
Fodder : मागील भागामध्ये आपण यांत्रिक बेलर व रेकर पाहिले. पण बेलर चालविण्यासाठी ५० एचपी पेक्षा अधिक क्षमतेचे ट्रॅक्टर वापरणे आवश्यक असते. रेकरसाठीही ३५ एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा यंत्रणा लागते. ती सामान्य अवर्षणप्रवण क्षेत्रातील किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना वापरणे तितकेचे परवडणारे ठरत नाही. अशा स्थितीमध्ये पारंपरिक किंवा मानवचलित सुधारीत बेलर कशा प्रकारे वापरता येईल, हे पाहू.
अवर्षणप्रवण भागात चारा आणि पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असते. अशा स्थितीमध्ये जनावरांचे पालनपोषण करणे हे अत्यंत आव्हानात्मक बनत असते. त्यावर मात करण्यासाठी पावसाळ्याच्या अखेरपासूनच काही तजवीज करून ठेवता येते. बहुतांश शेतकरी खाद्ययोग्य पीक अवशेष, गवत काढून ते वाळवून त्याची गंजी लावून ठेवतात. मात्र गंजी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा वाया जाते. हे टाळण्यासाठी चारा उच्चतम पातळीवर दाबून त्यापासून गासड्या बनविण्याचा मार्ग (बेलिंग) अवलंबला जातो.
या प्रक्रियेमध्ये चारा काढणे, वाळवणे आणि त्यांच्या गंजी लावणे किंवा गासड्या बांधणे या तीन क्रियांचा समावेश होतो. ओल्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनविण्याच्या प्रक्रियेपेक्षा गवतांच्या गासड्या बांधण्याची प्रक्रिया ही तुलनेने सोपी आहे. कारण ओल्या गवतामध्ये विविध प्रकारच्या बुरशी वाढण्याचा संभव असते. कोणतेही सुके गवत तसेही जास्त काळ टिकते. त्यामुळे खास गवतांची लागवड करून किंवा गायरान, कुरणांमध्ये नैसर्गिकरीत्या वाढलेल्या गवतापासून वाळवून सुका चारा बनवता येतो. ते बेलिंगसाठी तयार होण्यसाठी उन्हाळ्यात सामान्यतः तीन दिवस लागतात. हा चारा बुरशीपासून किंवा जास्त गरम होऊ नये सुरक्षित करणे गरजेचे असते. चाऱ्याच्या गाठी बनविण्यासाठी एक साधा बॉक्स बेलर किंवा सुधारित यांत्रिक प्रकारचा बेलर वापरता येतो.
साधा बेलर बनवणे
एक साधा बेलर बनविण्यासाठी तळ नसलेला घन लाकडी पेटी आवश्यक असते. त्यासाठी सामान्यपणे १०० सेंमी लांब, ५० सेंमी रुंद आणि ४० सेंमी खोल हा चांगला आकार मानला जातो. अन्य मोजमापाच्या लाकड्या पेट्या वापरता येतो. मात्र शक्यतो आयताकृती आणि मध्यम आकाराला प्राधान्य द्यावे. त्याला दोऱ्या किंवा सुतळी आतमध्ये टाकण्यासाठी खाचा केलेल्या असल्यास अतिउत्तम. या लाकडीपेटीमध्ये बसेल अशी दुसरी लाकडी किंवा वजनदार पेटी तयार करून घ्यावी. ती वरून गवत दाबण्याच्या कामास येते. असे मानवचलित बेलर बाजारात उपलब्ध आहेत किंवा गावातील सुताराकडून तयार करूनही घेता येतात.
साध्या बेलरने चाऱ्याच्या गाठी बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
या लाकडीपेटीच्या तळाशी खाचांमधून दोरी किंवा सुतळीचे दोन तुकडे ठेवावेत. त्यानंतर तो वाळलेल्या गवताने भरून दाबत जावे. त्यावर आपली वजनदार लाकडी पेटी ठेवावी. त्यात दगड किंवा वजन वाढवावे. त्यामुळे गवत चांगले दाबले जाईल. पेटीमध्ये रिकामी झालेली जागा पुन्हा गवताने भरून वरील प्रमाणे वजन ठेवून दाबण्याची प्रक्रिया करावी. पूर्णपणे दाबून घट्ट झालेल्या गासडी आपण आधीच खाली सोडलेल्या दोरी किंवा सुतळ्यांनी शक्य तितकी घट्ट बांधून घ्यावी. झाली आपली गवताची गासडी तयार. यामुळे कमी जागेमध्ये अधिक गवत साठवता येते.
