Fish Farming : तिलापिया मत्स्य्यशेतीने दिला अल्पभूधारकास आर्थिक आधार

Fish Farmer Success Story : सातारा जिल्ह्यातील चंचळी येथील लहू कुंभार एकेकाळी ट्रकचालक होते. त्यांची केवळ दोन एकर शेती. मात्र सर्व अडचणींवर मात करून त्यांनी शेततळ्यातील मत्स्य्यपालनाचा पर्याय निवडला.
Fish Farming
Fish FarmingAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Tilapia Fish Farming : सातारा जिल्ह्यातील चंचळी येथील लहू कुंभार एकेकाळी ट्रकचालक होते. त्यांची केवळ दोन एकर शेती. मात्र सर्व अडचणींवर मात करून त्यांनी शेततळ्यातील मत्स्य्यपालनाचा पर्याय निवडला. आठ गुंठ्यांत उभारलेल्या या व्यवसायातून शास्त्रीय व व्‍यावसायिक पद्धतीने तिलापिया माशांचे उत्पादन करीत अर्थकारणाला चांगली स्थैर्यता आणली आहे.

सातारा जिल्ह्यातील चंचळी (ता. कोरेगाव) हे सुमारे १२०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात सर्वाधिक ऊसपीक घेतले जाते. गावातील अल्पशिक्षित लहू परशुराम कुंभार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची अवघी दोन एकर शेती आहे. त्यातून उदरनिर्वाह शक्य नसल्याने ते ट्रकचालक झाले. १६ ते १७ वर्षे अनुभव घेतल्यानंतर शेती हाच आपल्यासाठी हुकमी पर्याय असल्याचे त्यांना जाणवले.

पूर्णवेळ शेती पाहण्यास सुरुवात केल्यानंतर दोन एकरांतील निम्म्या भागात ऊस व उर्वरित क्षेत्रात वालघेवडा, मेथी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. सातारा येथील बाजार समितीत येणे जाणे असल्याने तेथे मत्स्य्यशेतीबाबत माहिती मिळाली. त्यातून वाई तालुक्यातील पाचवड येथे ‘बायोफ्लॅाक’ पद्धतीच्या मत्स्य्यशेतीचा प्रयोग प्रत्यक्ष पाहिला. तो फायदेशीर वाटल्याने करून पाहण्याचे नक्की केले.

मत्स्य्यशेतीचा प्रयोग

सन २०१८-१९ मध्ये ‘बायोफ्लॅाक’ मत्स्यशेतीसाठी लागणारी आवश्यक सर्व यंत्रणा उभी केली.
यात वीट बांधकाम, गोलाकार जाळ्या, आंध्र प्रदेशातून तिलापिया जातीचे मत्स्यबीज आदींचा समावेश होता. काही तांत्रिक समस्या जाणवू लागल्याने अपेक्षित उत्पादन मिळेना.

उत्पादनावर मर्यादा येऊ लागल्या. अखेर या पद्धतीचा वापर थांबवला. पण मत्स्यशेतीबाबत कुंभार सकारात्मकच होते. निराश न होता त्यांनी शेततळ्यातील मत्स्यशेतीचा पर्याय वापरण्याचे ठरविले.

सुरू झाले शेततळ्यातील मासेपालन

दुसरा प्रयोग अयशस्वी ठरू नये म्हणून खोजेवाडी, डिस्कळ येथील शेतकऱ्यांकडील मत्स्यशेती प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यातील बारकावे लक्षात घेतले. सन २०२० मध्ये आपल्या आठ गुंठे क्षेत्रात १७५ बाय ६५ बाय १२ फूट खोली या क्षेत्रफळाचा खड्डा खणला. त्यामध्ये प्लॅस्टिक पेपर अंथरून शेततळे उभारले.

पुणे भागातील व्यावसायिकांकडून तिलापिया जातीचे मत्स्यबीज आणून ते तळ्यात सोडले. माशांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळावा यासाठी एअर पंप, वीज ‘कनेक्शन’, पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी पीएच मीटर आदी सामग्री घेतली.

सुरुवातील प्लॅस्टिक पेपर, खड्डा खणणे, मत्स्यबीज व अन्य सुविधा मिळून सुमारे चार लाखांपर्यंत गुंतवणूक झाली. आतापर्यंत दोन वर्षांत उत्पादनाच्या दोन बॅचेस पूर्ण झाल्या असून तिसरी बॅच अंतिम टप्प्यात आहे.

