के. एच. शिरगापुरे, एस. बी. बडे पानांची पहिली कापणी पेरणीनंतर ३ ते ४ महिन्यांनी करता येते. त्यानंतर दर ३० ते ४५ दिवसांनी सुरू ठेवता येते. पाने जमिनीपासून ३० सेंमी ते १ मीटर उंचीवरून विळा किंवा धारदार चाकू किंवा झाडावरून हाताने थेट तोडून काढता येतात. काढणी शक्यतो दिवसाच्या सर्वात थंड कालावधीमध्ये सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. कापणीपूर्वी पानांवर दव व अन्य .कारणांमुळे ओलावा असणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा, या ओलाव्यामुळे पाने वाहतुकीदरम्यान कुजू शकतात. पाने मुख्य फांदीपासून काढतानाच त्यातील खराब, रोगग्रस्त व पिवळी झालेली पाने काढून टाकावीत. उरलेल्या कोवळ्या व हिरव्या फांद्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरता येतात. त्यातून जनावरांना उत्तम प्रथिने मिळतात. बाग शक्यतो रहदारीपासून व वाहत्या वाऱ्यापासून दूर ठेवावी. त्यासाठी वारा प्रतिबंधक झाडांची लागवड बांधावर करावी..Shevaga Farming: प्रक्रियाकेंद्रित शेवगा लागवड तंत्रज्ञान.वाहतूकउच्च दर्जाची पाने मिळविण्यासाठी कापलेल्या फांद्या अलगद मातीमध्ये न पडू देता प्रक्रिया केंद्रापर्यंत न्याव्यात. प्रक्रिया क्षेत्र खूप दूर असेल तर फांद्यांपासून पाने काढून शक्य तितक्या लवकर वाहतूक करणे चांगले. ताजी शेवगा पाने ही फार गच्च न बांधता सैलसरपणे व हवेशीर न्यावीत. त्यासाठी हवा खेळती राहणाऱ्या बांबूच्या दुरड्या किंवा सच्छिद्र प्लॅस्टिक पाट्यांचा वापर करावा. लांब अंतरासाठी पाने वातानुकूलित किंवा रेफ्रिजरेटेड व्हॅनमध्ये न्यावीत. वाहतूक सकाळी लवकर, संध्याकाळी किंवा रात्री करावी..स्वच्छताशेवग्याची पाने तीन टप्प्यांमध्ये स्वच्छ धुतली जातात. पहिल्या टप्प्यात पानांमधून धूळ, कीटकनाशकांचे अंश किंवा पक्ष्यांची विष्ठा वगैरे स्वच्छ करण्यासाठी पाण्याने धुतली जातात. त्यानंतर ही पाने १ टक्के मिठाच्या द्रावणामध्ये ३ ते ५ मिनिटे धुवून घेतात. यामुळे पानांतील सूक्ष्मजीव व जिवाणू काढून टाकले जातात. शेवटी तिसऱ्या टप्प्यात पाने पुन्हा स्वच्छ पाण्यात धुवा. पानांमधील पाणी मोठ्या चाळण्यांद्वारे किंवा सच्छिद्र बादल्यांद्वारे काढून टाकावे. पाने फूड-ग्रेड जाळीने बनवलेल्या ट्रेवर पसरवावीत.त्यानंतर १५ मिनिटे हलवून त्यातील पाणी पूर्णतः निघाल्याची खात्री करावी..Shevaga Farming: दर्जेदार शेवगा उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.पाने वाळविण्याच्या तीन पद्धतीखोलीत रॅकवर वाळवणे ः बाह्य उष्णतेचा वापर न करता पानांमधील ओलावा काढून टाकण्यासाठी लाकडापासून बनवलेल्या रॅकवर पातळ जाळीवर शक्यतो एक ते दोन सेंमीच्या एक थरात पाने पसरावीत. हवेशीर खोलीत वाळविण्यासाठी ग्रीन हाउस नेट, मच्छरदाणीची जाळी वापरता येते. वाळवण्याची खोली ही कीटक, उंदीर आणि धूळ प्रतिरोधक असावी. पंखा वापरता हवेद्वारे सूक्ष्मजीवांचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंख्याचे वारे थेट पानांकडे जाऊ नये. एकसमान सुकविण्यासाठी पाने उलटीसुलटी करावीत..सौर वाळवण यंत्राचा वापर ः शेवग्याची पाने वाळविण्यासाठी सौर ड्रायर प्रभावीपणे वापरता येतो. बाह्य उष्ण हवेसोबत धूळ आत जाऊ नये, यासाठी हवा मस्लिन कापडाने गाळून जाईल, हे पाहावे. पाने १-२ सेंमीच्या थरात पसरावीत. सूर्याच्या तीव्रतेनुसार मिळालेल्या ३५ ते ५५ अंश सेल्सिअस तापमानात सुमारे ४ ते ६ तासांत पाने वाळतात.विद्युत ऊर्जेवरील वाळवण यंत्रे ः कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पावडर उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक किंवा हॉट एअर ड्रायर उपलब्ध आहेत. मात्र त्यातही पाने वाळवताना तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. पानांतील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी होईपर्यंत वाळवावी..Shevaga Shenga : जीवनसत्वे, मधुमेह, रक्तदाबावर गुणकारी शेवगा शेंग खाण्याचे फायदे.दळण्याची प्रक्रिया ः पानातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर ती ‘फूड ग्रेड’ स्टेनलेस स्टिलपासून बनविलेल्या ग्राइंडिंग मिलमध्ये दळून घ्यावीत. तयार झालेली पावडर गाळून घ्यावी. आवश्यकता भासल्यास खडबडीत कणांसाठी दळण्याची प्रक्रिया पुनश्च करावी.भुकटीची वाळवण ः शेवगा पानांची पावडर ही निसर्गात हायग्रोस्कोपिक (म्हणजेच ती आजूबाजूच्या वातावरणातील ओलावा शोषणारी) असते. त्यामुळे तयार झालेली भुकटी पुन्हा एकदा ५० अंश सेल्सिअस तापमानात ३० मिनिटे ठेवून आर्द्रता ७ टक्क्यांपेक्षा कमी होईपर्यंत वाळवून घ्यावी..पॅकेजिंगप्रक्रियेच्या सर्व टप्प्यामध्ये सहभागी व्यक्ती आणि क्षेत्र स्वच्छ असले पाहिजे. वैयक्तिक स्वच्छतेसाठी हातमोजे, डोक्यावर टोपी, नाक व तोंड झाकेल अशी मुखपट्टी (मास्क) वापरावे. सुकल्यानंतर पावडर काही काळ थंड होऊ द्यावी. त्यानंतर वजन करून निर्जंतुकीकरण केलेल्या व एकदा वापरता येणाऱ्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये किंवा कोरड्या कंटेनरमध्ये पॅक करावी. योग्यरीत्या सीलबंद केलेले पॅकेट थंड, कोरड्या जागी साठवावे.- के. एच. शिरगापुरे ९५४५६९५१४१सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.