
Seed production : विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. विविध पिकांमध्ये बियाणे आणि जमिनीच्या माध्यमातून कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये बीजप्रक्रियेचा देखील समावेश होतो. त्यासाठी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार प्रत्येक पिकाच्या बियाणास बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
बीजप्रक्रियेचे महत्त्व
- बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
- रोपांची सतेज व जोमदार वाढ होते.
- रासायनिक खतांची २० ते २५ टक्के बचत होते.
- जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ मिळते.
घ्यावयाची काळजी
- बीजप्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीने हातामध्ये हातमोजे किंवा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करावा. जेणेकरून रासायनिक घटकांचा हातासोबत संपर्क होणार नाही.
- तोंडावर कापड किंवा मास्क लावावा.
- बीजप्रक्रियेवेळी बुरशीनाशके जिवाणू खतामध्ये मिसळू नयेत.
- विकत घेतलेल्या बियाणांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केली असल्यास अशा बियाणांवर फक्त जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
- बीजप्रक्रिया केलेले आणि पेरणीनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मानवी खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.
- जिवाणू खत शक्यतो त्याच हंगामात वापरावे. शिल्लक राहिलेले असल्यास, ते सहा महिन्यांच्या आत वापरावे. त्याची साठवणूक थंड जागेत करावी.
- बीजप्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.
- भुईमूग, सोयाबीन इ. पातळ आवरण (साल) असलेल्या पिकांच्या बियाणाला बीजप्रक्रिया करताना जिवाणू संवर्धक किंवा बुरशीनाशकांचे घट्ट द्रावण करावे. बीजप्रक्रिया करताना टरफल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
खरीप पिकांसाठी उपयुक्त जिवाणू संवर्धके
जिवाणू संवर्धक किंवा बुरशीनाशके---पीक----बीजप्रक्रियेची मात्रा (प्रति किलो बियाणे)---हेक्टरी नत्र, स्फुरदयुक्त खताची बचत
१) रायझोबियम---सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग इ. डाळवर्गीय व गळीतधान्य पिके---२५ ग्रॅम---२० ते २५ किलो
२) ॲझोटोबॅक्टर---कापूस, ज्वारी, गहू, भात इ---२५ ग्रॅम---१० ते २० किलो
३) पी.एस.बी.---सर्व पिकांकरीता---२० ग्रॅम---शिफारशीच्या मात्रेत २५ टक्के बचत
४) ट्रायकोडर्मा (जैविक बुरशीनाशक)---सर्व पिकांकरिता---१० ग्रॅम---१० ते २५ किलो
घ्यावयाची काळजी
- जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करावी.
- रायझोबियम संवर्धकाची प्रक्रिया पाकिटावर नमुद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समूहास करावी.
- ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पी.एस.बी या
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते.
पीकनिहाय शिफारशीत बीजप्रक्रिया
१) खरीप ज्वारी
- दहा लिटर पाण्यामध्ये ३ किलो मीठ मिसळून द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळून नष्ट करावे. पाण्याच्या तळाला राहिलेले बी हाताने काढून घ्यावे. हे बी ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर सावलीत वाळवावे.
(प्रमाण ः प्रतिकिलो बियाणे)
- गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम.
- कार्बोसल्फान (२५ एसडी) २ ग्रॅम.
२) मका
(प्रमाण - प्रतिकिलो बियाणे)
- ॲझोटोबॅक्टर, पी.एस.बी. जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा १० ग्रॅम.
बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.
३) बाजरी
- दोन किलो मीठ १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बी टाकावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळून नष्ट करावे. तळाला राहिलेले बी काढून तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकवावे.
(प्रमाण - प्रतिकिलो बियाणे)
- मेटॅलॅक्झील (३५ टक्के एस.डी.) ६ ग्रॅम.
४) तूर, उडीद, मूग
(प्रमाण - प्रतिकिलो बियाणे)
- थायरम ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम दीड ग्रॅम.
- स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम.
५) भात
- मॅन्कोझेब (७५ टक्के) अधिक कार्बेन्डाझीम (५० टक्के) प्रत्येकी २ ग्रॅम याप्रमाणे प्रतिकिलो बियाणास संयुक्त बीजप्रक्रिया करावी.
- लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण करावे) बुडवावे. त्यानंतर पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे.
- ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे बियाण्यास किंचित ओले करून चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी.
६) सोयाबीन
प्रमाण - प्रतिकिलो बियाणे
- कार्बोक्झीन (३७.५ टक्के) अधिक थायरम (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम.
- त्यानंतर थायामेथोक्झााम (३० टक्के एफएस) १० मिलि.
- रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत (पीएसबी) २५ ग्रॅम.
संपर्क - संजय बडे, ७८८८२९७८५९, (कृषिविद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.