Agriculture Warehouse : गोदाम परवाना कायद्यातील तरतुदी तुम्हाला माहित आहेत का?

Maharashtra Warehouse License Act : मुंबई वखार कायदा १९५९ मधील अधिनियम ५ सन १९६० या कायद्यामधील मापाड्या, सॅम्पलर आणि ग्रेडर यांच्या कामकाजाबाबत व तरतुदीबाबत त्याचप्रमाणे गोदाम व्यवसाय करताना वजन, मापे, तसेच गोदाम चालू ठेवण्याच्या वेळा इत्यादीबाबत गोदाम व्यावसायिकास माहिती आवश्यक आहे.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon
Published on
Updated on

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse Act News : शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटाचे फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्थांनी विविध योजनांमधून उभारलेल्या गोदामांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करण्यासाठी गोदाम भाड्याने देऊन त्यातून कर्जाचे हप्ते भरणे शक्य होणार नाही.

त्याकरिता गोदाम पावतीच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करण्यासाठी व राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्जासाठी गोदाम परवाना सहकार विभागांतर्गत कार्यरत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून घेणे आवश्यक आहे.

याकरिता मुंबई वखार कायदा १९५९ मधील अधिनियम ५ सन १९६० अन्वये गोदाम व्यवसाय करताना खालील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच मुंबई वखार कायद्याचे आकलन आवश्यक आहे.

मुंबई वखार कायदा १९५९ मधील अधिनियम ५ सन १९६० या कायद्यामधील मापाड्या, सॅम्पलर आणि ग्रेडर यांच्या कामकाजाबाबत व तरतुदीबाबत त्याचप्रमाणे गोदाम व्यवसाय करताना वजन, मापे, तसेच गोदाम चालू ठेवण्याच्या वेळा इत्यादीबाबत गोदाम व्यावसायिकास माहिती असणे आवश्यक असून त्या नियमांचे गोदाम व्यवसाय करताना काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदामातील मापाड्या, सॅम्पलर, ग्रेडरसाठी नियमावली

मध्यस्थी करणाऱ्या संचालक मंडळाची किंवा लवादाची किंवा पंचाची नियुक्ती करणे :

मापड्या, सॅम्पलर व ग्रेडर यांच्या गोदामामध्ये साठवलेल्या मालाचे वजन, दर्जा किंवा ग्रेडशी संबंधित कामकाजाविरुद्ध लेखी तक्रार मिळाल्यावर यापैकी प्रत्येकाला व विवादातील पक्षकाराला लवादाची किंवा मध्यस्थाची किंवा पंचाची नियुक्ती करण्यासाठी विहित प्राधिकारी नोटीस जारी करेल.

नोटीस जारी केल्यापासून १५ दिवसांचे आत लवादाची नेमणूक करणे क्रमप्राप्त आहे. परंतु जर या कालावधीत यापैकी कोणीही लवादाची नियुक्ती करण्यात अयशस्वी ठरला तर विहित प्राधिकरण त्यांच्या वतीने लवादाची नेमणूक करेल.

तसेच विहित प्राधिकरणामार्फत त्रयस्थ लवादसुद्धा नेमण्यात येईल, की जो अध्यक्ष म्हणून मध्यस्थ मंडळाच्या/लवाद मंडळाच्या वतीने कामकाज करेल.

बोर्ड ऑफ आर्बिट्रेटर्सची नेमणूक प्रक्रिया आणि अंमलबजावणी पद्धत :

लवाद कायदा, १९४० अन्वये लवादासमोर कामकाज चालविताना मध्यस्थ मंडळ कायद्यातील पद्धतीनुसार विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करेल. अध्यक्षांनी स्वाक्षरी केलेल्या प्रमाणपत्रावर बोर्डाने मंजूर केलेला प्रत्येक निवाडा, दिवाणी न्यायालयाच्या डिक्रीप्रमाणेच अंमलात आणला जाईल.

वेअरहाउसमनला वजन, ग्रेड किंवा वस्तूंचा वर्ग निर्धारित करण्याबाबतचा अधिकार :

ज्या भागात गोदाम व्यवसाय करताना परवानाधारक मापड्या, ग्रेडर, किंवा सॅम्पलर उपलब्ध नसेल त्या भागात अधिनियमांतर्गत, वेअरहाउसमन अथवा गोदाम परवानाधारकास गोदाम पावतीवर मालाचे वजन, गुणवत्ता किंवा ग्रेड ठरविण्याचा अधिकार असेल.

परवानाधारक गोदामाच्या साइन बोर्डचे प्रदर्शन :

गोदामाचा परवाना असलेला गोदामधारक गोदाम असलेल्या प्रत्येक गोदामासाठी गोदाम परवाना बाबत स्वतंत्र साइन बोर्ड ठळकपणे दर्शनी भागावर प्रदर्शित करेल.

तपासणी :

कायद्यानुसार कलम २३ अंतर्गत गोदामाच्या तपासणीवर, विहित केलेले अधिकारी गोदामाच्या मालकाला गोदाम व्यवसायाच्या कार्यक्षम कामकाजासाठी सूचना देऊ शकतात.

