Nandurbar Mango Market News : उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम असला तरी पावसाची सुरुवात आणि गृहिणींची वर्षभर पुरेल एवढे लोणचे तयार करण्याची लगबग सुरू होते. त्यामुळे नंदुरबार येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडेबाजारात लोणच्याच्या कैरीचे अनेक स्टॉल लावले जात आहेत.
मंगळवारी (ता. २०) आठवडे बाजारात सुमारे २०० क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
दररोजच्या जेवणात लज्जत आणण्यासाठी कैरीच्या लोणच्याला विशेष पसंती दिली जाते. लोणच्यांमध्येही खवय्यांची पसंती कैरीच्या लोणच्यालाच जास्त असते, अन्यथा लिंबू, आवळा यासह विविध प्रकारची लोणची मार्केटमध्ये आली आहेत.
ती केव्हाही बाजारात उपलब्ध होतात. मात्र कैरीचे लोणचे हंगामी आहे. साधारण मे-जून महिन्यात लोणच्याच्या कैरीचा हंगाम असतो. लोणचे वर्षभर पुरेल या पद्धतीने तयार केले जाते. मात्र ते वर्षभर टिकविण्यासाठीही ते करण्याच्या काही ट्रीक्स आहेत.
त्याचे पालन करूनच गृहिणी सर्व नियोजन करतात. शक्यतो एक पाऊस झाल्यावरच लोणचे घातले जाते. कारण वातावरणात गारवा तयार होतो. उष्णतेत किंवा उन्हाळ्यात लोणचे तयार केले तर ते लवकर नासते. वर्षभर टिकत नाही अथवा बुरशी लागते. त्यामुळे गृहिणी शक्यतो १० जूननंतर लोणचे घालण्यास प्राधान्य देतात.
बाजारपेठेत गर्दी
मंगळवारी (ता. २०) येथील बाजारपेठेत लोणच्याची खास कैरी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. गुजरातमधून राजापुरी, तर जिल्ह्यातील सातपुड्यातून गावरान कैरी विक्रीसाठी येत आहे.
त्यामुळे महिलांनी मंगळवारी कैरी खरेदीसाठी गर्दी केली होती. ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने कैरीची विक्री झाली. सुमारे २०० क्विंटल कैऱ्यांची आवक झाली होती.
राजापुरी-गावरान कैरीला अधिक मागणी
नंदुरबारसह गुजरात, मध्य प्रदेश, खानदेशमधील शहरांमधील कैरीचे व्यापारी वाहने भरून सोमवारी रात्रीच नंदुरबार शहरातील सुभाष चौकात दाखल होतात.
सकाळी दुकाने थाटतात. दर मंगळवारी मोठा बाजार भरतो. लोणच्यासाठी खासकरून राजापुरी व गावरान कैरीला प्राधान्य दिले जात आहे. राजापुरी कैरी मोठी असते. गावरान लहान आकारात असते. राजापुरी कमी आंबट, तर गावरान खूप आंबट लागते.
गृहिणींच्या म्हणण्यानुसार जास्त आंबट कैरीचे लोणचे काही वर्षे टिकते, खराब होत नाही. कैरी घेतल्यावर ती फोडून तिच्या लहान चिऱ्या तयार करून लोणचे बनविले जाते. पूर्वी घरीच कैरी फोडली जायची. मात्र चिऱ्या बनविणे जोखमीचे काम असते. त्यामुळे या हंगामात कैरीच्या चिऱ्या बनविणाऱ्यांनाही रोजगार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.