Pig Farming: वराहांची निवड, आहार व्यवस्थापन

Animal Nutrition: संगोपनासाठी वराह प्रजातीची निवड हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वराहांची वाढ झपाट्याने होत असल्याने, त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के असावे. खाद्यामध्ये प्राणिजन्य प्रथिने असल्यास, वाढ आणखी जोमाने होते.
Pig Farming
Pig FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. हेमंत बिराडे, डॉ. पंकज हासे

Livestock Management: वराहपालन करताना प्रजातीची निवड, आहार, गोठा व्यवस्थापन, आजार नियंत्रण, प्रजनन आरोग्य यावर लक्ष द्यावे. हे पाचही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. एका घटकातील चूक, इतर घटकांवर परिणाम करते. उदा. आहारात जर योग्य पोषण नसेल तर आजारांचे प्रमाण वाढते, प्रजनन क्षमता कमी होते.

आपण कितीही चांगली प्रजाती निवडली आणि योग्य व्यवस्थापन केले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून या सर्व पाच घटकांचे व्यवस्थित नियोजन करावे. वराहांची बुद्धी व ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण असून हा अत्यंत हुशार प्राणी आहे. हा व्यवसाय जरी सहज व फायदेशीर वाटला तरी लगेचच हा व्यवसाय सुरू करू नये. प्रथम पशुवैद्यकीय महाविद्यालयातून प्रशिक्षण घ्यावे.

प्रजातीची निवड

प्रजातीची निवड हा वराह पालनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशात अनेक देशी प्रकारच्या प्रजाती आढळतात. कमी अधिक फरकाने सर्वसाधारणपणे सर्व सारखेच दिसतात.

देशी वराहांचा रंग काळा असतो. तोंड लांब असते. केस राठ आणि लांब असतात. त्यांची वाढ अतिशय संथ गतीने होते. प्रजननक्षमता कमी आहे. एका वेळेला ७ ते ८ पिलांना जन्म देतात. साधारणतः १८ महिन्यांत देशी वराहाचे वजन ३५ ते ४५ किलो होते. योग्य व्यवस्थापन असल्यास देशी प्रजातींपासून फायदा होतो. या देशी जातीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असते.

Pig Farming
Pig Farming : स्वतःचं मार्केट तयार करत वराहपालनातून आर्थिक स्थैर्याचा प्रवास

परदेशी जातींमध्ये लार्ज व्हाइट यॉर्कशायर, लॅड्रेस, बर्कशायर, ड्युरॉक, हॅम्पशायर, टॅमवर्थ, चेस्टर व्हाईट यांचा समावेश होतो. सध्या भारतात लार्जव्हाइट यर्किशायर, लॅडरेस आणि ड्युरॉक जातीच्या प्रजातींना विशेष मागणी आहे. काही ठिकाणी त्रिवेणी संकर करत आहेत. परंतु लँडरेस मादी व लार्जव्हाइट यॉर्कशायर नर, यांच्यापासून होणाऱ्या संकरित पिल्लांची वाढ चांगली होते. लॅडरेस प्रजातीची मादी, ही पिलांची उत्तम सांभाळ करणारी माता आहे.

आहार व्यवस्थापन

आहारावर ८० टक्के खर्च होतो. आहार हा प्राण्यांच्या पोटाच्या प्रकारावर अवलंबून असतो. वराहांचे पोट हे मानवासारखे आहे म्हणून त्याचा आहार हा मानवासारखा असतो. वाढ झपाट्याने होत असल्याने, त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण १६ ते १८ टक्के असावे. त्याप्रमाणे, खाद्यामध्ये प्राणीजन्य प्रथिने असल्यास, वाढ आणखी जोमाने होते. आपल्या हवामानात सहा महिन्यांमध्ये वराहाचे वजन ६० ते ७० किलो भरते.

वराहाला देण्यात येणारी धान्य भिजवून किंवा शिजवून देण्याची गरज नसते. भरडा केलेले तृणधान्य वराह आवडीने खातात. वराहाच्या आहारामध्ये भरडलेला मका, सातू, ज्वारी आणि बाजरी यांचा वापर केला जातो. धान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, उदा. गव्हाचा कोंडा, भाताचा कोंडा किंवा पॉलिश, डाळींपासून मिळणारी चुणी, उसाची मळी यांचा देखील समावेश आहारात करतात.

प्रथिनांचा स्रोत म्हणून तेलबिया पेंडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उदा. शेंगदाणा पेंड, सूर्यफूल पेंड, खोबरा पेंड, तीळ पेंड, सोयाबीन पेंड. वराहाच्या आहारात सरकी पेंड वापरू नये.

Pig Farming
Pig Farming : वाढती मागणी, निर्यातीसाठी शेतीला जोड द्या वराहपालनाची

वराह आहारामध्ये प्राणिजन्य प्रथिनांचा वापर करतात. यामध्ये विशेषतः माशाची भुकटी, मटणाची भुकटी इत्यादीचा अवलंब होतो. प्राणिजन्य प्रथिन स्रोतामधून मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जाची अमिनो आम्ले पुरविली जातात, जी वराहाच्या योग्य वजनवाढीसाठी आवश्यक असतात.

वराह खाद्यामध्ये खनिज मिश्रण, मीठ आणि जीवनसत्त्वांचा अवलंब केला जातो. खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण वाढवायचे असल्यास कधी कधी वराह खाद्यामध्ये वनस्पती तेल किंवा इतर जनावरांपासून मिळणाऱ्या चरबीचा वापर केला जातो.

आहारावरील खर्च कमी करण्यासाठी वराहपालक हॉटेलमधील उष्टावळ वापरतात. हॉटेल उष्टावळ १२ तासांच्या आत खाऊ घालावी, म्हणजे जास्तीत जास्त फायदा होईल. त्यातील प्लॅस्टिक, मीठ, लोखंड वगैरे अखाद्य वस्तू बारकाईने शोधून बाहेर काढाव्यात. खाद्य खाऊन झाल्यावर वराहांना स्वच्छ धुवावे. गोठा धुऊन कोरडा करावा.

भारतात काही भागात बिअर फॅक्टरीतील निघणारा उपपदार्थ वजनवाढीसाठी वराहांना खाऊ घालतात. पैदाशीसाठी वापर होत असलेल्या मादीला अतिशय कमी प्रमाणात म्ह‌णजे प्रति अर्धा किलो या प्रमाणे उपपदार्थ खाद्यामध्ये द्यावा.

आहारात लसूण घासाचा वापर करता येतो. वराहांना गाई, म्हशीचे खाद्य किंवा गवत देऊ नये.

दुग्धपान करणाऱ्या मादीच्या आहारात ॲझोलाचा वापर करावा. त्यामुळे पिलांची वाढ जोमाने होते.

- डॉ. हेमंत बिराडे, ७०२११२८२७४

(माजी सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

- डॉ. पंकज हासे, ९८९०२४८४९४

(सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविदयालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com