Soil Health : काळ्या आईला वाचवायला हवे

जमिनीचे अतिशोषण आपण केले आहे आणि आता त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. आता तरी जागे होऊन आपण काही करणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

सुरेश कोडीतकर

Indian Agriculture : भारताच्या एकूण ३२८.७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ९६.४ दशलक्ष हेक्टर जमीन कसहीन (Fertility Of Soil Decreases) झाली आहे. हे प्रमाण एकूण क्षेत्रफळाच्या २९.३ टक्के आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारे एकूण ४० टक्के जमिनीने कस गमावला आहे.

जमिनीचा कस (Soil Fertility) नष्ट होणे म्हणजे जमिनीच्या वरील थर ज्यात पिकाची वाढ होते, तो नाहीसा होणे. उत्पादकतेसाठी (Crop Productivity) मातीचा हा थर आवश्यक असतो. जागतिक स्तरावर उत्पादक मातीचा थर कसहीन होणे हे जगाच्या ५० टक्के लोकसंख्येवर परिणाम करणारे ठरणार आहे.

२०३० पर्यंत एक दशलक्ष हेक्टर कस गमावलेल्या जमिनीची गुणवत्ता सुधारायची असेल तर ०.१६ ट्रिलियन डॉलर निधीची आवश्यकता भासणार आहे. जमिनीचा पोत नष्ट होण्याचे जागतिक पातळीवरील महत्त्वाचे कारण शेती हे आहे.

जमिनीचा कस नाहीसा होण्याचे परिणाम समस्त सजीव सृष्टीला या ना त्या रूपाने भोगावे लागणार आहेत.

त्यातील काही अदृश्य परिणाम हे अनुक्रमे जमिनींनी सेंद्रिय घटक गमावणे, जमिनींची झीज होणे, जमिनीची आम्लता वाढणे, जमीन प्रदूषित होणे, जमिनीतील पोषण घटकांचे असंतुलन होणे, क्षार वाढणे, जैव विविधता नष्ट होणे इत्यादी आहेत.

Indian Agriculture
Indian Agriculture : शेतजमिनी जिवंत करूया...

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे घटक हे जमिनीच्या वरच्या थरात असतात. पिकांची मुळे फार सखोल नसतात. फळे आणि औषधी उपयोग, लाकूड-फाट्यासाठीची झाडे दीर्घकाळ सांभाळलेली, जोपासलेली असतात.

जोपासलेल्या अथवा नैसर्गिकरीत्या आलेल्या झाडांची मुळे खोल आणि दूर पसरणे स्वाभाविक असते जेणेकरून जगण्यासाठी अन्नद्रव्ये आणि आवश्यक घटक प्राप्त होतील. पण पिकांचे तसे नसते.

पिकांच्या वाढीसाठी आणि चांगले उत्पादन होण्यासाठी आवश्यक पोषक घटक मातीच्या वरील थरातून वेळीच प्राप्त झाले तर अपेक्षित वाढ आणि उत्पादन मिळू शकते. जमिनीची पोषक घटक क्षमता चांगली असणे म्हणजे जमीन कसदार असणे होय.

जमिनीचा पोत चांगला असणे म्हणजे त्यात आवश्यक असे पोषक घटक उपलब्ध असणे. नायट्रोजन, सल्फर, पोटेंशिअम, सेंद्रिय कर्ब या मूलद्रव्यांचे पिकांच्या वाढीसाठी असलेले महत्त्व आपण जाणतो.

पण हे घटक मूलतः उपलब्ध असतील तर किंवा त्यांच्या उपलब्धतेसाठी ठोस प्रयत्न केले तर त्यांचे मातीतील प्रमाण टिकून राहू शकते.

परंतु दरवर्षी पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून जाते. जमिनीवरील मातीचा वरचा थर नष्ट होण्याची महत्त्वाची कारणे वनांचा विनाश, वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा दबाव, प्रदूषण आणि घन कचरा, वेगाने घडणारे वातावरणीय बदल, मृद संधारणाचे अशाश्वत प्रयोग ही आहेत.

जमिनीचा कस गमावण्याचे दृश्य परिणाम हे अन्न आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण होणे, जलटंचाई, उत्पादनात घट आल्याने अनेक अल्पभूधारक लोक गरिबीत ढकलले जाणे, स्थलांतर, परिसंस्थेच्या कार्यात घट होणे हे आहेत.

म्हणजेच जमिनींच्या शोषणामुळे घडून येणारी झीज मानव आणि सहचरांच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे. सजीव सृष्टीला लागणाऱ्या घटकांवर याचे परिणाम होणार आहेत. अन्न आणि पोषक घटकांचे उत्पादनच जर रोडावले, पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे संकट ओढवले, नैसर्गिक संकटे ओढवली, शेतीवर अवलंबून असणाऱ्या गरीब कुटुंबांना किमान अन्न मिळणे दुरापास्त झाले तर या सर्वांमुळे सामाजिक संकट निर्माण होईल.

