Mosambi Cultivation : पैठणमधील श्रीराम बनकर यांनी केलीय ३० एकरात मोसंबीची उत्तम लागवड

गोदावरी नदीकाठच्या पैठण तालुक्‍यातील शृंगारवाडीचे युवा शेतकरी श्रीराम सुभाष बनकर यांची यशस्वी मोसंबी उत्पादक म्हणून ओळख.
Mosambi Cultivation
Mosambi CultivationAgrowon

शेतकरी : श्रीराम सुभाष बनकर

गाव : शृंगारवाडी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : ५८ एकर

मोसंबी लागवड : ३० एकर

एकूण झाडे : ७१३०

गोदावरी नदीकाठच्या पैठण तालुक्‍यातील शृंगारवाडीचे युवा शेतकरी श्रीराम सुभाष बनकर यांची यशस्वी मोसंबी उत्पादक म्हणून ओळख. तीन भावंडांच्या एकत्रित कुटुंबाची ५८ एकर शेती. वडिलोपार्जित शेतीचा विशेषतः मोसंबी पिकाचा वारसा श्रीराम यांनी पुढे चालवीत शेतीचा पोत कायम राखला आहे.

शेतातील तण शेतातच कुजविण्याचे तंत्र त्यांनी कायम ठेवले आहे. त्यामुळे वडिलोपार्जित १९७२ पासून उत्पादन देणारी मोसंबी बाग ५ एकरांत अजूनही उभी आहे. त्यात ७०० झाडे आहेत. याशिवाय अलीकडच्या ४-५ वर्षांत २५ एकरांत विविध अंतरावर मोसंबीची सुमारे ६४३० झाडे लावली आहे.

संपूर्ण लागवडीमध्ये आंबिया बहराचे नियोजन असते. उर्वरित क्षेत्रात ऊस १० एकर, तूर ५ एकर, सीताफळ ५ एकर, केळी ५ एकर आणि चारा पिकांची लागवड आहे. शाश्‍वत उत्पादनासाठी जमिनीचा पोत, खत व पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाते, असे श्रीराम बनकर सांगतात.

Mosambi Cultivation
Citrus Crop Irrigation Management : मोसंबी बागेची पाण्याची गरज कशी भागवावी?

मोसंबी लागवड

- श्री. बनकर यांच्याकडे एकूण ३० एकर मोसंबी लागवड आहे. त्यापैकी १९६८ मध्ये ५ एकरांत १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केलेली ७०० झाडे आहेत. दुष्काळी स्थितीतही आजोबांनी मोठ्या मेहनतीने जगविली असे श्रीराम बनकर सांगतात.

- २०१९ मध्ये त्यांनी ५ एकरांवर नव्याने १८ बाय १० फुटांवर मोसंबीची १३५० झाडांची लागवड केली. त्यानंतर २०२० मध्ये एकाच वेळी ५ एकरांत १९ बाय १२ फूट अंतरावर १२८० झाडे, तर १५ एकरांत १८ बाय १२ फुटांवर ३८०० झाडांची लागवड केली. लागवडीवेळी भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीचा पोत यांचा अंदाज घेऊन लागवडीचे अंतर ठरविल्याचे श्रीराम बनकर सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी :

- डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. हा ताण साधारण ३० दिवसांचा असतो.

- ताण काळात झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या, रोगट फांद्या काढून टाकल्या जातात. बाग स्वच्छ केली जाते. बागेतील सर्व काडीकचरा, पडलेली फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाते.

- बाग ताणावर सोडल्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात.

- साधारण ३० ते ४० टक्के पानगळ झाल्यानंतर साधारणपणे जानेवारीच्या मध्यात बागेचा ताण तोडला जातो.

- ताण तोडण्यासाठी चढ्या क्रमाने सिंचन केले जाते. त्यासाठी सुरुवातीस ३ तास, त्यानंतर चार दिवसांनी ६ तास आणि पुढे ८ ते १० दिवसांच्या अंतराने प्रति झाड ८ तास प्रमाणे ठिबकद्वारे सिंचनाचे नियोजन केले जाते.

खत व्यवस्थापन

एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच दुय्यम अन्नद्रव्ये यांच्या मात्रा झाडाच्या वयोमानानुसार प्रति झाड १ ते ३ किलो प्रमाणे दिल्या जातात. रासायनिक खते जमिनीत मातीत मिसळून दिली जातात. याशिवाय झाडाच्या वयोमानानुसार प्रति झाड २० ते ७० किलोपर्यंत शेणखताची मात्रा वर्षातून एक वेळ दिली जाते.

मागील कामकाज

- नवती फुटतेवेळी फुलकिडे आणि नागअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या शिफारशीनुसार २ फवारण्या घेतल्या आहेत.

- सध्या बागेत पांढरी माशी तसेच लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव पाहून रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

- तापमान काही दिवस अचानक वाढले होते. त्या काळात झाडांना मोकळे पाणी देण्यात आले.

- सध्या पाऊस सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे बागेत कीड-

रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी पाऊस थांबल्यानंतर बाग वाफसा स्थितीत आल्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

आगामी नियोजन

- सध्या बाग फुलांतून फळांत रूपांतर होण्याच्या अवस्थेत आहे.

- पाऊस आणि वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना घेतल्या जातील.

- तापमानात वाढ होत असल्याने झाडांची पाण्याची गरज वाढते. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीवर अवलंबून न राहता, मोकळे पाणी देण्यावर भर दिला जाईल.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी झाडांचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

- पावसाळा सुरू होण्यापूर्वी बागेतील संपूर्ण तण ग्रास कटरच्या साह्याने काढले जाईल. बाग तणविरहित ठेवण्यावर भर दिला जाईल.

Mosambi Cultivation
Mosambi Orchard : चांगल्या उत्पादनासाठी मोसंबी बागांचे आरोग्य जपा

तणनियंत्रण

बागेतील तण ग्रास कटरच्या साह्याने कापून जागेवरच कुजविले जाते. वर्षातून साधारण ६ ते ७ वेळा तणनियंत्रण केले जाते. पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात १ वेळ आणि त्यानंतरच्या काळात किमान २ वेळा ग्रास कटरने तण काढले जाते.

सिंचन सुविधा

सिंचनासाठी ३ विहिरी, २ बोअरवेल आणि दोन शेततळी उभारली आहेत. याशिवाय संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. जेणेकरून पाण्याचा कार्यक्षम वापर होईल.

संपर्क - श्रीराम सुभाष बनकर, ९७६३१०१०५५, (शब्दांकन : संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com