Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये यंदा (२०२३-२४) रब्बी हंगामात ४ लाख ६७ हजार २०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांत यंदा आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे २६५.८ व ७४.७ मिलिमीटर पावसाची तूट आली आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा उडून जात आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली नाही.
सिंचन स्रोतांना पुरेसे पाणी उपलब्ध नाही. परिणामी यंदा या दोन जिल्ह्यांतील ओलितांच्या गहू, हरभरा पिकांच्या पेऱ्यात घट तर तुलनेने कमी पाणी लागणाऱ्या ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. एकूण रब्बीचा पेरणी क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत कमीच राहणार आहे. या दोन जिल्ह्यांत सुमारे १६ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ४० हजार ९७७ हेक्टर आहे. गतवर्षी (२०२२-२३) रब्बीत २ लाख ९५ हजार ४६२ हेक्टरवर (१०९.११ टक्के) पेरणी झाली होती. यंदा २ लाख ८७ हजार २०० हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. हिंगोली जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये १ लाख ८२ हजार १५० हेक्टरवर रब्बी पेरणी झाली होती. यंदा १ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
यंदा परभणीसाठी ५७ हजार ३६३ क्विंटल व हिंगोलीसाठी ५७ हजार ६६८ क्विंटल असे दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीज व खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे. परभणीत सुमारे १५ हजार क्विंटल तर हिंगोलीत १ हजार ५०० क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे.
परभणीसाठी १ लाख ७ हजार ३०० टन व हिंगोलीसाठी ७० हजार २०६ टन असे दोन्ही जिल्ह्यांत मिळून १ लाख ७७ हजार ५०६ टन विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून २२ हजार टन खते शिल्लक आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पावसाची तुट, भूजल पातळी खालावली
परभणी जिल्ह्यात सरासरी ७८८.८ अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५२३ मिलिमीटर (६६.७ टक्के) पाऊस झाला आहे. यंदा २६५.८ मिलिमीटर पावसाची तूट आली आहे. हिंगोलीत सरासरी ८१८.१ मिलिमीटर अपेक्षित असताना ७४३.७ मिलिमीटर (९०.९ टक्के) पाऊस झाला. ७४.७ मिलिमीटरीची तूट आहे.
परभणीतील लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. विहिरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे येत्या काळात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहिल. हिंगोलीत येलदरी-सिद्धेश्वर तसेच इसापूर धरणाची पाणी आवर्तने मिळू शकतील.
तापमानात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. खरीप पिकांच्या काढणीला आणखी काही दिवस लागू शकतात. ओलावा उडून गेलेल्या जिरायती जमिनीवर यंदा पेरणी शक्य होणार नाही.
यंदाची पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)
बुधवार (ता. ११ पर्यंत)
जिल्हा अपेक्षित सरासरी पाऊस पडलेला पाऊस टक्केवारी तूट मिलिमीटर
परभणी ७८८.८ ५२३.० ६६.३ २६५.८
हिंगोली ८१८.१ ७४३.७ ९०.९ ७४.७
पीकनिहाय प्रस्तावित रब्बी पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा
ज्वारी १०१०००० ८१५६२
गहू ३०००० ३००००
हरभरा १५१००० १३८८९१
करडई १९५० १०६३
सूर्यफूल १००० ४००
मका १७०० ९०९
इतर ५५० ३००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.