Seed Gene Bank: बियाणे निर्मितीसाठी जनुक पेढी

Agriculture Research: बियाणे संशोधन आणि संवर्धनासाठी जनुक पेढी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दुर्मीळ आणि नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या बियाण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे राज्यस्तरीय जनुक पेढी स्थापन करण्यात आली असून, कृषी क्षेत्रात नवे संशोधन घडवून आणण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरत आहे.
Seed Gene Bank
Seed Gene BankAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुवर्णा गारे, डॉ.विक्रम जांभळे, मतीनखान अत्तार

Agriculture Innovation: दुर्मीळ झालेल्या आणि नष्ट होत असलेल्या वनस्पतींचे बियाणे जनुक पेढीत संवर्धित करून आणि पुनरुत्पादित करून बियाणे संग्रह वाढवता येतो. वनस्पती नष्ट होण्यापासून वाचवता येते. उपयुक्त आनुवंशिक गुणधर्माच्या पिकांचा प्रसार करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

जगभरात अनेक जनुक बँका कार्यरत आहेत. स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी जनुक पेढी आहे.भारतात नवी दिल्ली येथे एनबीपीजीआर येथे जर्मप्लाझम संवर्धन केले जाते. याठिकाणी जर्मप्लाझम गोळा करणे, संवर्धन, वैशिष्ट्ये वर्णन आणि वेगवेगळ्या गुणधर्मासाठी मूल्यांकन केले जाते.

Seed Gene Bank
Farmer Seed Scheme: भुईमूग-तीळ बियाणांसाठी अर्जाची मुदतवाढ – १३ तारखेपर्यंत संधी!

ज्यामुळे पैदासकारांना तयार सामग्री मिळते, जी नवनवीन जाती तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. एनबीपीजीआर अंतर्गत अकोला (महाराष्ट्र), भोवाली (उत्तराखंड), कटक (ओदिशा), हैदराबाद (आंध्र प्रदेश), जोधपूर (राजस्थान), रांची (झारखंड), सिमला (हिमाचल प्रदेश), शिलाँग (मेघालय) आणि थ्रीसूर (केरळ) येथे विभागीय कार्यालये आहेत.

महाराष्ट्रात चारही कृषी विद्यापीठांची संयुक्तिक अशी राज्यस्तरीय जनुक पेढी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे २०२१ मध्ये स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांनी जर्मप्लाझम साठवणूक व संवर्धन करण्यासाठी जनुक पेढीची स्थापना केली आहे. राहुरी येथील राज्यस्तरीय जनुक पेढीमध्ये ग्रामीण भागातून विविध प्रकारच्या पिकांचे देशी / गावरान जातींची बियाणे देखील संवर्धित करण्यात आली आहेत.

राहुरी येथील जनुक पेढीत ७ लघुकालीन शीतकक्ष (३ ते ५ अंश सेल्सिअस व ३५ टक्के आर्द्रता) आणि एक दीर्घकालीन शीतकक्ष (-२० अंश सेल्सिअस) असून, अतिशय उपयोगी असलेले जर्मप्लाझम येथे संवर्धित करण्यात येत आहे. तीन थराचे आवरण असलेल्या ॲल्यु‍मिनियमच्या पॅकेटमध्ये बियाणे/ जर्मप्लाझम साठवले जातात.

Seed Gene Bank
Seed Certification : ऑनलाइन बीज प्रमाणीकरणात महाराष्ट्र राज्य आघाडीवर

जनुक पेढीचे फायदे

दुर्मीळ झालेल्या आणि नष्ट होत असलेल्या वनस्पतींचे बियाणे जनुक पेढीत संवर्धित करून आणि पुनरुत्पादित करून बियाणे संग्रह वाढवता येतो. वनस्पती नष्ट होण्यापासून वाचवता येते.उपयुक्त आनुवंशिक गुणधर्माच्या पिकांचा प्रसार करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हे संग्रह अधिक प्रभावी वर्गीकरण करण्यास सक्षम करतात.

पिकांच्या आनुवंशिक घटकांचे परिणाम, रचना आणि सीमांची माहिती होते. सारखी दिसणारी पिके नीटपणे ओळखता येतात. संग्रहाची माहिती प्रमाणात तंतोतंत ठरते. कृषी क्षेत्रात जनुक पेढ्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. विविध पिकांच्या वेगवेगळ्या जाती काही विशिष्ट गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. काही जाती भरघोस उत्पादन देतात, काही उच्च तापमान सहन करतात, काही पाण्याचा ताण सहन करूनदेखील सरासरी उत्पादन देतात, काही जाती क्षारपड जमिनीतही सरासरी उत्पादन देतात.

Seed Gene Bank
Onion Seed Production: जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी

अशा जाती पैदास प्रक्रियेत वापरून त्यापासून नवीन जाती तयार करता येतात. अशा उत्तम जातींचे बियाणे जनुक पेढीत संग्रहित करून वेळोवेळी त्यांचा वापर करता येतो. वातावरणातील बदल जसे की, वाढते तापमान, कमी पर्जन्य, जमिनीची धूप अशा परिस्थितीत तग धरणाऱ्या व सरासरी उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण करण्यासाठी पीक पैदासकारांना अशा जाती जनुक पेढीतून सहज उपलब्ध होतात.

पीक पैदासकारांनी परिश्रमाने तयार केलेले मुलभूत बियाणे तसेच वेगवेगळ्या पिकांचे हजारो जर्मप्लाझम जनुक पेढीत संवर्धित केल्यामुळे, ते बियाणे वर्षानुवर्षे जतन करण्यासाठी लागणारा वेळ, पैशाची बचत होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उदा: महापूर, दुष्काळ, अशावेळी उपयुक्त बियाण्याचा नाश जनुक पेढीच्या माध्यमातून टाळता येतो.

भविष्यात जर्मप्लाझमबद्दल माहिती संपादन करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि आनुवंशिक तपशीलवार तर्क प्रदान करणे यासाठी जनुक पेढ्यांचा उपयोग होतो. रोगप्रतिरोधक पिकांचे उत्पादन शक्य होते. या पेढ्या एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कीटकांच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या वनस्पती, पिकाचे प्रजनन आणि संवर्धनाची माहिती प्रदान करतात.

कार्यक्षमतेतील अडथळे

बियाण्यांच्या जैवयांत्रिकी व्यवहार्यतेचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आवश्यक असते. क्षेत्रीय जनुक पेढ्या जाती विविधतेचा केवळ एक भाग साठवू शकतात, संपूर्ण प्रजाती नाही.

क्षेत्रीय जनुक पेढ्यातील जर्मप्लाझमास रोग, कीड नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो.

वीज पुरवठा अपूर्ण असल्यास यांत्रिकी व्यवहार्यतेचा तोटा होतो. त्याद्वारे जर्मप्लाझमचे नुकसान होऊ शकते. अनेक वर्षे जर्मप्लाझमचा साठा करणे आर्थिकदृष्ट्या महाग ठरते.

-डॉ. विक्रम जांभळे, ७५८८५४१३०२, (राज्यस्तरीय जनुक पेढी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com