लोक शहरांकडे धाव घेतील. नैसर्गिक जीव साखळीत आणि त्याच्या संतुलनात अडथळे निर्माण होतील. हे धोके अजून कोणीही ओळखलेले दिसत नाहीत.

मृद संधारण, जल संधारण, कृषी, जलसंपदा विभागांनी हा धोका ओळखला आहे काय? कृषी विद्यापीठांनी, अशासकीय संघटनांनी आणि स्वयंसहाय्यता गटांनी या धोक्याबाबत गांभीर्याने कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.

कदाचित याबाबत पूर्वापार चर्चा होत आली आहे आणि त्याकडे कोणी लक्ष देत नाही. अशी वास्तविकता असू शकते. पण तो भूतकाळ मागे सारून आपण भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपल्याला जी भूमी, वन, जल संपदा वारशादाखल मिळाली आहे, त्याला ओरबाडण्याचे काम आपण करीत आहोत. जल, जमीन आणि नैसर्गिक खतांच्या साहाय्याने आपल्या पूर्वजांनी अन्नधान्याच्या राशी निर्माण केल्या आहेत.

Indian Agriculture
Suicide Attempt For Agricultural Pump : शेतकऱ्याचा कृषिपंपाच्या विजेसाठी आत्महत्येचा प्रयत्न

आजतागायत आपण त्याचं जमिनीतून अन्नधान्याचे उत्पादन घेत आलो आहोत. रासायनिक खते, कीटकनाशके, यांत्रिक आणि विद्युत अवजारे यामुळे शेतीकामाचा वेग वाढला आहे. अधिकाधिक उत्पादनाच्या हव्यासात बेसुमार पाण्याचा, खतांचा वापर करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे.

अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी नैसर्गिक वनसंपदेचा बळी घेण्यात आला आहे. जमीन आणि निसर्गाकडून आपण अनेक वर्षे घेत आलो आहोत. शेत जमिनीवर प्रक्रियेमुळे तसेच पाऊसपाण्यामुळे माती निरंतर नष्ट होते.

ती पावसात वाहून जाते. जमिनीची झीज होण्याची प्रक्रिया मंद गतीने दीर्घकाळ होत आली आहे. उघड्या डोळ्याने ही झीज लगेच दिसून येत नाही. काळीभोर असणारी कसदार जमीन दोन ते तीन दशकांनी अक्षरशः तपकिरी वा फिक्कट दिसू लागते.

हा बदल वरवरचा असला तरी स्थानिक परिस्थितीच्या दृष्टीने जमिनीच्या वरील स्तराची जाडी कमी होऊन तिथे अनेक बदल घडून आलेले आहेत. जमिनीचा पोत नाहीसा होणे अर्थात उत्पादन क्षमता घटणे हा जो भाग असतो तो अशा पद्धतीने घडून येतो.

नव्या पिढीला शेतीत रस नाही. शेतीत कष्ट करायला कोणी तयार नाही. मनुष्यबळ दुर्मीळ झाले आहे. शेतीसाठी आवश्यक गोष्टीच्या किमती वाढल्या आहेत. बाजारभावाची आजही शाश्वती नाही.

मग मृद आणि जल संवर्धनाकडे, वृक्षारोपणाकडे कोण लक्ष देणार? शेतकऱ्यांचा बागायती पिकांकडे कल वाढणे काळसुसंगत असले तरी ज्या जमिनीच्या बळावर आपण उन्नती करू पाहत आहोत, ती आजारी, कृश आणि अशक्त झाली आहे. जमिनीचा कस वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढला पाहिजे.

पीक फेरपालटाचे प्रयोग शेतकऱ्यांनी करायला हवेत. जमिनीचे कर्ब वाढवण्याचे, पोषक घटक संतुलित करण्याचे उपाय पुढे आले पाहिजेत. पंच महाभूतांची कार्यरत होण्याची एक पद्धती असते. ती समजून घेऊन विविध नाशवंत घटक आणि जैविक प्रक्रियांचा अवलंब करून जमिनीचा पोत कसा सुधारता येईल, हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे.

संशोधक, अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी, अनुभवी वन आणि मृद जाणकार यांनी पुढे येऊन हे आव्हान आता पेलले पाहिजे. माती सत्त्व आणि जीव गमावण्याच्या धोक्याच्या सावटाखाली आहे. ती नुसती माती नव्हे तर आपली काळी आई अर्थात माउली आहे.

या माउलीला वाचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. इतके वर्षे आपण जमीन आणि मातीकडून केवळ घेत आलो आहोत. परिणामी जमीन, माती आता रुग्णशय्येवर आहे. ती ठणठणीत बरी करण्यासाठी मृद्-जल संधारण, वन जतन, सेंद्रिय शेतीचे अनुकरण हे सातत्याने करावे लागणार आहे.

(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com