Rajkumar Tangde : कर्ता शेतकरी : निर्मिती ते प्रस्तुती

Indian Agriculture : जालन्याजवळच्या जांब समर्थ गावाहून राजकुमार तांगडे येऊन पोहाचला. मी त्याच्या बरोबर राजकुमारबरोबर गप्पा मारल्या. आमच्या नियोजनाप्रमाणे साधारणपणे पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटांचे एकूण चाळीस एपिसोड्स आम्ही टप्प्याटप्प्याने शूट करणार होतो.
Rajkumar Tangde
Rajkumar TangdeAgrowon
Published on: 
Updated on: 

डॉ. आनंद नाडकर्णी

Dr. Anand Nadkarni : इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आय.पी.एच.) ही मनआरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत संस्था यंदा तेहतीस वर्षांची झाली. मानसिक स्वास्थ्यविषयक दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यासाठी बारा- तेरा वर्षांपूर्वी ‘आवाहन’ हा माध्यम विभाग जन्माला आला.

या विभागातर्फे जे यू-ट्यूब चॅनेल चालवले जाते, त्याचे नाव आहे ‘आवाहन आय.पी.एच.’ आज या विभागाकडे स्वतःचा स्टुडिओ, यंत्रसामग्री आहे. चित्रपटावर संकलन आणि तांत्रिक संस्कार करणारी पूर्ण यंत्रणा आहे. ध्वनिमुद्रण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आम्ही साधारण २५० फुटांचा स्टुडियो वापरतो, तो ‘कर्ता शेतकरी’साठीच्या सेटने सजायला लागला. ‘कर्ता शेतकरी’ प्रकल्पाचा लोगो सचिनने तयार केला. हिरव्या रंगाची पार्श्‍वभूमी असणाऱ्या सेटच्या लाकडी चौकटीसुद्धा आमच्या ऋषिकेश पांचाळ या तरुण नेपथ्यकाराने बनवल्या. योग्य ते लाइट्स योग्य जागी लागले. शूटिंग नसलेल्या दिवशी हीच जागा रंग बदलते आणि विद्यार्थ्यांच्या व्यवसाय कल - चाचण्यांसाठी वापरण्यात येते.

जालन्याजवळच्या जांब समर्थ गावाहून राजकुमार तांगडे येऊन पोहोचला. त्याच्याबरोबर ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती या संदर्भातली; परंतु ज्या ‘वेध’ उपक्रमामध्ये मी विलास शिंदेंची मुलाखत घेतली होती, तशाच एका उपक्रमामध्ये औरंगाबादला मी राजकुमारबरोबर गप्पा मारल्या होत्या.

आमच्या नियोजनाप्रमाणे साधारणपणे पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटांचे एकूण चाळीस एपिसोड्स आम्ही टप्प्याटप्प्याने शूट करणार होतो. सुवर्णा बोबडे आणि शिल्पा जोशी यांनी तयार केलेली पहिल्या पाच प्रकरणांची संहिता (स्क्रिप्ट) हातात होती.

मी आणि राजकुमार स्क्रिप्ट घेऊन बसलो. मोठ्याने वाचायला लागलो. पाच मिनिटानंतर दोघांनी एकमेकांकडे पहिले... आमच्या दोघांच्याही डोळ्यांतले भाव सारखेच होते. ‘‘या संहितेमधले मुद्दे आणि त्यांचा क्रम तसाच ठेवून आपण उत्स्फूर्तपणे बोलत गेलो तर..’’ ही आमची भूमिका ठरली.

म्हणजे आपल्या गप्पा प्रेक्षकांना अकृत्रिम वाटतील आणि तरीही मानसिकतेबद्दलचे मुद्दे मात्र एक-एक करून सलग क्रमाने मांडता येतील. आमचा पहिला भाग होता ‘कर्ता शेतकरी’ म्हणायचे कोणाला? आणि दुसरा भाग मन म्हणजे काय?

Rajkumar Tangde
Dr. Anand Karve : ज्ञान आणि संशोधनाच्या मार्गाने वाटचाल करणारी ‘आरती’

आम्ही दोघांनी आमच्या संवादाचा ‘फ्लो’ एका कागदावर लिहून घेतला आणि ‘एपिसोड क्रमांक एक’ला सुरुवात झाली... कॅमेरा रेडी... साउंड रोलिंग... ‘कर्ता शेतकरी’ एपिसोड वन, टेक वन... ॲक्शन!

