Akola News : अकोला जिल्ह्यात गेल्या काळात झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी ३३२ कोटी ९६ लाख ९६ हजार २८८ रुपयांचा मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यासाठी ही मागणी २०७ कोटी ९२ लाखांची होती. त्यात सुमारे १२५ कोटींची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती धोरणानुसार ३ हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी हेक्टरी २७ हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टर तब्बल ३६ हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाचे आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३२ कोटी ९६ लाख ९६ हजार २८८ रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याआधी मात्र २०७ कोटी ९२ लक्ष ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यात आता १२५ कोटी ४ लाख ३१ हजार ५७८ रुपयांची भर पडली आहे.
जिल्ह्यात २६ नोव्हेंबर २०२३ च्या रात्रीपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ३२.६ मिमी तर २७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत २१.१ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली. यावेळी शेतांमध्ये कपाशीच्या क्षेत्रात वेचणीचा कापूस झाडांवर लदबदलेला होता. मजूर मिळत नसल्याने वेचणी झाली नव्हती. अचानक पाऊस आल्यामुळे तेव्हा हजारो क्विंटल कापूस भिजला.
तुरीचे पीक सोसाट्याचा वाऱ्यामुळे पडले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्याचा अंतिम अहवाल शासनाकडे दिला असून मदतीची मागणी करण्यात आली. त्यानुसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २०७ कोटी ९२ लक्ष ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.
परंतु शासनाने निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनादेश जारी झालेला असल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३२ कोटी ९६ लाख ९६ हजार २८८ मदत निधीची मागणी करण्यात आली आहे.
मदत वाढली
निकषानुसार याआधी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती. परंतु शासनाने हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढविले आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिरायती शेतीसाठी ८ हजार ५०० रुपये ऐवजी १३ हजार ५०० रुपये,
बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी आता ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
...असे आहे बाधित क्षेत्र
पावसामुळे फळ पिके सोडून एक लाख ३८ हजार १५७.१३ हेक्टरवरील जिरायती क्षेत्र बाधित झाले. एक लाख ६९ हजार ९६८ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून ७२९ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संबंधितांच्या मदतीसाठी १८७ कोटी ८९ लाख ३६ हजार ९६८ रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
४४ हजार ९०२.७२ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी १२१ कोटी २३ लाख ७३ हजार ४४० रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. ७७१ गावातील ६७ हजार १६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला.
६ हजार ६२१.८३ हेक्टरवरील फळ पिकाखालील क्षेत्र बाधित झाले असून त्याचा नऊ हजार २०४ शेतकऱ्यांना फटका बसला असून २५२ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संबंधितांच्या मदतीसाठी शासनाकडे २३ कोटी ८३ लाख ८५ हजार ८८० रुपयांच्या मदत मागण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.