
वाणगाव : फेब्रुवारीच्या अखेरपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून, तापमान अजून वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होतो. ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांनी या दिवसांमध्ये जनावरांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास, शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास त्यांच्या शरीरावर ताण येतो. तसेच जनावरांमध्ये उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते.
त्यासाठी जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. जनावरे सावलीकडे धाव घेऊन थंड जागी स्थिरावतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात.अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो. नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.
अशी घ्या काळजी
स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
दिवसातून चार ते पाचवेळा जनावरांना पाणी पाजावे.
दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे.
शक्य असल्यास गोठ्यामध्ये स्प्रिंकलर किंवा फॉगरचा वापर करावा.
गोठ्याचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, नारळाच्या झावळ्यांनी झाकून घ्यावे. वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजविलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. काही काळानंतर त्यावर हलके पाणी शिंपडावे. जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी न देता, विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा.
वाळलेले गवत, कडब्यावर मीठ किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात. अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनतात. त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून लाळ्या-खुरकूत, घटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी लस टोचावी.
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतुनाशक पाजावे. उन्हाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण जन्माला येणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याची गर्भाशयातील पोषणावर अवलंबून असते. संकरित आणि विदेशी जनावरांवर उष्णतेचा जास्त परिणाम दिसून येतो.
- डॉ. राहुल संखे, पशुधन विकास अधिकारी, पालघर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.