
Solapur News : प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याच्यादृष्टीने सोलापूर जिल्हा परिषद आणि महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला असून, या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कॉलिंग सेंटर द्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या तक्रारींची प्रशासनाच्या डॅशबोर्डवर नोंद घेतली जात आहे आणि या तक्रारींचे निवारण आठ दिवसात केले जात आहे.
शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजाचा लाभ गतिमान देण्याच्यादृष्टीने एआय तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असून, अशा पद्धतीने एआयचा वापर करणारा सोलापूर हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु आहे. प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील पुरवठा विभाग, शिक्षण, आरोग्य महिला व बालविकास आणि पशुसंवर्धन या पाच विभागाचा समावेश करण्यात आला आहे.
या पाच विभागाच्या अनुषंगाने कॉलिंग सेंटर मार्फत दररोज १५ ते २० हजार नागरिकांना मोबाईलवर फोन केले जात असून, त्यानुसार डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून, कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहेत. तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक आहे, याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत आहे. त्यावर पुढील उपाययोजना करून या तक्रारींचा अगदी जलदगतीने निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
या प्रयोगानंतर सर्व शासकीय विभागात टप्प्या-टप्प्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ए आय कॉलिंग सेंटर द्वारे कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे किंवा लाभार्थ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, त्यांनी केलेल्या माहितीचा डेटा संकलित करून संबंधित प्रशासनाचे तालुका प्रमुख अथवा विभाग प्रमुख पहिल्या आठवड्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करतील, तर प्रत्येक महिन्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी स्वतः तक्रारीच्या अनुषंगाने आढावा घेऊन त्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत उडान-२०२५ अंतर्गत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांचे खास प्रशिक्षण घेतले. मार्केटिक्स कंपनीचे संचालक मोहित कोकीळ यांनी यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कॉलिंग सेंटरच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये कशा पद्धतीने कॉल केले जातात, त्याच्या नोंदी आणि पुढील कार्यवाही, या सर्व बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.