Fish Farming
Fish Farming : धानशेतीला मत्स्यपालनाचा मोठा आधार

मासेपालन व्यवस्थापनातील बाबी (ठळक नोंदी)

-पुणे येथून ऑक्सिजनच्या फुग्यातून तिलापिया जातीचे मत्स्यबीज आणले जाते. आपल्या वातावरणात बीज तग धरावे यासाठी फुगा एक तास पाण्यात ठेवला जातो.
- त्यानंतर मत्स्यबीज (मे, जूनच्या काळात) तळ्यात सोडले जाते.
- माशांचे वजन वेळोवेळी तपासले जाते. त्यानुसार खाद्य व्यवस्थापन केले जाते. सकाळी नऊ व सायंकाळी चार वाजता अशी खाद्याची वेळ असते.
-पक्ष्यांपासून माशांचे संरक्षण व्हावे यासाठी तळ्याला वरून जाळीचे आच्छादन केले जाते.
-ऑक्सिजन कमी पडल्यास माशांची मर होते. यासाठी तळ्यात सतत एअर पंप सुरू ठेवला जातो.
-पाण्याची प्रत बिघडली तर माशांना हानी होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी पाण्याची गुणवत्ताही
सातत्याने तपासण्यात येते. यात पाण्याचा पीएच, अमोनिया यांचे प्रमाण या बाबी महत्त्वाच्या
असतात. दर १५ दिवसांनी पाण्याची पातळी दोन फुटांनी कमी करून नवे पाणी भरण्यात येते.

उत्पादन व अर्थकारण

प्रत्येक बॅच साधारण सहा महिन्यांची असते. माशांचे वजन चारशे ग्रॅम ते अर्धा किलो या प्रमाणात
झाल्यास त्यांच्या विक्रीचे नियोजन केले जाते. पुणे व पेण येथील व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. घाऊक विक्रीचा दर ६० ते ७० रुपये प्रति किलो असतो.

बांधावर थेट ग्राहकांना १६० रुपये दरानेही विक्री केली जाते. प्रति बॅच सहा ते सात टन उत्पादन मिळते. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येतो.तो वजा जाता आठ गुंठ्यांतून दीड, दोन ते अडीच लाख रुपये नफा मिळतो.

तळ्यातील खेकडापालन

कुंभार यांनी उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी खेकडापालनाचीही जोड आहे. त्यासाठी अंडाकार आकाराचे ५५ बाय ४५ लांबी रुंदीचे ‘आरसीसी’ बांधकाम केले आहे. दहा फूट खोलीचे तळे खोदले आहे. दापोली येतील कृषी विद्यापीठातून खेकड्याचे बीज आणून जून महिन्यात ते सोडले आहे.

खेकड्यांना गारवा मिळावा यासाठी तळ्यातील पाण्यात शेवाळे सोडले आहे. मासेपालनातील टाकाऊ घटक व भाताचा खेकड्यांना खाद्य म्हणून वापर केला जातो. या व्यवसायासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च केला आहे. या प्रयोगात दोन टन उत्पादन अपेक्षित आहे. भोर भागातील आकाश कांबळे यांचे मार्गदर्शन या व्यवसायात मिळाले आहे.

कुटुंबाची प्रगती

कुंभार सांगतात, की मासेपालन हा पूर्णवेळ जबाबदारीने व काटेकोर लक्ष देऊन करण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळेच आम्ही तळ्याजवळील आमच्या जागेत घर बांधले. मी व पत्नी अनिता दोघे मिळून चोवीस तास निगराणी ठेवून हा व्यवसाय करतो. ‘सीसीटीव्ही कॅमेरेही’ लावले आहेत.

दोन एकर शेतीचे स्वतंत्र क्षेत्र असून, त्यातील उत्पन्नाची जोड महत्त्वाची ठरत आहे. मुले रोहन, शुभम यांना शेतीतील उत्पन्नातून शिक्षण देता आले. ती आता नोकरीतून आपल्या पायांवर उभी आहेत. कुंभार यांच्या शेतीतील प्रयोगांची व प्रयत्नांची मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहे.

लहू कुंभार, ७७०९१२१९१६, ९३२५०५०३९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com