Solapur APMC Election : भाजप विरुद्ध भाजप लढतीत विजय काँग्रेसचाच

Maharashtra Cooperative Politics : सोलापूर बाजार समिती ही महाराष्ट्रातील पहिल्या मोठ्या पाच बाजार समितीतील एक प्रसिद्ध अशी बाजार समिती आहे. आतापर्यंत या बाजार समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, ते आजही अबाधित आहे, हे परवाच्या निकालावरून दिसून येते.
Solapur APMC Election
Solapur APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी सहकारमंत्री, भाजपचे आमदार सुभाष देशमुख या दोन्ही भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वाटणी करून त्यांना समवेत घेतले आणि या निवडणुकीचे चित्र भाजप विरुद्ध भाजप असे निर्माण झाले.

पण प्रत्यक्षात भाजपची म्हणून किती मते आहेत, याच्या ताकदीचा अंदाज असूनही, कल्याणशेट्टी आणि देशमुख यांनी एकमेकांना आव्हान दिले, पण सरतेशेवटी निवडणुकीच्या निकालात विजय काँग्रेसचाच झाला, नव्हे भाजपनेच हा विजय अलगद काँग्रेसच्या पारड्यात टाकला, हे वास्तव नाकारता येणार नाही.

सोलापूर बाजार समिती ही महाराष्ट्रातील पहिल्या मोठ्या पाच बाजार समितीतील एक प्रसिद्ध अशी बाजार समिती आहे. आतापर्यंत या बाजार समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, ते आजही अबाधित आहे, हे परवाच्या निकालावरून दिसून येते. पूर्वीपासूनच सहकारातील संस्थांवर भाजपचे कधीच पुरेसे प्रतिनिधित्व नव्हते, कारण बाजार समितीचे मतदार असणाऱ्या गावपातळीवरील विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतीतील मतदारांमध्ये काँग्रेसचाच सर्वाधिक वरचष्मा राहिला आहे.

Solapur APMC Election
APMC In Kolhapur : बाजार समित्यांच्या क्रमवारीत कोल्हापूरच्या १५ बाजार समित्या

तिथे भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ अगदी मर्यादित आहे. त्यामुळे कशाच्या बळावर भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला सामोरे जाणार, हा प्रश्‍न होता.

मागच्या निवडणुकीतही भाजपचे आमदार, तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने यांनाच सोबत घेऊन निवडणूक लढवली आणि राज्यातील सत्तेच्या बळावर सभापतिपदही स्वतःकडे ठेवले, हीच काय ती भाजपसाठी जमेची बाजू, पण सत्ता मिळूनही पाच वर्षांत त्यांनी काय केले, हा प्रश्‍न उरतोच.

यंदाच्या निवडणुकीतही फक्त देशमुखांऐवजी कल्याणशेट्टी, एवढाच काय तो फरक. या वेळीही चतुर काँग्रेस नेत्यांनी पुन्हा सत्तेच्या जवळ जाण्यासाठी आमदार कल्याणशेट्टींना जवळ केले. त्यांना बाजार समितीपुरता तात्पुरता का होईना नेता मानत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून, भविष्यातील ‘आपले सर्व अडथळे’ दूर करून घेतले आहेत. पण सत्तेचे संख्याबळ काँग्रेसच्या पारड्यात आहे, हे भाजपवाल्यांनीही विसरू नये, अशी परिस्थिती आहे.

Solapur APMC Election
Lasalgaon APMC : लासलगाव बाजार समितीमध्ये सभापतींना ११ संचालकांचे आव्हान

...तर या वल्गनांना अर्थ काय?

सहकार, पणनमंत्र्याचे महत्त्वाचे खाते मिळूनही आणि आता तिसऱ्यावेळी आमदार राहूनही भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना गेल्या १०-१२ वर्षांत ग्रामपंचायत किंवा सोसायट्यांमध्ये म्हणावा तितका विस्तार करता आला नाही. आज भाजपचे म्हणून तिघे निवडून आले असले, तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि अन्य नेत्यांचा पाठिंबा कारणीभूत ठरला आहे,

त्या तुलनेत दक्षिण सोलापुरात काँग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप माने यांनी आपली पकड सोसायट्या, ग्रामपंचायतीवर अधिक कशी राहील, हे जाणीवपूर्वक पाहिले, कार्यकर्त्यांना सातत्याने बळ दिले, तर काँग्रेसचे दुसरे नेते सुरेश हसापुरे यांनी कोणतेही राजकीय पाठबळ नसताना, स्वबळावर काही सोसायट्या दक्षिण सोलापुरात स्थापल्या, आज त्यांची म्हणून स्वतःची ताकद आहे, मग ज्येष्ठ नेते म्हणविणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांसाठी निवडणुका लढवणार, या वल्गनांना किती अर्थ उरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com