
अभिजित डाके
Subhash Aarve : बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुभाष आर्वे हे नाव संपूर्ण द्राक्ष उद्योगाला परिचित आहे. द्राक्षशेतीतील आद्य व प्रगतिशील बागायतदारांमध्ये या कुटुंबाचा समावेश होतो. तास ए गणेश सारख्या प्रसिद्ध वाणावर संशोधन, तसेच काळानुसार नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोग याद्वारे आर्वे यांनी आपल्या द्राक्षबागेचा विकास केलाच. पण अन्य बागायतदारांनाही प्रेरणा देत त्यांच्या शेतीतील प्रगतीसाठी व एकूणच द्राक्ष उद्योगाच्या विकासासाठी मोलाचा हातभार लावला.
सांगली जिल्ह्यातील तासगाव हा द्राक्षासाठी देशभर प्रसिद्ध तालुका आहे. याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाचे चटके सोसत द्राक्ष व अन्य पिकांची शेती यशस्वी केली आहे. पंधरा वर्षापूर्वी गावात आरफळ योजनेचे पाणी आले आणि शेती बागायती झाली. गावातील सुभाष आर्वे म्हणजे द्राक्ष उद्योगातील मोठे नाव समजले जाते. संशोधक, तंत्रज्ञ, प्रगतिशील, प्रयोगशील व काळाच्या पुढे असलेले बागायतदार अशी त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. आज वयाच्या सुमारे ७९ वर्षीही त्यांचा शेतीतील उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.
कुटुंबाच्या शेतीचा विस्तार
संयुक्त आर्वे कुटुंबाचे नावच द्राक्षशेतीतील आद्य बागायतदार म्हणून घ्यावे लागेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य उच्चशिक्षित असून कुटुंबातील ७४ सदस्य आजही एकत्र राहतात. कुटुंबातील तरुण पिढीही
नवे तंत्रज्ञान आत्मसात करून घरचा वारसा पुढे चालवत आहे. शेतीच्या जबाबदाऱ्या सर्वांनी विभागून घेतल्या आहेत. बोरगाव येथे ३० एकर तर पंढरपूर (जि. सोलापूर) येथे ८० एकर असा कुटुंबाच्या शेतीचा विस्तार झाला आहे. सुभाष यांचे चुलतबंधू कै. वसंतराव आर्वे (अण्णा) यांनी १९६५-६६ च्या काळात अनाबेशाही, बोखरी (काळी), सिलेक्शन सेव्हन आदी द्राक्षवाणांचे प्रयोग केले. अखिल भारतीय द्राक्षमहासंघाचे अध्यक्षपद भूषविले. सुभाष यांनीही बंधूंकडून शेतीचे घडे घेतले. द्राक्षाचे नवे वाण, तंत्रज्ञान यांच्या प्रसारात आर्वे बंधूंचे मोलाचे योगदान आहे, कै. वसंतराव यांना कृषी भूषण तर सुभाष यांना उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वाणांवर संशोधन
सन १९७७ ते १९८० या काळात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात आर्वे यांनी संशोधन करून तास- ए- गणेश हे आज सर्वत्र प्रसिद्ध असलेले वाण विकसित केले. सन १९८१ मध्ये हे वाण शेतकऱ्यांसाठी प्रसारित झाले. युरोप, आखाती देशातही त्याची निर्यात होऊ लागली. लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात या वाणाचा आज संकरीकरणासाठी वापर केला जातो.
प्री कुलिंग’, शीतगृह यांच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी १९८३ च्या दरम्यान वसंतरावांनी
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाने त्यांचा द्राक्ष शेतीतील रस पाहून राहण्याची सोय केली. त्यातून तीन महिने अभ्यास करता आला. सुभाष यांनीही
दाभोळकर परिवाराचे आद्य प्रवर्तक श्रीपाद दाभोळकर त्यांच्यासोबत संशोधनकार्य केले.
त्यातून विक्राल या पुस्तकाचे (द्राक्ष संहिता) मराठी भाषांतर घडले. आर्वे यांनी अन्य आद्य बागायतदारांच्या सहकार्यातून लागवड पध्दत, मांडव, रूट स्टॉक आदींतील तंत्रज्ञानावरही
काम केले.
