Ravikant Tupkar Meets CM Devendra Fadnavis: शेतकरी कर्जमाफीसंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी (दि.१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कर्जमाफी योजनेतील जाचक निकष आणि अटी काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजनेत सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन दिल्याचे तुपकर यांनी सांगितले..सरसकट, विनाअट-विनाशर्त कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्याची मागणी करत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी विधानभवनासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर तुपकर यांना सरकारकडून चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार आज तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या मांडल्या. .या बैठकीनंतर माहिती देताना तुपकर म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांशी आमच्या शिष्टमंडळाची सुमारे अर्धा- पाऊण तास चर्चा झाली. आमच्या ज्या काही मागण्या मांडल्या; त्या त्यांनी सविस्तर ऐकून घेतल्या. कर्जमाफी योजनेतील जाचक निकष आणि अटी काढून टाकल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे. यावर काही मागण्यावर त्यांनी सकारात्मक दर्शवली. तुमच्या मागण्यांच्या अनुषंगाने योजनेत बदल करण्याची आमची तयारी आहे. सरकार कर्जमाफी योजनेत बदल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.''.Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ वितरित करण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी .तुम्हाला जसे अपेक्षित आहे तसे बदल करु, हा शब्द त्यांनी दिला आहे. या आठ- पंधरा दिवसांत सरकार काय भूमिका घेते ते पाहू?. जर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही. तसेच कर्जमाफी योजनेत बदल केले नाहीत तर हजारोच्या संख्येने शेतकरी मुंबईत येतील, असे आम्ही सांगितले. त्यावर त्यांनी तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे तुपकर यांनी नमूद केले..Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती; कोणत्या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफ होणार?.तुपकर यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या२०१९ च्या कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून २ ते ५ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी लागू करावी. एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करून २०२४-२५ चा रखडलेला पीकविमा द्यावा. ओटीएस योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात. २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे. पीककर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी. सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आदी पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा. बोगस बियाणे, खत व कीडनाशक कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. .कृषी अवजारे, ठिबक, स्प्रिंकलर व फळबाग योजनांचे रखडलेले अनुदान वितरित करावे. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी. शेतीसाठी पूर्वीप्रमाणे वीज जोडणी द्यावी. एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी. कांद्याला किमान ३० रुपये प्रतिकिलो दर मिळावा व निर्यातबंदी हटवावी. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात. सोयाबीन व कापसाच्या दरवाढीसाठी डीओसी निर्यातीस चालना देणे, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवणे आणि कापूस निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच केंद्राकडे ठोस पाठपुरावा करावा, अशा मागण्या तुपकर यांनी बैठकीत केल्या.तसेच सौर पंपाची जबरदस्ती न करता शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे वीज जोडणी द्यावी. बँकांकडून सक्तीचे कर्जाचे पुनर्गठन थांबवावे, अशीही मागणी त्यांनी केली..शेतकऱ्यांच्या कर्जाचे सातबारे, मागण्यांची पत्रके तसेच सोयाबीन आणि कापूस विधानभवन परिसरात फेकून त्यांनी काल सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. सरसकट, विनाअट-विनाशर्त कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही! असा इशारा त्यांनी दिला आहे..कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोलकाँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी कर्जमाफी योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख देत आहे. याचा अर्थ सरकारचे दिवाळे निघाले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची आहेत, असा आरोप त्यांनी केला. .शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी आमची भूमिका आहे. सरकार कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करुन देत आहे. सरकार वसुली अधिकारी झाले आहे. अगोदर हे कर्ज भरा नंतर तुमचे कर्ज आम्ही माफ करु, अशा अटी त्यांनी टाकल्या आहेत. केवळ २५ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. सरकारच्या योजनेत ७५ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असा दावा त्यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.