Jammu and Kashmir News : जम्मू काश्मीरच्या वरच्या भागात हिमवृष्टी झाल्याने खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. बहुतांश भागातील तापमान शून्य अंशाखाली नोंदले गेले. श्रीगर आणि काश्मीरच्या अन्य ठिकाणी सलग दुसऱ्या रात्री किमान तापमान शून्याखाली नोंदले गेले.
काश्मीरच्या वरच्या भागात गेल्या आठवड्यापासून अनेक भागांत अधूनमधून हिमवृष्टी होत असल्याने खोऱ्यात थंडी वाढली आहे. राजस्थानात किमान तापमानात घसरण झाली असून दुसरीकडे हिमाचल प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारलेली आहे.
श्रीनगरमध्ये किमान तापमानात किंचित सुधारणा झाली. कालच्या उणे ०.७ वरून उणे ०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. अर्थात रात्रीचे तापमान अजूनही सामान्यांच्या तुलनेत एक अंशांनी कमीच आहे.
काझीगुंद येथे किमान तापमान उणे दोन अंश सेल्सिअस नोंदले गेले तर पहेलगाम येथे किमान तापमान उणे ३.२ अंश सेल्सिअस राहिले. तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या गुलमर्ग येथे शुन्याखाली तापमान नोंदले गेले. कुपवाडा येथे उणे ०.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. कोकेनर्ग येथे ०.७ अंश सेल्सिअस इतके होते.
राज्यातील तापमान शनिवारपर्यंत असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. २४ नोव्हेंबरनंतर हवामानात बदल होत असून काश्मीरच्या काही भागात प्रामुख्याने वरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे.
राजस्थानात तापमानात घट
जयपूर: गेल्या चोवीस तासांत राजस्थानातील बहुतांश भागातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यानुसार अनेक शहरांचे तापमान दहा अंशापेक्षा खाली गेले आहे. राज्यात फतेहपूर येथे ६.७ अंश तापमानाची नोंद झाली.
तसेच सीकर येथे किमान तापमान सात अंश नोंदले गेले. राज्यात थंड हवेचे ठिकाण असलेल्या माउंट अबू येथे पाच अंश सेल्सिअस नोंदले गेले असून सिरोही येथे ८.१ अंश सेल्सिअस, चुरू येथे ८.६, शांग्रिला आणि भिलवाडा येथे ९.७ आणि करौली येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील वातावरण कोरडे राहिल, असे हवामान खात्याने सांगितले.
हिमाचलमध्ये आठ वर्षांत नोव्हेंबर सर्वाधिक शुष्क
गेल्या दोन महिन्यांपासून हिमाचल प्रदेश दुष्काळाचा सामना करत असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. एकार्थाने नोव्हेंबर महिना गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक शुष्क राहिल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कोरड्या हवामानाचा अनुभव २०१६ मध्ये आला होता. तेव्हा वेधशाळेकडे पावसाची नोंद झाली नव्हती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.