अॅग्रोवन वृत्तसेवा
Cotton Production : अकोला ः एकीकडे बाजारपेठेत कपाशीच्या एका विशिष्ट वाणाची बोंबाबोंब उडालेली असताना दुसरीकडे काही विक्रेते या संधीचे सोने करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जादा दराने ‘त्या’ कपाशी वाणाचे बियाणे विक्री करणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील आडसूळ येथील विक्रेत्यावर मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
अकोला जिल्ह्यात एका कपाशी उत्पादक बियाणे कंपनीच्या काही वाणांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरू आहे. दररोज दुकानांसमोर रांगा लावल्या जात आहेत. शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस बियाण्याचे पाकीट मिळेनासे झाले. कंपनीने केलेला पुरवठा संपूर्ण विक्री झाल्याचाही दावा केला जात आहे. असे असताना काही जणांनी या वाणाची साठेबाजी करून जादा दराने विक्री सुरू केल्याचा अनेकांना संशय होता. शेतकरीसुद्धा अशा प्रकारचा आरोप करीत आहेत. ८६४ रुपये विक्री किंमत असलेले त्या वाणाचे कपाशी बियाणे आडसूळ येथील अश्विनी अॅग्रो एजन्सीचा संचालक तब्बल १४०० रुपयांना विकत होता.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. २८) गोपनीय माहितीनुसार अजित सीड्स उत्पादित अजित-१५५ (बीजी २) या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. मोहीम अधिकारी महेंद्र सालखे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सतीश दांडगे, तेल्हारा पंचायत समिती अधिकारी भरत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, विस्तार अधिकारी कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले आदींनी बनावट ग्राहक या दुकानात पाठवून बियाणे खरेदीबाबत खात्री केली. अजित -१५५ या वाणाचे बियाणे प्रतिपाकीट १४०० रुपये दराने मिळेल, असे विक्रेत्याने सांगितले. या ठिकाणी पथकाने पंचनामा करून कृषी केंद्राचा संचालक रामराव पोहरे यांच्याविरुद्ध बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३,कापूस बियाणे किंमत (नियंत्रण) आदेश -२०१५, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा -२००९, महाराष्ट्र कापूस बियाणे नियम -२०१० इत्यादी अन्वये तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शेतकऱ्याने केली होती तक्रार
आडसूळ येथे जादा दराने विक्री सुरू असल्याची तक्रार अकोट तालुक्यातील शेतकऱ्याने केली आहे. त्याने या विक्रेत्याकडे बियाण्याच्या पाच पाकिटांची मागणी केली असता १४०० रुपये प्रतिदराने त्याने सात हजार रुपये जमा करण्यास सांगून थोड्या वेळाने येण्याची सूचना केली. शेतकऱ्याने याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला दिल्याने विशिष्ट क्रमांकाच्या ५०० रुपयांच्या नोटा देण्यात आल्या.
विशिष्ट वाणांचा आग्रह करू नका
कापूस पिकाचे सर्व मान्यताप्राप्त वाण हे संकरित बीजी-२ प्रकारातील आहेत. योग्य पीक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास यापैकी कोणत्याही वाणाचे उत्पादन चांगले येते. कंपनीच्या जाहिरातीला भुलून विशिष्ट वाणांची शेतकऱ्यांनी मागणी करू नये. तसेच अधिक भाव देऊन खरेदी करू नका. असा प्रकार कुठे होत असेल तर तत्काळ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून द्यावा. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान लक्षात घेता कपाशीची लागवड एक जूननंतरच करावी.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.