Solapur News : जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अधिक आशा आहेत. सध्या काही भागात पेरण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार ९४१ हेक्टर (२४.५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा ज्वारी, गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा प्रामुख्याने खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण रब्बी हा जिल्ह्याचा मुख्य हंगाम राहिला आहे. गेल्या काही वर्षात पावसाच्या असमान हजेरीमुळे या दोन्हीही हंगामात आता पिकांचे क्षेत्र होत आहे. यंदा खरिपात शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
विशेषतः काढणीस आलेल्या उडीद, सोयाबीन, मूग या पिकांना त्याचा फटका बसला. त्यामुळे आता रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना आशा वाढल्या आहेत. अनेक भागात सध्या पुरेसा वाफसा आल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे. जिल्ह्याचे या हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६० हजार ९१८ हेक्टर आहे.
त्यापैकी १ लाख १२ हजार ९४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची सर्वाधिक ७८ हजार ४५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर गव्हाची १००३ हेक्टरवर, हरभऱ्याची ११ हजार १९३ हेक्टर आणि मक्याची २१ हजार ८०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
त्याशिवाय इतर तृणधान्यांची ८७ हेक्टर आणि इतर कडधान्यांची १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक ज्वारीचीच पेरणी होते, पण एकूण पाण्याची उपलब्ध परिस्थिती आणि वातावरणाचा विचार करता, यंदा पुन्हा ज्वारीसह गहू आणि हरभऱ्याची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय झालेली पेरणी
उत्तर सोलापूर- ५ हजार १३८, दक्षिण सोलापूर- १७ हजार ९७७ हेक्टर, बार्शी-५ हजार २९७, अक्कलकोट-९ हजार ८६१, मोहोळ-५ हजार ८३४, माढा-८ हजार १३१, करमाळा-९ हजार ३०२, पंढरपूर-३ हजार १०, सांगोला-१७ हजार ३११, माळशिरस-९ हजार ८४७, मंगळवेढा-२१ हजार ३२ (१ लाख १२ हजार ९४१).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.