
“आमच्या रानात सकाळी घरून तोंड धुवून निघालं की, रात्री घरी येईपर्यंत काही पाहावं लागत नाही...” अमला गावचे रामदासभाऊ सांगत होते. नाशिकहून जव्हारकडे जाताना, मोखाड्याच्या पुढे डाव्या बाजूला अमल्याकडे जायचा फाटा फुटतो. थोडं पुढं गेलं की लांबूनच उंच टेकाड दिसतं. याच टेकाडाच्या सुरवातीला गाववस्ती तर त्याच्याही पुढे अजून लोकांची शेतीभाती आणि शेवटी उंच कातळ-डोंगर. शेती संपते तिथून पुढं डोंगरापर्यंत आणि डोंगरांवरदेखील जंगल, झाडं अशी इथली भूरचना आहे.
गावात जाण्यापूर्वी खाली नदीवजा मोठा ओढा लागतो. गावाच्या हिरव्या परिसराला वेढा घालत तो पुढे जातो. त्यामुळे हा भाग एखाद्या पाचुच्या बेटासारखाच भासतो. आम्हाला आमची गाडी ओढ्याच्या अल्याड लावून पुढे चालत जावे लागले. जास्त पाऊस झाला तर रस्ता बंद होतो आणि गावाचा इतर जगाशी संपर्क तुटतो. आम्ही गावात शिरलो आणि बाह्यजगाचा संबंध सर्वार्थाने तुटला. गाडी मागे, रेंज गेलेली, गावकऱ्यांचे प्रेमभरे स्वागत-आपुलकी आणि इथला निसर्ग यात हरवून गेलो.
आम्ही गेलो तेव्हा पावसाने नुकताच आपला पसारा आटोपला होता. पण त्याच्या जाण्याच्या खाणाखुणा झाडा-रानावर दिसत होत्या. सगळीकडे हिरव्या रंगछटा विखुरल्या होत्या. स्वच्छ चकाकत्या उन्हात मधमाशा, फुलपाखरे स्वच्छंद बागडत होती. पावसाने सर्वच प्राणीमात्रांसाठी वर्षभर पुरेल अशी अन्नाची सोय करून ठेवली होती. रानशिवारात रानभाज्यांची उपस्थिती जाणवत होतीच, पण रानफळांनी आमचं लक्ष विशेष वेधून घेतलं.
गोड मेकाची भरपूर मेजवानी केल्यावर कोशींबच्या फळांनी मन जिंकून घेतले. कोशींबच्या वृक्षाला फळांचे घोस लगडलेले होते. लहानीताईने लगेच जाऊन काही फळं तोडून आणली. वरून हिरवं कवच असलेल्या या फळात आतमध्ये गर्द केशरी आरसपानी गर व त्यात बिया असतात. हा गर तोंडात चघळत चाखायचा. मस्त गोड-खारट चव. डोंगराच्या पायथ्याला येईतो, छोटे खडक आणि त्यात उगलेल्या अनेक वनस्पती दिसत होत्या. एका खडकाच्या कपारीत कवदाराची झुडुपं बहरलेली होती. त्याला मोठे सोंडगे लागलेले होते. यातल्याच छोट्या केळींची भाजी करण्यासाठी आम्ही ते सोंडगे काढून घेतले. तहान लागली म्हणून दूर गेलेला झरा आम्ही शोधू शकलो असतो पण रामदासभाऊ आम्हाला ओळीत असलेल्या झुडपांजवळ घेऊन गेला. ही होती पेव्याची झुडपं. त्याचं थोडंसं खोड कापून उसाच्या चुट्या करतो तसे आम्हाला त्याचे तुकडे करून दिले. त्या चावून चावून आम्ही त्यातलं गोड पाणी पोटभर प्यायलो. पोट आणि मन शांत तृप्त झालं. जिभेला तर हजारो वर्षांनी पुन्हा चव आली होती जणू. पुढचे तीन-चार दिवस घरी आल्यावरदेखील जे काही खाऊ ते गोड व चविष्ट लागत होते. रानफळांची जादू कमाल आहे.
उन्हाळा सुरु होतो तशी रानफळांची संख्या जंगलात वाढत जाते. आंबे, आळवं, टेंभरं, जाम, फणस असे गोड गर असणारी फळं मुबलक दिसू लागतात. आंब्यामध्ये शेप्या, संत्र्या, केळ्या, पुंगट्या, गोटी, खोबरा असे अनेक आकाराचे आणि चवीचे आंबे जंगलात आढळतात. सहाही रस ज्यात आढळतात अशी आळवं खाल्यावर ती चव तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. रानचिक्कू म्हणू शकतो अशी टेंभराची फळं हौसेनं खावी अशीच. ही फळं सुकवून वर्षभर देखील खाता येतात. याबरोबरच कोकणात अनेक फळांची रेलचेल असते. त्यातले कोकम किंवा रातांबा कोकणी खानपान समृध्द करतं. कोकम सरबत, आमसूल अशा स्वरूपात ते मोठ्या प्रमाणात आपल्या खाण्यात येत आहे. कोकमचे आगळ घालून, नारळाच्या दुधात बनवलेल्या सोलकढीने तर कोकणातील खाद्यश्रीमंती वाढवली आहे.
रानातल्या फळांचा सर्वात मोठा वाटा आहे तो लहान-लहान फळं आणि बेरींचा. पिठुळ पांढऱ्या रंगाची तोरण तर गोलाकार, अंडाकृती, कधी ओबड-धोबड आकाराची बोरं या फळांनी अनेकांचं बालपण आनंदी केलं असेल. जंगल जिलेबी किंवा विलायती चिंच काढण्यासाठी केवढा अट्टाहास असायचा. असिंद, आंबटवेडांगी, पायर, धामण, चारोळी, शिंदाडे, अमुन्या-कामुन्या अशी अनेक फळं रानातल्या पोरांना उपलब्ध असतात.
