
Baramati News : ‘माळेगाव’ने शेतकऱ्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी ३६३६ अंतिम ऊस दर दिला. चालू हंगामातही माळेगावने प्रतिटन ३१३२ रुपये सर्वाधिक अॅडव्हास जाहीर केला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन २०० रुपये देण्याचे नियोजन आहे.
परिणामी, पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या व्हीएसआय संस्थेने माळेगाव प्रशासनाला उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला व सन्मानित केले, अशा माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासाठी जागरण गोंधळ आंदोलन केले हे कितपत योग्य आहे, असा सवाल अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केला.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासह विविध मुद्दे पुढे करीत मंगळवारी (ता. ११) जागरण गोंधळ आंदोलन केले होते. कमी ऊसदर, नीरा नदीमधील प्रदूषण आदी मुद्यांच्या आधारे आंदोलनकर्त्यांनी कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ व भाजप विचाराऱ्यांच्या विरोधकांना धारेवर धरले होते.
त्या पार्श्वभूमीवर माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जगताप यांनी युगेंद्र पवार यांचा शरयू कारखान्याने गेली १० वर्षांत माळेगावच्या तुलनेत शेतकऱ्यांना किती कमी पैसे दिले, याचा लेखा जोखाच मांडला.
जगताप म्हणाले, की सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागांत रिकव्हरी (साखर उतारा) झोन आहे. तेथे १३ टक्क्यांपेक्षा अधिक रिकव्हरी मिळते. त्या तुलनेत १ टक्क्यापेक्षा कमी रिकव्हरी असताना माळेगावने गतवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथम क्रमांकाचा ३६३६ दर दिला.
अर्थात, एफआरपीपेक्षा अधिकचा दर देण्याची माळेगावची अनेक वर्षांची परंपरा आहे. चालू गळीत हंगामातही ३१३२ रुपये प्रतिटन सर्वाधिक अॅडव्हास जाहीर केला. गुरुवारच्या (ता.२०) आत उर्वरित ३३२ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग झालेले असतील. तसेच आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होताना पुन्हा खोडकी पमेंटच्या माध्यमातून माळेगावच्या शेतकऱ्यांना प्रतिटन दोनशे रुपये देण्याचा विचार आहे, अशी प्राप्त स्थिती असताना युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माळेगावर गोंधळ घालून आंदोलन केले.
वास्तविक युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या कारखान्याच्या ऊसदराबाबत आत्मपरीक्षण करावे. त्यामुळे जागरण गोंधळ आंदोलन कोठे होणे गरजेचे आहे, हे सभासद जाणून आहेत. नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. फलटण व बारामती तालुक्यांतील अनेक कारखान्यांचे दूषित पाणी नदीत येते ही वस्तुस्थिती आहे. माळेगावने प्रदूषण मुक्तीसाठी ईटीपी प्रकल्प उभारला आहे, असे जगताप यांनी सांगितले.
माळेगावर शेतकऱ्यांचा विश्वास...
जिल्ह्यात बहुतांशी साखर कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहेत. माळेगाव, सोमेश्वरचे गाळप अद्याप पूर्णक्षमतेने सुरू आहेत. माळेगावने प्रतिदिनी ९ हजार मे.टन गाळप करून आजवर १० लाख ६० हजार टन गाळप उरकले. अद्याप गेटकेनधारक शेतकऱ्यांचा ऊस माळेगावला मोठ्या प्रमाणात येत आहे. कारभार चुकीचा असता तर शेतकऱ्यांनी माळेगावला ऊस दिला असता का, याचाही विचार आंदोलकांनी करावा, असे आवाहन अध्यक्ष जगताप यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.