डॉ. अभय गेडाम, डॉ. आर.के. सोनकर, डॉ. ए. थिरुज्ञानवेल, डॉ. ए. के. दासRaised Bed Planting: लिंबूवर्गीय फळबागेत जास्त काळ पाणी साचून राहिल्यास ‘फायटोप्थोरा’ बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीच्या मूळ पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी गादीवाफा लागवड तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या पद्धतीमध्ये झाडांची लागवड गादीवाफ्यावर केली जाते. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे अतिरिक्त पाणी मुळांच्या कक्षेत साचून न राहिल्याने फायटोप्थोरा रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. .लिंबूवर्गीय फळबाग क्षेत्रात मागील काही वर्षांत अतिरिक्त पाण्यामुळे आणि बुरशीजन्य रोगांमुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे. पारंपरिक पद्धतीने लिंबूवर्गीय फळबागांची साध्या सपाट जमिनीवर लागवड केली जाते. लागवड काळ्या, कसदार आणि भारी चिकणमातीच्या जमिनीत केल्यास अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यातील सलग पाऊस किंवा सिंचनाचे (मोकाट पाणी) जास्त पाणी दिले गेल्यास, या बागेत झाडांच्या मुळांच्या कक्षेत अनेक दिवस पाणी साचून राहते. .Pomegranate Farming Management: डाळिंबावरील तेलकट रोग नियंत्रणासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे .पाणी जास्त काळ साचून राहिल्यास मातीतील हवेचे (ऑक्सिजनचे) प्रमाण ८ टक्क्यांहून खाली जाते. त्यामुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्याचा थेट परिणाम दिसून झाडांच्या वाढीवर दिसून येतो. तसेच ‘फायटोप्थोरा’ बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढायला सुरुवात होते. याचे परिणाम मूळकूज (रूट रॉट) आणि फूट रॉट किंवा खोडावरील डिंक्या अशा दोन प्रकारे दिसून येतात..या समस्येवर केवळ रासायनिक फवारणी हा अंतिम आणि कायमस्वरूपी उपाय नाही. प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीच्या मूळ पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. नागपूर येथील आयसीएआर-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या संशोधनात ‘गादीवाफा’ लागवड तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे समोर आले आहे. या पद्धतीमध्ये झाडांची लागवड सपाट जमिनीवर न करता गादीवाफ्यावर केली जाते. त्यामुळे मुळांच्या कक्षेत पाणी साचून राहत नाही आणि फायटोप्थोरा रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही. परिणामी फायटोप्थोरा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते..मूळकूजमूळकूजीचा प्रादुर्भाव मुख्यतः झाडाच्या पांढऱ्या तंतूमय मुळांवर दिसतो. ही मुळे जमिनीतून अन्न आणि पाणी शोषून घेण्याचे मुख्य काम करतात. या बुरशीच्या संसर्गामुळे मुळांचे बाहेरील आवरण (कॉरटेक्स) मऊ आणि पाण्याने भरल्यासारखे होते आणि कुजते. काही दिवसांतच हे कुजलेले आवरण गळून पडते आणि आत फक्त पांढरा दोऱ्यासारखा गाभा शिल्लक राहतो. तंतू मुळे नष्ट झाल्यामुळे झाडाची पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी झाडाच्या वरील भागाला पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे झाडाची पाने फिक्कट हिरवी किंवा पिवळी पडतात आणि गळून पडतात. नवीन पालवी फुटण्याची क्रिया थांबते, फांद्या वरील बाजूकडून खालील दिशेने वाळायला लागतात, फळांचा आकार लहान राहतो आणि उत्पादनात मोठी घट होते. प्रादुर्भावग्रस्त झाड हळूहळू कमकुवत होते..फूट रॉट किंवा खोडावरील डिंक्याया बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जमिनीलगतच्या मुख्य खोडावर किंवा मुकुटावर होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडे नष्ट होण्याची शक्यता असते. ही बुरशी खोडावरील नैसर्गिक भेगांमधून किंवा जखमांमधून आत प्रवेश करते. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला खोडाच्या सालीवर गडद, ओले डाग दिसू लागतात. या सालीला भेगा पडून त्यातून काळ्या किंवा तपकिरी रंगाचा डिंकासारखा चिकट द्रव बाहेर येतो. त्याला असे ‘डिंक्या’ म्हटले जाते. कालांतराने ही साल कोरडी पडून फाटते. तसेच आजूबाजूच्या निरोगी सालीपासून वेगळी होऊन दुमडते आणि आतील लाकूड उघडे पडते. संपूर्ण खोडावर प्रादुर्भाव झाल्यामुळे झाडाच्या अन्नवहन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी संपूर्ण झाड काही महिन्यांत किंवा वर्षांत वेगाने सुकून नष्ट होते..Orange Cultivation: इंडो-इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड.