेड खत)हे खत पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी खूप उपयोगी आहे. हे पिकाला भरपूर पोषण देऊन शाखीय वाढ जोमदार करते.२) ००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट)हे खत फुले येण्याआधी किंवा आल्यावर वापरतात. यात स्फुरद आणि पालाश जास्त प्रमाणात असते. फळांचे आकार, रंग आणि वाढ सुधारण्यासाठी उपयुक्त आहे..३) १२:६१:०० (मोनो अमोनिअम फॉस्फेट)या खतामुळे नवीन मुळे चांगली वाढतात आणि पिकाची शाखीय वाढ जोमदार होते. फुलांची योग्य वाढ, पुनरुत्पादन आणि फुटवा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.४) १३:४०:१३ (फुलगळ कमी करणारे खत)हे खत कपाशी आणि शेंगवर्गीय पिकांसाठी उपयुक्त आहे. फुलगळ कमी करते आणि शेंगांची संख्या वाढवते.५) १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट)या खतात पालाश जास्त आणि नत्र कमी असते. हे फुलोऱ्यानंतर व पक्व अवस्थेत उपयुक्त आहे. पाण्याचा ताण असताना पिकाची प्रतिकारक क्षमता वाढवते आणि अन्ननिर्मिती सुधारते..६) १२:३२:६१ (फुलधारणा व फळधारणा खत)या खतामुळे पिकाची कायिक वाढ थांबून फुलकळी व फळधारणा वाढते.७) २४:२४:००:८ (अमोनिकल + नायट्रेट नत्र असलेले खत)या खतात नत्र अमोनिकल आणि नायट्रेट स्वरूपात मिळते. हे खत पिकाच्या सुरुवातीच्या वाढीपासून फुलधारणा अवस्थेपर्यंत वापरता येते..८) ००:००:५० (पोटॅशिअम सल्फेट / सल्फेट ऑफ पोटॅश)हे खत पिकाला अवर्षणात तग धरण्यास मदत करते. फळांचा आकार, रंग, वजन आणि गुणवत्ता सुधारते. यात गंधक असल्याने भुरीसारख्या रोगांवरही नियंत्रण मिळते.९) कॅल्शिअम नायट्रेटहे खत मुळांची जोमदार वाढ करते आणि पिकाला काटक बनवते. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी तसेच शेंगा व फळ वाढीच्या टप्प्यात उपयुक्त आहे..विद्राव्य खते देताना काय काळजी घ्यावी?विद्राव्य खते देताना पिकाची अवस्था, वाफसा आणि वातावरण तपासून घ्यावे.या खतांच्या विविध ग्रेड्स त्यांचे कार्य जाणून घ्यावेत आणि योग्य वेळी योग्य विद्राव्य खते पिकाला द्यावीत. अनावश्यक खते दिल्यास पिकावर त्याचा विपरित परिणाम दिसू शकतो.विद्राव्य खते देताना पाणी स्वच्छ असल्याची खात्री करावी.पाण्याची मात्रा शिफारस केल्या प्रमाणेच वापरावी. .ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यानंतर पुढे १० मिनिटे साधे पाणी द्यावे. जेणेकरुन मुख्य आणि उपनळ्यांमधील खते शेवटच्या रोपांपर्यंत पोहोचवता येतात.दोन विद्राव्य खते मिसळून देत असल्यास त्यांची एकमेकांची पुरकता तपासूनच एकत्र फवारावे. सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असल्याची खात्री करावी. जेणेकरुन सर्व पिकाला समान योग्य प्रमाणात खते मिळतात. ठिबक सिंचन संचातील गळती तपासावी, असल्यास त्वरित थांबवावी. .वारंवार विचारलेले प्रश्न(FAQs):१. विद्राव्य खते म्हणजे काय?पाण्यात सहजपणे विरघळणारी खते जी पिकांना त्वरित अन्नद्रव्ये पुरवतात.२. विद्राव्य खते दाणेदार खतांपेक्षा कशी चांगली आहेत?विद्राव्य खते पिकांना लवकर उपलब्ध होतात, जमिनीवर परिणाम करत नाहीत आणि खताची नासाडी कमी करतात.३. विद्राव्य खते देण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती?ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन किंवा फवारणीद्वारे देणे अधिक प्रभावी ठरते.४. विद्राव्य खते कधी द्यावीत?पिकांच्या वाढीच्या काळात, फुलोऱ्याच्या वेळी, फळधारणेच्या अवस्थेत किंवा अचानक अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास द्यावीत.५. विद्राव्य खते देताना कोणती काळजी घ्यावी?योग्य ग्रेड निवडावी, स्वच्छ पाणी वापरावे, शिफारस केलेल्या प्रमाणात खते द्यावीत आणि सिंचनानंतर १० मिनिटे साधे पाणी चालू ठेवावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.