MPSC Exam : एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलणार?, फडणवीसांचे ट्वीट; खा. सुप्रिया सुळे विद्यार्थ्यांच्या भेटीला

MPSC Combined Pre-Examination : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (ता. २५) आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख दिली जाण्याची शक्यता असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
MPSC Exam
MPSC ExamAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा रविवारी (ता. २५) एकत्र होणार आहे. त्यातच संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात न आल्याने कृषी पदवीधरांसह स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला होता. तर विद्यार्थ्यांनी पुण्यातील लाल बहादूरशास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर बुधवारी (ता. २१) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात याच मुद्द्यावर स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत आपला पाठिंबा दिला. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बोलू असे आश्वासन दिले. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती दिली. त्यावरून कृषी पदवीधरांसह स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयोग कोणता निर्णय घेतो याकडे लक्ष लागले आहे.

खा. सुळे आंदोलन स्थळी

यावेळी सुळे यांनी, पुण्यामध्ये कृषी पदवीधरांसह स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरू असणाऱ्या आंदोलनास भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकूण घेत चर्चा केली. यावेळी आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर यामुळे अन्याय होणार आहे. तर स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करूनही आयोगाने कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांचा या परीक्षेत समावेश केला नाही. त्या रोषातूनच मंगळवारी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार सरकारने करावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे अशी मागणी करणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

MPSC Exam
MPSC Exam : संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांना स्थान नाहीच; कृषी पदवीधरांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

फडणवीस यांचे ट्विट

यादरम्यान फडणवीस यांनी आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी, आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. तर कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजी आणि विद्यार्थ्यांचा संतापाचा विचार करता सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच बुधवारी दुपारी तीन वाजता याबाबत एक बैठक घेऊन यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आयोगाच्या अध्यक्षांनी आश्वस्त केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

आयोगाचे स्पष्टीकरण

सदर परीक्षेसंदर्भात दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्यानेच कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली असल्यानेच या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नाही. तर कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरतीप्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असेही स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com