Ahmednagar News : मराठा आणि त्यापाठोपाठ धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दोन्ही समाजाची मागणी जुनी आहे. सरकार दोन्ही समाजांना केवळ अश्वासने देत आहेत. मात्र हा प्रश्न सुटत नसल्याने आरक्षण लढ्यात मराठा-धनगर एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी झालेल्या मेळाव्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला साद घातली आणि त्याला धनगर समाजातील नेत्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. मराठा-धनगर एकत्र आले तर त्याचा नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणावरही परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजेंड्यावर आहे. राज्यात सर्वाधिक मराठा समाज असून त्यापाठोपाठ धनगर समाज आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे तर यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्याजन्मस्थळी चौंडी (ता. जामखेड) येथे बेमुदत उपोषण केले.
मंगळवारी (ता. २४) दसऱ्यानिमित्त चौंडीत मेळावा झाला. त्यात मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील यांची उपस्थिती भुवया उंचवणारी होती. मराठा आणि धनगर एकत्र आले तर आरक्षण मिळेलच, असे सांगत जरांगे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले.
आरक्षणप्रश्नी मराठा आणि धनगर बांधवांचे दुखणे एकच आहे. घराघरांत जा, हा लढा आणखी तीव्र करा. मग आरक्षण कसे मिळत नाही, तेच बघू, आरक्षणप्रश्नी धनगर समाजाच्या शेवटच्या घरापर्यंत लाट गेली, तर कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही.
मराठा, धनगर आपण एकच आहोत. तुम्हाला तुमच्या लेकराबाळांचे भविष्य चांगले करायचे असेल, तर पेटून उठावे लागेल. तुमच्या पाठीशी मराठा समाज ताकदीने उभा राहील. हे त्यांचे वाक्य थेट राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे आहे.
मनोज जरांगे यांच्याकडून मराठा धनगर-एकत्र येण्याची साद आणि यशवंत सेनेकडून मिळालेला प्रतिसाद पाहता नगर जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांना हे अडचणीचे ठरणार असल्याचे दिसतेय.
नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेरसह शेवगाव तालुक्यात मराठा, धनगर समाजाची संख्या अधिक आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) हे मराठा आरक्षणाचे तर राजमाता अहल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले नगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) हे धनगर समाजाच्या आरक्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे.
मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. त्यात मराठा-धनगर आरक्षण लढ्यात एकत्र येत असल्याने त्याचा राजकीय फटका नगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदार संघात सत्ताधारी नेत्यांना बसणार आहे.
राज्यात मागील काही वर्षांपूर्वी ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) असा पॅटर्न राबवला होता. राज्याच्या राजकारणात या पॅटर्नची चर्चा झाली होती. आता आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येऊ पाहत असलेल्या मराठा-धनगर समाजासारखा ‘माधव’ सारखाच ‘मध’ (मराठा-धनगर) पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रभावी असलेल्या यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनीच असे स्पष्ट केल्याने ‘मध’ च्या पॅटर्नला बळ मिळणार असल्याचे दिसतेय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.