Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत गावाला राज्यस्तरावर दुसरे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मुंबईत जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा अभियान ३.० चा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आला.
यामध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीने अडीच हजारपेक्षा कमी लोकसंख्या वस्ती गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. ७५ लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार संजय गायकवाड, प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत सिंदखेडचे सरपंच प्रवीण कदम, उपसरपंच विकास उजाडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
गावाने मागीलवर्षीसुद्धा अमरावती विभागामध्ये सिंदखेडने माझी वसुंधरा अभियानामध्ये ५० लाखांचे बक्षीस पटकावलेले आहे. सिंदखेडच्या नागरिकांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक, जिल्हा स्मार्ट पुरस्कार, संत गाडगेबाबा अभियान व वसुंधरामध्ये विभागीय पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
गेल्या काळात एक हेक्टर क्षेत्रात मीयावाकी जंगल प्रकल्प येथे राबवण्यात आला. वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राज्यामध्ये राबविले जात आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास प्रारंभ झालेला आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने गावांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन स्तरावर केले जात आहे.
गावकऱ्यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सचिव यांच्या परिश्रमातून माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकापर्यंत गाव पोचले. बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापुढेही पर्यावरणपूरक गाव बनविण्यासाठी परिश्रम कायम ठेवू असे मत सरपंच प्रवीण कदम यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.