या क्षणापासून माझी आणि राजकुमारची ‘स्पेस’ सुरू झाली. ठरविलेल्या चाळीस भागांमध्ये दोन भागांची भर पडली. परंतु आमच्या संवादाची लय कोणत्याही भागात ‘हलली’ नाही. एकूण आठ दिवस, ऐंशी तास आणि एकवीस तासांहून जास्त लांबीचे बेचाळीस भाग.

दृकश्राव्य माध्यमामध्ये वावरायला लागून आता चार दशके लोटली मला. त्याचा एक फायदा असा, की घड्याळाकडे न पाहता मला सरकणाऱ्या वेळेचा अंदाज असतो. मी सत्तावीस मिनिटे ही कालमर्यादा असेल, तर तीस ते चाळीस सेकंदांच्या ‘इकडेतिकडे’मध्ये थांबू शकतो.

हाच हिशेब मी दोन मिनिटांच्या ‘बाईट’मध्येही हलू देत नाही, या ‘आजीचा घड्याळा’चे राजकुमाराला इतके अप्रूप, कौतुक वाटले, की पुढेपुढे एपिसोडचा ‘टेम्पो’ तो माझ्यावर सोडून द्यायचा.

आमच्या ‘उत्स्फूर्त’ बोलण्याचे त्या क्षणीच लेखी स्वरूपात डॉक्युमेंटेशन होणे महत्त्वाचे होते. प्रत्यक्ष शूटिंग सुरू असताना एकवीस-बावीस तासांची ही टिपणे काढली आमची सहकारी वैदेही भिडेने. अठराव्या एपिसोडमध्ये आलेले एखादे उदाहरण छत्तिसाव्या भागात डोकावता कामा नयेत, यासाठी ही बाजू फारच महत्त्वाची होती.

अशा प्रकारे ‘आवाहन’चे एकूण चार सदस्य आणि आम्ही दोघे, अशा फक्त सहा जणांची ही टीम सगळीच कामे करत होती. सचिन -शैलेश आणि ऋषिकेश तर सामान लावणे, काढणे, पॅक करणे, अनपॅक करणे, असे सगळेच कष्टाचे काम करायचे.

आमच्या संस्थेचे व्यवस्थापकीय काम पाहणारा माझा मित्र मंगेश बाणे शूटिंगचीही व्यवस्था पाहायला यायचा. माझी पत्नी डॉ सविता, आमचे शूटिंग पाहायला यायची आणि तिचे विणकाम करत बसायची. राजकुमारने तिचे नाव ठेवले ‘वीणा वर्ल्ड... नि शब्द.’ म्हणजेच चोख काम करता करता आम्ही धमालही सतत करायचो.

व्यसनाधीन व्यक्तींच्या पत्नींनी चालवलेला ‘सहचारी स्वादम’ हा सहकारी किचनचा उपक्रमही आमची संस्था राबवते. त्यांच्यातर्फे आम्हाला रुचकर नाश्‍ता-भोजन मिळायचे. आमचे ‘टेक’ चालू झाले, की कधी कधी आसमंतातल्या फेरीवाल्यांना अगदी ऊत यायचा.

आमचा स्टुडिओ, संपूर्ण व्यावसायिक स्टुडिओइतका ‘साउंडप्रूफ’ नाही. कधी नंदीबैल यायचा शेजारचा रस्त्यावर, तर कधी पॉम पॉम असा हॉर्न वाजवत इडलीवाला यायचा... अशा वेळी वृत्तीचे समत्व ढळू न देणे, हा मोठाच भावनिक व्यायाम.

पहिल्या दोन दिवसांच्या शूटिंगमध्ये आम्ही चक्क आठ भाग प्रत्यक्षात आणू शकलो. आत्मविश्‍वास वाढला. आता पुढचा कसोटीचा प्रसंग होता ‘मुलगी’ दाखविण्याचा.

शूटिंग संपलं, की मी आणि राजकुमार लगेचच आपापल्या वाटांना लागायचो; पण उरलेली टीम मात्र एडिटिंगच्या टेबलवर स्वतःला जुंपून घ्यायची. प्रत्यक्ष दिसणारा साधारण अर्ध्या तासाचा एक भाग तयार व्हायला कधी चौदा तास लागायचे, तर कधी सोळा. त्यातील रेखाचित्रे, ग्राफिक्स हे सारे ह्याच टीमने बनवले.