सुधारित बेलर
सुधारित बेलर हलक्या टिकाऊ धातूपासून बनलेला आहे. यात लावलेली प्लंजर-चलित स्लाइडिंग यंत्रणा माणसाने लावलेल्या शक्तीला ९ पटीपर्यंत वाढवते. एका दिवसात दोन माणसे क्षमतेनुसार १० ते १६ किलो वजनाच्या सुमारे ५० ते ८० गाठी बनवू शकतात. सुधारित बेलरला चाके लावलेली असल्यास ती बैल किंवा अन्य जनावरांच्या साह्याने ओढून कुरणांमध्ये नेता येते. जागेवरच गवताच्या आयताकृती गासड्या बनवून साठवता येतात. किंवा गोठ्याच्या जवळच ही प्रक्रिया करून गवत गासड्या साठवता येतात. दुधाळ जनावरे, लहान मोठी वासरे किंवा आजारी जनावरांना जागेवरच खाद्य देणे शक्य होते.
फायदे
ः - वापरण्यास आणि देखभाल करण्यास सोपे. - ट्रॅक्टर बेलरने बनवलेल्या गाठींइतकेच घट्ट बनवू शकते. - जनावरांना चरण्याची परवानगी नसलेल्या (चराई बंदी असलेल्या) भागातूनही चारा कापून वापरता येतो. - बेलरमध्ये चाके लावलेली असल्याने एक माणूस किंवा बैलाने सहन वाहून नेता येते. तोटे ः - फक्त प्रशिक्षित कारागीरच गाठी बांधू शकतात. त्यामुळे कामगाराला थोड्या प्रशिक्षणांची गरज असते. - याची क्षमता ट्रॅक्टर बेलरपेक्षा खूपच कमी आहे.
- ट्रॅक्टर बेलरद्वारे बनवलेल्या गाठी जितक्या घट्ट बांधल्या जातील, तितक्या घट्ट बांधता येत नाहीत. कापणी ः - फुलांच्या अवस्थेत (पाऊस सुरू झाल्यानंतर दोन महिने) गवत काढून घ्यावे. - पावसाळ्यात कोरड्या हंगामात कापणीचे काम केले पाहिजे. - चारा उन्हात पसरवून दोन ते तीन दिवस चांगले वाळवून घ्यावे. नियमितपणे तो हलवून किंवा फिरवून घेऊन एकसारखा सुकवावा. - चारा बेलिंगसाठी तयार झाल्यावर घट्टपणे दाबून गासड्या बांधून घ्याव्यात. कारण थोडासा पाऊस पडला तरी त्यात पुन्हा आर्द्रता व बुरशी वाढण्याचा धोका असतो. उपकरण चालवताना... - दोरीच्या डब्यांमध्ये काथ्या किंवा सुतळी ठेवून ती मार्गदर्शक हुकामधून बाहेर काढावी.
- बेलरला जर चाके असतील तर ती हलू नयेत, यासाठी चाकांना उटी लावावी. घट्टपणे उभे राहिल याकडे लक्ष द्यावे. - एक कामगार/चालक दट्ट्या (प्लंजर) वापरून गवत दाबतो. तर दुसरा पुरवठा कक्षात (स्टोरेज रिसीव्हिंग चेंबरमध्ये) चारा/सुके गवत भरत जातो. - दट्ट्या पुरवठा कक्षाच्या (रिसीव्हिंग चेंबरच्या) शेवटपर्यंत चारा ढकलतो. गठ्ठा एका चिमट्याने (लॉकिंग फोर्कने) मागे धरला जातो. - कामगाराच्या क्षमतेनुसार गठ्ठा शेवटच्या दाबण्याच्या स्थितीपर्यंत पोचेपर्यंत या प्रक्रियेची पुनरावृत्ती केली जाते. - दोरी वर खेचण्यासाठी आणि गठ्ठा बांधण्यासाठी सुतळी फिशर वापरावे. - लॉकिंग फोर्क काढावा. त्याची पिन काढल्यानंतर दुसरी गाठी पहिलीला बाहेर ढकलते. त्यामुळे गाठ घट्ट बसते.
- वरचे झाकण उघडून आणि मागून खेचून गासडी काढली जाते. साठवणूक : या गाठ्या किंवा गासडी उन्हे, पाऊस आणि कीटकांपासून संरक्षित ठिकाणी रचून ठेवाव्यात. जर तितके मोठे शेड उपलब्ध नसेल, तर जिथे पावसाचे पाणी येणार नाही, अशी उंचावरील जागा निवडावी. आपण या गाठ्या पिरॅमिडच्या आकारात ठेवून पॉलिथिन पेपरने झाकता येतात. त्याच्या भोवतीने राख पसरल्यास बऱ्याचशा किडी तिकडे येत नाहीत. अशा प्रकारे साठवलेल्या गाठी पौष्टिक मूल्य किंवा पदार्थ न गमावता सहा वर्षांपर्यंत ठेवता येतात.
मोठ्या प्रमाणात गाठ्या असल्यास आणि अगदीच सर्व भागांवर प्लॅस्टिक झाकणे शक्य नसल्यास पिरॅमिडच्या वरील भागातील काही गाठ्या खराब होत असल्या तरी आतील गाठ्या चांगल्या राहतात.
डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.