जर गोदाम चालकाने किंवा मालकाने सूचनेनुसार कामकाज करण्यास दुर्लक्ष केले किंवा ते पार पाडण्यात अयशस्वी झाले, तर गोदाम व्यवसाय करणारा गोदाम व्यवसाय करण्यास अकार्यक्षम आहे असे विहित प्राधिकरण घोषित करू शकेल.

परवान्यांची नोंद ठेवण्यासाठी विहित प्राधिकारी :

विहित प्राधिकरण जारी केलेल्या परवान्यांची नोंद ठेवेल, त्याद्वारे परवान्याचे नाव, परवाना क्रमांक, परवान्याचे स्वरूप, परवाना जारी करण्याची तारीख, परवाना निलंबित करणे किंवा रद्द करण्याची तारीख याबाबत त्यातील प्रत्येक बाबीची नोंद विहित प्राधिकरणाद्वारे प्रमाणित असेल.

या करिता एक स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येणे अपेक्षित असून विहित केलेल्या परवान्यांच्या डुप्लिकेट प्रतीसाठी विहित प्राधिकरणामार्फत अशा प्रकारे नोंदवही जतन करून ठेवणे आवश्यक असून कार्यालयातील कोणतीही व्यक्ती अशा नोंदणीची तपासणी करू शकते.

गोदाम परवान्यांचा परतावा :

कायद्यांतर्गत दिलेला परवाना कालबाह्य झाल्यास आणि त्याचे नूतनीकरण न केले गेल्यास किंवा सदर परवाना रद्द केला गेल्यास, तो परवाना सात दिवसाच्या आत विहित प्राधिकरणाकडे परत करण्यात यावा.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम पावतीविषयक विमा महत्त्वाचा...

भागीदारी फर्म होल्डिंग लायसन्सचे विघटन :

जेथे भागीदारी फर्मकडे गोदाम परवाना आहे, परंतु जर सदर फर्म विसर्जित करण्यात आली तर त्याबाबत एका आठवड्याच्या आत विसर्जनाचा अहवाल, विहित प्राधिकरणाकडे पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर विहित प्राधिकारी सदर परवाना भागीदार फर्म अथवा फर्ममधील भागीदार यापैकी कोणाच्या नावाने ठेवायचा किंवा नाही ते ठरवेल.

गोदाम मालकाद्वारे अथवा गोदाम चालकाद्वारे मानांकित/प्रमाणित वजने आणि मापांचा वापर :

गोदामाच्या मालकाने फक्त असे तराजू, वजने आणि मापे वापरावीत, की जी वजन किंवा मापन यंत्रे यथायोग्य/प्रमाणित/ मानांकित आहेत, जेणेकरून मुंबई वजन आणि मापे कायदा, १९३२ किंवा इतर कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत राज्याच्या कोणत्याही भागात लागू असलेल्या मुंबई कायद्याशी संबंधित नियुक्त केलेल्या निरीक्षकाद्वारे सदर मापे योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळू शकेल.

गोदामांद्वारे अहवालाचा पुरवठा :

प्रत्येक गोदामधारकाने विहित प्राधिकरणाद्वारे संबंधित गोदामाची परिस्थिती, तेथील उपलब्ध सामग्री व गोदामात राबविण्यात येणाऱ्या प्रक्रिया याबाबत वेळोवेळी आवश्यक असेल असा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

मुंबई वखार कायदा १९५९ मधील अधिनियम ५ सन १९६० अन्वये सर्व नियमांच्या प्रारंभावर, मुंबई वेअरहाउस नियम, १९४९ आणि त्यांच्याशी संबंधित इतर सर्व नियम लागू आहेत.

गोदामांचे कामकाजाचे तास

व्यवहारासाठी प्रत्येक गोदाम दिवसाचे किमान ८ तास उघडे असणे आवश्यक असून, त्यानुसार ते उपलब्ध करून देण्यात यावे. याकरिता गोदाम सेवांचा कालावधी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत असावा.

परंतु गोदामधारक विहित प्राधिकरणाने नेमून दिलेल्या जसे की साप्ताहिक, राष्ट्रीय किंवा इतर सुट्ट्या ज्या या निमित्ताने मंजूर केल्या आहेत त्या पाळू शकेल किंवा त्या सुट्ट्या घेण्यास गोदामचालकास परवानगी असेल.

नोटीस देण्याची पद्धत :

(१) परवाना रद्द करण्यासाठी देण्यात येणारी नोटीस उपकलम (१)च्या पोटकलम ९ अंतर्गत देण्यात येऊन तिचा कालावधी एक आठवड्यापेक्षा कमी असेल आणि सदर नोटीस नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाईल. जर गोदामधारकाने एका आठवड्याच्या आत विहित प्राधिकरणाने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर न दिल्यास त्याच्याकडून विहित केलेल्या पावतीबाबत प्राधिकरण या प्रकरणाचा पूर्वपक्ष निर्णय घेईल.

(२) उपकलम (१)च्या पोटकलम १६ अन्वये ठेवीदाराला देण्यात येणारी नोटीस एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी असून, ती नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाईल. अशी नोटीस ज्यांना मालमत्तेत स्वारस्य आहे अशा सर्व व्यक्तींना दिली जाईल.

संपर्क - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०, (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com