

- शेखर गायकवाड
ई-मेल : shekharsatbara@gmail.com
Shekhar Gaikwad Artilce : एका गावात संभाजीराव नावाच्या शेतकऱ्याची आठ एकर बागायत जमीन होती. संभाजीरावच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस नोंदीने संभाजीराव आणि त्याची बहीण शांताबाई यांची नावे ७/१२ वर वारस म्हणून लागली होती. वारस नोंद होतानाच संभाजीराव आणि त्याची बायको यांनी शांताबाईला समजावून सांगून तिने जमिनीवरील हक्क सोडावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण संभाजीरावची बहीण शांताबाई ही काही तिचा हक्क सोडायला तयार नव्हती. काही महिन्यांनंतर संभाजीराव बहीण शांताबाई यांच्या घरी गेला आणि संभाजीरावने बहिणीला, ‘‘नव्या विहिरीवर पंपासाठी वीजजोडणी घ्यायची आहे,’’ असे सांगितले व संमतीसाठी स्टॅम्पपेपरवर शांताबाईची सही घेतली. काही कालावधी उलटल्यानंतर गावापासून दूर राहणाऱ्या शांताबाईने पुढच्या वर्षीचे ७/१२ उतारे नवऱ्यामार्फत काढले असता ७/१२ वरून शांताबाईचे नाव कमी झाल्याचे लक्षात आले.
शांताबाईने कलेक्टर, तहसीलदार यांना अर्जफाटे करून बेकायदेशीरपणे आपले नाव कोणताही दस्तऐवज केला नसताना देखील तलाठ्याने संगनमत करून कमी केल्याचा आरोप केला. एक दिवस तर शांताबाईने मामलेदार कचेरीसमोर उपोषणसुद्धा केले. तहसीलदार यांनी त्या फेरफार नोंदीची मूळ कागदपत्रे मागवून घेतली. तहसीलदार यांनी मूळ कागदपत्रे तपासली असता शांताबाईने तिच्या स्वाक्षरीने हक्कसोडपत्र केल्याचे निदर्शनास आले. तिच्या हे लक्षात आले, की वीजबिल जोडणीच्या स्टॅम्प पेपरच्या नावाखाली तिचा भाऊ संभाजीराव याने गुपचूप हक्कसोड पत्रकावर तिची सही घेतली होती. फेरफार नोंदीमध्ये स्पष्टपणे राजीखुशीने मी स्वतः माझ्या भावासाठी जमिनीतील हक्क सोडत आहे, असा उल्लेख होतो.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे जमीनविषयक कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी त्यातील मजकूर काय आहे तो वाचला पाहिजे व त्याचा अर्थदेखील समजून घेतला पाहिजे.
वारस नोंदीचा वाद
एका गावात संतोष या शेतकऱ्याच्या नावावर दीड एकर जमीन होती. संतोषला एक मुलगा मनोज व मुलगी रेणुका ही दोन मुले होती. १९९० मध्ये संतोषचा मृत्यू झाला. त्या वेळी त्याचा मुलगा मनोज शहरामध्ये एका कारखान्यात नोकरी करीत होता. दीड एकर जमिनीसाठी गावात जाणे त्याला जमत नव्हते. त्यामुळे अनेक वर्षे त्याची जमीन पडीक राहिली. त्याची बहीण रेणुका हिचे लग्न होऊन नोकरीनिमित्त ती परगावी राहत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर रेणुकाने जमिनीला वारस नोंद करण्यासाठी प्रयत्न केले. जमिनीच्या पीकपाहणी सदरी चुलत्यानेच नावे लावून घेतल्याचे तिच्या लक्षात आले. संतोषच्या मृत्यूनंतर संतोषचे सख्खे भाऊ मयत संतोषची जमीन कसत होते. परंतु त्याबद्दल त्यांनी वारसांना कधीही विचारणा केली नाही. तलाठ्याशी संगनमत करून त्यांनी पीकपाहणी सदरी आपले नाव लावून घेतले होते. त्यामध्ये ८-१० वर्षे निघून गेली. रेणुकाने केलेल्या वारसाच्या नोंदीचा अर्ज सुद्धा तलाठ्याने जमीन दुसऱ्याच्या ताब्यात असल्यामुळे त्याचा ना हरकत दाखला आणावा, असे सांगून रेणुकाचा अर्ज फेटाळून लावला.
१० वर्षे उलटल्यानंतर रेणुकाने सर्व ७/१२ उतारे ओळखीच्या एका माहीतगार माणसाला दाखविले. त्यातून सख्खे भाऊ हे जमिनीचे कूळ ठरू शकत नाही. त्यांच्या नावे पीकपाहणी सदरी असली, तरी वडिलांचे वारस म्हणून ७/१२ वर कब्जेदार सदरी तुमची नावे येण्यासाठी कुठलीच अडचण नाही, असे त्या माहीतगार व्यक्तीने त्यांना सांगितले. त्यानंतर रेणुकाने रीतसर वारस नोंद करण्यासाठी अर्ज, प्रतिज्ञापत्र व वडिलांच्या मृत्यूचा दाखला सादर केला. त्या वारस नोंदीला संतोषच्या भावांनी हरकत घेतली. जिवंत असताना संतोषने आम्हाला जमीन वहिवाटण्यास सांगितले होते, असा त्यांनी जबाब दिला.
शेवटी तक्रार नोंदीची सुनावणी होऊन मयत संतोषचे वारस म्हणून मुलगा मनोज व मुलगी रेणुका यांची नावे एकदाची ७/१२ ला लागली.
या सर्व प्रयत्नांत गावी हेलपाटे मारणे, वकिलांची फी देणे ही सगळी कामे मनोजच्या बहिणीने म्हणजे रेणुकाने केली होती. मनोज मात्र एकदाही गावात न जाता आता ७/१२ वर बहिणीबरोबर त्याचे नाव लागले होते. कुठलाच प्रयत्न न करता वडिलांची जमीन विसरलेल्या मनोजला आता नव्याने आशा निर्माण झाली व वारसाची नोंद झाल्यानंतर त्यांनी ७/१२ वर नाव लावल्याचा फायदा घेऊन बहिणीला न विचारता त्याच्या हिश्शाची जमीन २५ लाख रुपये घेऊन त्याच्या चुलत्याला विकली. २१ व्या शतकातील बहीण- भावाच्या या नात्याची चर्चा गावभर रंगली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.