
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जलसमाधी आंदोलनासाठी बुधवारी (ता. २३) मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोयाबीन - कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात (Arabian Sea) जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार वाहनांच्या ताफ्यासह शेतकऱ्यांसमवेत तुपकर मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले आहेत.
बुलढाण्यातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरसमोरुन बुधवारी सकाळी ११ वाजता वाहनांचा ताफा मार्गस्थ झाला. ``सरकारकडून चर्चेसाठी कोणीही संपर्क साधलेला नाही. आता माघार नाही.
शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा आहे. सरकारने टोकाची भूमिका घेतली तर आम्ही शहीद व्हायला तयार आहोत. पोलिसांनी अडवाअडवी केल्यास रक्तपात होईल,`` असा इशारा तुपकर यांनी दिला.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थिर रहावा यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यासह इतर मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलन पुकारले आहे.
६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात आला. परंतु त्यानंतरही शासनाने ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत तुपकर यांनी थेट मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याची घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आम्ही सरकारला जागे करायला निघालो आहे. वास्तविक अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न यापूर्वी कुणीच केला नाही परंतु सरकार शेतकऱ्यांचा आवाह ऐकायला तयारच नसल्याने आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आता माघार नाही, २४ नोव्हेंबर रोजी मंत्रालयाच्या शेजारी मरीन ड्राईव्ह येथे अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.