संशोधनातील निष्कर्षफायटोप्थोरा सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपूर येथील ‘आयसीएआर-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थे’च्या अभ्यासात ‘गादीवाफा’ लागवड तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे समोर आले आहे. या पद्धतीमध्ये झाडांची लागवड सपाट जमिनीवर न करता, गादीवाफ्यावर केली जाते. गादीवाफा पद्धतीत दोन वाफ्यांमधील चरांमधून पावसाचे किंवा सिंचनाचे अतिरिक्त पाणी सहजपणे बागेबाहेर वाहून जाते. त्यामुळे मुळांच्या कक्षेत पाणी साचून राहत नाही. पोषक वातावरण निर्मिती न झाल्याने फायटोप्थोरा बुरशीला अटकाव घातला जातो. हा रचनात्मक बदल बागेच्या सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो..कलम लागवडीवेळी घ्यायची काळजीकलमाचा जोड हा जमिनीच्या (मातीच्या) पातळीपासून किमान ६ इंच वर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. कलमाचा जोड मातीत गाडला गेल्यास किंवा त्याला सिंचनाचे पाणी लागल्यास फायटोप्थोरा बुरशीचा थेट संसर्ग होऊन डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कलम लागवडीवेळी खड्ड्यात थेट रासायनिक दाणेदार खतांच्या मात्रा देऊ नयेत. रासायनिक खतांचा मुळांशी थेट संपर्क आल्यास मुळे खराब होऊ शकतात..गादीवाफा पद्धतीचे फायदेफायटोप्थोरासाठी सतत ओलावा आणि साचलेले पाणी असे वातावरण आवश्यक असते. गादीवाफा पद्धतीत दोन वाफ्यांमध्ये खोल चर असतात. भारी पावसाळ्यात किंवा सिंचनाचे अतिरिक्त पाणी वाफ्यावर न थांबता थेट या चरांमध्ये जमा होऊन बागेबाहेर निघून जाते. यामुळे झाडांची मुळे पाण्यात बुडून नाहीत आणि बुरशीला आवश्यक ओलसर वातावरण उपलब्ध होत नाही.गादीवाफ्यावरील माती भुसभुशीत राहत असल्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत हवा खेळती राहते. मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मुळांची वाढ वेगाने होते.डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जमिनीलगतच्या खोडावर होतो. गादीवाफा लागवडीत उंचावर लागवड केल्यामुळे आणि कलमाचा जोड मातीपासून वर ठेवल्यामुळे पावसाचे पाणी किंवा माती उडून झाडाच्या खोडाच्या संपर्कात येत नाही. तसेच ठिबक सिंचनाचे पाणी खोडाला न लागता लांब पडत असल्याने, झाडाचे मुख्य खोड कोरडे राहते आणि डिंक्या रोगाचा थेट संसर्ग टळतो..सिंचन, खत व्यवस्थापनगादीवाफ्यावर झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत ठिबकमुळे सिंचनाच्या पाण्यात ६१ टक्क्यांपर्यंत बचत होते. ठिबक सिंचनाचा अवलंब करताना झाडाच्या दोन्ही बाजूंनी ठिबकच्या दोन नळ्या (डबल लॅटरल)चा वापर करावा. यामुळे झाडाच्या मुळांच्या क्षेत्रात चारही बाजूंनी समान पाणी मिळते.ठिबकच्या तोट्या खोडापासून साधारण ३० सेंमी (१ फूट) अंतरावर असाव्यात. जेणेकरून झाडाच्या मुख्य खोडासोबत पाण्याचा संपर्क होणार नाही.ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिल्यास ती थेट मुळांच्या कक्षेत पोहोचतात..आंतरपिके आणि मल्चिंगदोन गादीवाफ्यांमधील मोकळ्या जागेत (चरांमध्ये) वांगी, टोमॅटो, भेंडी, कोबी यांसारखी भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. यामुळे सुरुवातीच्या वर्षांत बागेतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते..गादीवाफा पद्धतीने लागवडसर्वप्रथम जमिनीची उभी-आडवी खोल नांगरणी करून जमीन सपाट करून घ्यावी.ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन ओळींच्या मध्ये चर खोदून माती मध्यभागी ओढली जाते. आणि उंचवटा तयार केला जातो. या गादीवाफ्याची तळातील रुंदी ३ मीटर (१० फूट) आणि उंची ५० सेंटीमीटर (दीड फूट) इतकी असावी. त्यामुळे दोन वाफ्यांच्या मधील चरांमुळे पावसाचे किंवा अतिरिक्त सिंचनाचे पाणी थेट बागेबाहेर वाहून जाते..पारंपारिक पद्धतीत ६ बाय ६ मीटर अंतरावर लागवड केली जाते. परंतु गादीवाफ्यावर सघन लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी दोन ओळींतील अंतर ६ मीटर आणि दोन झाडांतील अंतर ३ मीटर (६ बाय ३ मीटर) ठेवावे. सघन लागवडीतून सुरुवातीच्या वर्षांपासूनच विक्रमी उत्पादन घेणे शक्य होते.या अंतरामुळे एका एकरांत दुप्पट झाडे म्हणजेच सुमारे २२० झाडे बसतात. मुळांच्या वाढीसाठी वाफ्यात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होत असल्याने सुरुवातीपासूनच अधिक उत्पादन मिळते.- डॉ. आर. के. सोनकर, ९५११७९७३१५(प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.