
Solapur News : वाळूची अवैध वाहतूक करणारा आणि बिगरक्रमांकाचा टिपर पकडून पुढील कारवाईसाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडे घेऊन जाताना, माढा विभागाच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या शासकीय वाहनास दोन वाळू माफियांनी गाडी आडवी लावली.
तसेच या वाळू माफियांनी प्रांताधिकारी आंबेकर यांना असभ्य भाषेत बोलून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आता तिघांवर टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे (ता. माढा) गावच्या हद्दीत बुधवारी (ता.२३) रात्री साडेबारा ते पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी दोन वाळू माफिया व एक टिपर चालक अशा तिघा जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे वीस लाख रुपये किमतीचा टिपर व अठ्ठावीस हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू असा वीस लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा माल जप्त केला असून, टिपर चालकास टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अण्णा पाटील (रा. शिराळ टें, ता. माढा), आप्पा पराडे (रा. बाभूळगाव, ता. माळशिरस) व टीपर चालक गणेश सोमनाथ काशीद (रा. परितेवाडी ता. माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, की माढ्याच्या प्रांताधिकारी आंबेकर कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, विशाल गायकवाड मंडल अधिकारी मोडनिंब), सूर्यकांत डिकोळे (मंडल अधिकारी कुर्डुवाडी), महसूल सेवक नवनाथ शिंदे, चालक अतुल दहिटणकर असे पथक हे बुधवारी रात्री साडेदहा वाजता कुर्डुवाडी येथून मिळालेल्या माहितीवरून शासकीय वाहन मधून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी निघाले.
रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरवडे नजीक पुणे-सोलापूर मार्गाने एक वाळूने भरलेला टिपर जात असल्याचे दिसल्याने गाडी टिपरच्या पाठीमागे घेण्यास प्रांताधिकाऱ्यांनी चालकास सांगितले. वाळूच्या टिपरचा पाठलाग करीत वरवडे टोल नाक्याजवळ टिपरला ओव्हरटेक करून पथकातील महसूल कर्मचाऱ्यांनी त्यास थांबण्यास सांगितले.
टिपर थांबवून चालक पळून जात असताना महसूल कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून आणले असता, त्याने गणेश सोमनाथ काशीद (रा. परितेवाडी ता. माढा) असे नाव सांगितले. दरम्यान, टिपरमध्ये सुमारे अठ्ठावीस हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू आढळून आली. टिपरवर कोणत्याही प्रकारचा गाडी क्रमांक दिसून आला नाही.
त्या वेळी पुढील कारवाईसाठी टीपर पोलिस ठाण्याकडे घेऊन जाताना प्रांताधिकारी आंबेकर यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याबाबत ग्राममहसूल अधिकारी प्रवीण किसन बोटे (वय ३४, रा. कुर्डुवाडी ता. माढा) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.