उन्हाळ्यात सर्वात आधी जंगलात पिकतात त्या आंबळ्या. रानात वसंतातील फुलं लगडू लागतात तेव्हा आंबट-गोड लिंबोळीच्या आकाराच्या आंबळ्या लागतात. त्यानंतर भोकर, करवंद, जांभूळ अशी रसदार फळांनी रान लगडून येतं. बारडोली जांभूळ प्रसिद्ध आहे. जंगलात आपोआप येणारी जांभळं मात्र आकाराने बारीक, चवीला उत्तम असतात. त्यांच्या बिया मोठया असतात. त्यांना जांभूट्या असं म्हणतात. या पिकलेल्या जांभूट्या मीठ टाकून खायला उत्तम लागतात. कितीही खाल्लं तरी मन भारत नाही.
‘अंजन, कांचन, करवंदीच्या काटेरी देशा...’ या महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या गीतापासून ते ‘..जाळीमंदी पिकली करवंद...’ अशा लावणीत स्थान मिळालेल्या करवंदाची तर बातच न्यारी. डोंगरची काळी मैना अशी लाडाची ओळख हे फळ मिरवतं. उन्हाळ्याच्या शेवटी करवंदाच्या जाळ्या पिकू लागतात. टपोरी काळी फळं हिरव्या गर्द पानांत उठून दिसू लागतात. गोड-आंबट-कडू अशा विविध चवी असतात करवंदाच्या. कधी आतला गर गर्द गुलाबी तर कधी पांढरा दुधी. पण रसदार. एखादा वळीव येऊन गेला की फळातील रस आणि गोडवा दोन्हीही वाढतं. पण पाऊस जास्त झाला की फळं खराब होतात. कच्चे असताना लोणचे, चटणी, भाजी असे पदार्थ केले जातात तर पिकल्यावर सरबत, जाम, जेली, कढी बनवली जाते. असे हे करवंद, डोंगर उतारावर मातीची धूप थांबवून माती व पाण्याचे संवर्धन करण्यासाठी मदत करते. परंतु आपण मात्र शेत काढण्यासाठी, रस्त्यासाठी, जळणासाठी तोड करत जातो.
उन्हाळ्यात काजूबोंडू, स्ट्रॉबेरी, मलबेरी यादेखील चाखायला खूप मजा येते. काजुबोंडू सरबत तर अहाहा. रंग व चव एकदम रिफ्रेशिंग. स्ट्रॉबेरी, मलबेरी महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतात. हल्ली क्यानबेरीज मोठ्या प्रमाणात मॉलमध्ये महागड्या किमतीत विकल्या जातात किंवा स्टार हॉटेलमध्ये सरबत पेय म्हणून सर्व्ह केले जाते. मग आमच्या रानातल्या करवंद, जांभूळ, भोकर, चारोळी या फळांकडे दुर्लक्ष का? आदिवासी भागातील इतक्या महत्त्वाच्या फळांना आपण विसरलो आहोत. ऊस, संत्रे-मोसंबी यांचा रस काढण्यासाठी मशिन्स आहेत, तसे करवंद सरबत तयार करणारे छोटे मशिन तयार झाले तर तर उसाच्या रसाप्रमाणेच ताजं करवंद सरबत खेडोपाडी विकलं जाईल. या झाडांपासून स्थानिकांना उत्पन्न मिळालं तर ते ती झाडं तोडणार नाहीत. आपोआपच जंगलातील माती आणि पाण्याचं संवर्धन होईल. वेंगुर्ला फळसंशोधन केंद्रात ‘कोकण बोल्ड’ ही करवंदाची जात विकसित केली आहे. त्याची रोपं ते पुरवतात. याचा वापर करून करवंद शेती करण्यास हरकत नाही. बांधावर ही झाडं लावली तर कुंपणही तयार होऊ शकतं.
जंगलात मिळणाऱ्या फळांचं मानवी आहारातलं महत्त्व लक्षात घ्यायला हवं. हल्ली जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स वापरून बनवलेले ‘एनर्जी बार’ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. कारण त्या छोट्याशा वडीतून आवश्यक ती ऊर्जा व पोषण मिळते. अगदी तसेच या रानातल्या बेरीज व इतर रसदार फळं म्हणजे पोषणाचे ‘पॉवर हाउस’ आहेत. जीवनसत्त्व, खनिजे व सूक्ष्मपोषकद्रव्ये यात मोठ्या प्रमाणात आढळतात. यासोबतच ‘फायटोन्युट्रीयंटस’ म्हणजेच औषधी पोषणतत्त्वे जे आपल्या शरीराच्या आरोग्याला आवश्यक असतात यांचा खजिना म्हणजे ही जंगलातली फळं होत.
कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण भरपूर क- जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाल्ल्या, कडू गुळवेल उकळून प्यायलो. मग क-जीवनसत्त्वाचे भांडार असलेली गोड करवंदं, बोर, आंबा खायला काय हरकत आहे? मधुमेह झाल्यावर आयुष्यभर औषधं खाण्यापेक्षा जांभळाची फळं आणि बियांची पावडर यांचं सेवन करून मधुमेहासारखे आजार होऊच नये, याची दक्षता आपण घेऊ शकतो. रानफळांची समृद्धी आरोग्यसंपदा वाढवण्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
नीलिमा जोरवर
ranvanvala@gmail.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.