बेदाणा निर्मिती
सन १९७१ च्या काळात गरम पाण्यात द्राक्षे टाकून बेदाणा तयार केला जायचा. दरम्यान सुभाष यांनी १९७५ मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम. एस्सीची पदवी घेतली. सन १९९० मध्ये आर्वे यांना ज्ञानार्जनातून ऑस्ट्रेलियन पद्धतीने बेदाणा तयार करण्याचे तंत्र उमगले.
पुढील काळात याच पद्धतीने बेदाणा निर्मितीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कल वाढला.
द्राक्षबागेचे आजचे व्यवस्थापन
आर्वे सांगतात की पूर्वी मध्य आशिया, युरोपात ‘टेबल ग्रेप्स’ ची निर्यात केली. मात्र अलीकडील काळात प्रतिकूल निसर्गामुळे द्राक्षशेतीतील धोके वाढले आहेत. विक्रीतही आव्हाने आहेत. त्यामुळे बेदाणा निर्मितीकडे अधिक कल आहे. बेदाण्याला ज्या पद्धतीची द्राक्षे लागतात त्यानुसार फळ छाटणीचे नियोजन ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत केले जाते. प्रति वेलीवर ४० काड्या तर प्रति वेलीवर ५५ ते ६० पर्यंत घडांची संख्या ठेवली जाते.
प्रमुख वाण
तास-ए-गणेश, माणिक चमन, रेड ग्लोब, सुपर सोनाका व जंबो सीडलेस असे प्रमुख व्यावसायिक वाण आहेत. तर एकूण ६४ पर्यंत विविध वाणांचे संकलन केले आहे. आठ बाय सहा व दहा बाय सहा फूट अंतरावरील लागवडी आहेत. अंतर जास्त ठेवल्याने धुके, दव यांचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका कमी राहतो. वाणनिहाय ‘टेबल ग्रेप्स’ चे निर्यातक्षम उत्पादन एकरी १० ते १२ टनांपर्यंत तर बेदाण्यासाठीच्या द्राक्षांचे १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. टेबल ग्रेप्सला (व्हाइट) देशांतर्गत किलोला ३० ते ५० रुपये, कलर वाणांना ५० ते ६० रुपये जर बेदाण्यांना किलोला ८०, ९० ते कमाल २०० रुपयांपर्यंत दर मिळतो.
तंत्रज्ञानातील ठळक बाबी
स्वयंचलित हवामान केंद्र
सन २००७ मध्येच हवामानाविषयी संदेश देणाऱ्या तंत्रज्ञानाची यंत्रणा बागेत उभारण्यासाठी आर्वे यांनी प्रयत्न सुरू केले. आज त्यांच्याकडे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र व विविध सेन्सर्स आहेत. शेजारील काही गावांतील शेतकऱ्यांना या तंत्रज्ञान प्रणालीत सामावून घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी, माती, कीडनाशक फवारणी व एकूणच बागेचे प्रभावी व्यवस्थापन सुकर झाले आहे. किडी-रोगांचा अंदाज येतो. त्यातून अनावश्यक फवारण्या वाचून खर्चात बचत झाली आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनात वाढ झाली आहे. मातीतील ओलावा तपासण्यासाठी एक सेन्सर जमिनीपासून नऊ इंच तर दुसरा जमिनीपासून दीड फुटांवर लावला आहे.
--'क्लाऊड सिस्टिम’ मध्ये सर्व डाटा सुरक्षित साठवला जातो.
-मोटरमधून प्रति तास किती पाणी विसर्ग करते त्यानुसार मुख्य पाइपलाइन चार इंची व सबलाईन अडीच इंची असा वापर. प्रति तास ३५ हजार लिटर पाणी उचलण्यासाठी दोन इंची सहा तर खते देण्यासाठी एक इंचाचे चार व्हॉल्वज.
-प्रति वेलीला दोन ड्रिपर. वाफसा पाहून पाण्याचा विसर्ग.
-तंत्रवापरातून खतवापरात २० टक्के तर पाणीवापरात ५० टक्के बचत.
खरड छाटणीत १२ ते १४ हजार लिटर प्रति एकर प्रति दिन पाणी.
-त्यानंतर ३५ ते ३७ दिवसापर्यंत एकरी २४ हजार लिटर पाणी (प्रति दिन)
-त्यानंतर ३७ ते ७० दिवसांपर्यंत १३ हजार लिटर प्रति एकर पाणी (प्रति दिन)
सुभाष आर्वे- ९०११०११८५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.