
Pune News : राज्याच्या कृषी गणना विभागाच्या उपायुक्तपदी सीताराम कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी उपसंचालकाचा दर्जा असलेले कोलते पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विभागीय सांख्यिक म्हणून कार्यरत होते. त्यांना आता ‘कृषी सेवा गट-अ’मध्ये अधीक्षक कृषी अधिकारीपदी (एसएओ) बढती देत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दयानंद जाधव यांच्या निवृत्तीनंतर उपायुक्तपद रिक्त होते. अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील शेतकरी कुटुंबातून कृषी पदवीधर झालेले श्री. कोलते यांनी ३२ वर्षांच्या सेवाकालात तालुका कृषी अधिकारीपदापासून ते जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. कृषी गणना विभागाकडे असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, अॅग्रीस्टॅक तसेच कृषी गणनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांना वेग देण्याची जबाबदारी श्री. कोलते यांच्यावर राहणार आहे.
खटावकर, वावधने यांनाही बढती
कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागातील उपसंचालक पूनम सुहास खटावकर यांनाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. त्या आता परभणीच्या एसएओ म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.
गोंदियाच्या देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनाही ‘एसएओ’पदी बढती देत शासनाने त्यांची निवड चंद्रपूरमधील ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकपदी केली आहे. कृषी खात्याचे अवर सचिव अमोल साखरकर यांनी अलीकडेच या तिघांच्या बढतीचे आदेश जारी केले आहेत.
‘आत्मा’चे संचालकपद केले उन्नत
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागातील पदोन्नतीच्या प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरीस अलीकडे वेग मिळाला आहे. त्यामुळेच ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनाही पदोन्नती मिळाली. त्यांनी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या संचालकपदाची सूत्रे यापूर्वीच स्वीकारली आहेत. कृषी आयुक्तालयातील आत्माचे संचालकपद यापूर्वी अवनत करण्यात आले होते.
या पदावर अशोक किरनळ्ळी यांना संचालक म्हणून तात्पुरती पदोन्नती देण्यात आली होती. संचालकपदासाठी पुरेशी सेवा ज्येष्ठता नसलेला अधिकारी उपलब्ध नसल्याने पदावनतीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला होता. मात्र आता पात्र अधिकारी उपलब्ध होताच ‘आत्मा’चे संचालकपद पुन्हा उन्नत केले गेले आहे. तसेच या पदावर किरन्नळी यांचीच नियुक्ती कायम करण्यात आली आहे.
आयुक्त कक्षाची सूत्रे कुलकर्णींकडे
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या कक्षातील उपसंचालकपदाची सूत्रे आता गिरीश कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहेत. कक्षाचे आधीचे प्रमुख कांतिलाल पवार आता पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विभागीय सांख्यिक म्हणून कामकाज सांभाळतील. श्री. कुलकर्णी यांच्याकडे अॅग्रीस्टॅक प्रकल्पाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.