शीर्षकगीत रेकॉर्ड झाल्यावर त्याचे दृश्यरूप म्हणजे ‘मोंटाज‘सुद्धा बनवला आणि आमची उपवर मुलगी अर्थात ‘तयार’ झालेले सहा एपिसोड्स ‘पाहायला’ ‘सह्याद्री फार्म्स’चे विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी संस्थेच्या केंद्रात पोहोचले.

स्टुडिओचा पसारा आहे तिथून काही मिनिटांच्या अंतरावर आय.पी.एच. उपक्रम केंद्र आहे. तीन मजल्यांच्या या जागेत रोज शेकडो कुटुंबे मनआरोग्याचा सल्ला घेण्यासाठी येतात. एका मजल्यावर आमचा प्रशिक्षणाचा हॉल आहे, तिथे हा ‘समारंभ’ व्हायचा होता.

पहिल्या दोन भागांमध्येच जेव्हा हे ‘खास’ प्रेक्षक हसून दाद द्यायला लागले, तेव्हा वधुपक्षीयांचा जीव भांड्यात पडू लागला. ‘मुलगी पसंत आहे’, हे कळले. काही गोष्टी अधिक चांगल्या कशा करता येतील, यावर चर्चा झाली आणि ‘सह्याद्री फार्म्स’च्या चमूने आम्हाला आर्थिक बळासोबत मोलाचे भावनिक बळही दिले.

Rajkumar Tangde
Unseasonal Rain News : शेतकरी अवकाळीने हैराण

स्टुडिओमधल्या एकाच पार्श्‍वभूमीवर भाग चित्रीत होत होते. त्यामध्ये नावीन्य आणण्यासाठी मी आणि राजकुमार ‘भूमिकानाट्य’ म्हणजे ‘रोल प्ले’ वठवत होतो. एक आयडिया डोक्यात आली, की निसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ‘लोकेशन’ शूटिंग का करू नये? आमचीच एक मनोविकारतज्ज्ञ सहकारी डॉ. अनघा वझे आणि तिचे पती गिरीश वझे यांचा एक प्रशस्त शेतीप्रकल्प ठाणे जिल्ह्यात वाडा-मनोर परिसरात आहे.

ती जागा पाहण्यासाठी सचिन आणि शैलेश जाऊन आले. नदीकाठावरचे फार्म हाऊस... शांत आसमंत, भरगच्चं झाडी... आम्हाला सहा-सात ‘जागा’ सापडल्या. त्यातली एक जागा इनडोअर होती; पण काचेच्या मोठ्या खिडक्या असल्याने त्याला वेगळा ‘फील’ होता.

आमचे सारे युनिट तीन दिवसांसाठी या लोकेशनवर पोहोचले. ‘आवाहन’ टीमची धावपळ आणि नियोजन अनेक पटींनी वाढले. नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करणे, हे वेगळे तंत्र. मात्र उत्साह आणि योजकता या बळावर आम्ही एकूण बारा भाग या निसर्गरम्य वातावरणात चित्रीत केले.

आता एपिसोडस तयार होत होते. एका बाजूने एडिटिंग सुरू झाले होते. आम्ही बेचाळिसावा म्हणजे शेवटचा भाग पूर्ण केला आणि एका विलक्षण समाधानामध्ये सारेच एकमेकांसोबत स्तब्ध, निवांत शांततेमध्ये बसलो. केलेल्या संकल्पामधला एक टप्पा पार पडला होता.

आता ही प्रस्तुती घेऊन पुढे जायचे होते, या कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी. ‘सह्याद्री’मधले प्रमोद राजेभोसले आणि सहकारी यांच्यासोबत बैठका होऊ लागल्या. दिनांक १ मे २०२२ रोजी, ‘सह्याद्री फार्म्स’च्या परिसरामध्ये निवडक शेतकरी कार्यकर्त्यांसाठी होणार होता ह्या चित्रपटमालिकेचा ‘प्रीमियर’, अर्थात मुहूर्ताचा शो!

संपर्क : kartashetakari@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com