
Pune News : राज्याच्या मध उत्पादक क्षेत्रात कोयनेच्या खोऱ्यातील घोगलवाडीचे शेतकरी मैलाचा दगड ठरू पाहणारी कामगिरी करीत आहेत. कधी काळी दारिद्र्याच्या गर्तेत असलेल्या या वाडीने आता वर्षाकाठी पर्यावरणाला जपत शुद्ध मधाचे तीन टनांपर्यंत उत्पादन करीत समृद्धीकडे वाटचाल केली आहे.
सातारा व रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात वसलेली शिवकालीन घोगलवाडी ६० घरांची आहे. त्यापैकी ४० घरांमध्ये शुद्ध मध तयार केला जातो. विशेष म्हणजे मध उत्पादनात घोगलवाडी पहिल्या क्रमांकावर आली आहे.
‘मधामुळे मुले पदवीधर’
दारिद्र्यामुळे घोगलवाडीतील शेतकरी विठ्ठल राजापुरे यांना अवघे चौथीपर्यंत शिक्षण घेता आले. कुटुंबासह गाव सोडून मजुरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. परंतु केवळ मध उत्पादनाच्या बळावर श्री. राजापुरे यांनी कष्टाने दारिद्र्य हटविलेच; पण मुलांना पदवीधर केले आहे. “हे सारे प्रामाणिकपणा व गुणवत्तेमुळे घडते आहे. कारण आमचा मध इतके शुद्ध आहे की पाच-सात वर्षे ठेवले तरी त्याची चव बदलणार नाही, याची हमी आम्ही ग्राहकांना देतो,” असे श्री. राजापुरे अभिमानाने सांगतात.
भात व नागली वगळता कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्याची संधी नसलेल्या या वाडीतील शेतकऱ्यांना जगण्यासाठी एकतर गाव सोडणे किंवा शेतीपूरक जोडधंदा स्वीकारणे असे दोनच पर्याय होते. या भागात असलेल्या दऱ्याखोऱ्यांमधील अनेक वाड्यांमधील शेतकऱ्यांनी गावे सोडली आहेत. ती वेळ घोगलवाडीवर न येण्यास जबाबदार ठरली आहे ती महाबळेश्वरची ‘मधुसागर’ ही सहकारी संस्था.
‘मधुसागर’ने घोगलवाडील शेतकऱ्यांना मध उत्पादनांचा जोडधंदा दाखवला. त्यासाठी मधुमक्षिका पेट्या कर्जाऊ पुरविल्या. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मधाला हमीभाव देत बाजार व्यवस्थादेखील याच संस्थेने उभी केली. शेतकरी विठ्ठल कोंडिराम राजापुरे म्हणाले, ‘‘माझी दहा एकर शेती आहे. परंतु प्रतिकूल हवामान आणि गरिबीमुळे मी केवळ खाण्यापुरती भात, नागली पिकवत होतो. ‘मधुसागर’ने मला २० वर्षांपूर्वी तंत्रशुद्ध पद्धतीने मध उत्पादनाचा मार्ग दाखविला. त्यामुळे माझे जीवन बदलून गेले आहे. आता मी वर्षाकाठी अडीचशे किलो मधाचे उत्पादन करतो आहे. मधविक्रीतून येणाऱ्या पैशातून माझा संसार सुखाने सुरू आहे.’’
घोगलवाडीतील शेतकऱ्यांना ३०० एकर शेती आहे. परंतु दुर्गम भाग आणि आधुनिक शेतीतंत्र नसल्यामुळे शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे. परिणामी, घोगलवाडीतील साऱ्या शेतकऱ्यांनी मध निर्मिती व्यवसाय स्वीकारला. या गावाला ‘मधुसागर’ने कर्जाने मधपेट्या पुरवल्या. त्यातून तयार केलेल्या मधाच्या विक्रीतून गावाने कर्जफेड केली आहे. आता ‘मधुसागर’च्या १२ प्रमुख मध उत्पादन केंद्रांत घोगलवाडी पहिल्या क्रमांकावर आली आहे.
“आमच्या वाडीत पारंपरिक मध उत्पादन केले जात होतेच; परंतु त्याला व्यावसायिक रूप नव्हते. आमचे आई-वडील जंगलातील मध काढून दोन रुपये किलोने विकत. मी स्वतः २५ रुपये किलोने मध विकला. व्यावसायिकपणे मध निर्मिती सुरू केल्यानंतर ६०० रुपये किलोने मध विकला जात आहे. यामुळे गावात पैसा आला. शेतकऱ्यांनी झोपड्यांऐवजी नवी घरे बांधली, दुचाकी घेतल्या, मुलाबाळांची लग्नं धुमधडाक्यात केली. परक्या शहरात होणारे स्थलांतर टळले आहे,” असे श्री. राजापुरे यांनी सांगितले.
‘मधमाश्यांवरील रोगाची समस्या सोडवा’
घोगलवाडीत मध उत्पादकांना आता सर्वांत मोठी समस्या भेडसावते आहे ती मधमाश्यांवर आलेल्या रोगाची. रोगामुळे गावात असलेल्या मधपेट्यांमधील वसाहती झपाट्याने नष्ट होत आहेत. मधमाश्यांना रोगांपासून वाचवा तसेच आमच्या गावाला अस्वल, बिबट, माकडांपासून संरक्षण मिळण्यासाठी उपाय करा, अशा दोन मुख्य मागण्या घोगलवाडीतील शेतकऱ्यांनी केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.