Paddy Farming Management
शेतकरी नियोजन
पीक : भात
शेतकरी : किशोर मनोहर हटवादे
गाव : पळसगाव जाट, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर.
एकूण क्षेत्र : ३८ एकर.
भात शेती : दोन ते चार एकर.शेतकरी नियोजन
चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट (ता. सिंदेवाही) येथील किशोर मनोहर हटवादे यांनी भात (धान) शेतीत प्रयोगशीलता जपली आहे. विविध शास्त्रीय पद्धती आणि तंत्रांचा वापर करत सुपर फाइन भात उत्पादनामध्ये जिल्हा स्तरावरील उच्चांक मिळवला आहे. बीजोत्पादनाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या या शेतकऱ्याचा ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ या पुरस्काराने गौरव केला आहे.
हटवादे कुटुंबीयांनी संयुक्त कुटुंब पद्धती अद्याप जोपासली असून त्यांच्या घरामध्ये भाऊ व मुलांसह १९ जण एकत्र राहतात. ३८ एकर शेतीमध्ये पारंपरिक भात पिकासोबतच रब्बीमध्ये कांदा, भाजीपाला, मिरची अशा पिकांवर त्यांचा भर असतो. किशोर हटवादे यांचे शिक्षण एम. ए., बी. पीएडपर्यंत झाले आहे. सुरुवातीला २००२ मध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले असले तरी ते अधिक शेतीमध्येच रमले.
यांत्रिकीकरणावर भर
या कुटुंबाने शेत मशागतीसाठी १९९६ मध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतला. आज त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर असून, १९९८ मध्ये त्यांनी भात काढणीसाठी (वाकड) मशिन घेतली. विजेवर चालणाऱ्या या संयंत्रासाठी ६५ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यामुळे स्वतःच्या भात काढणीसोबत अन्य शेतकऱ्यांची काढणीही भाडेतत्त्वावर करून दिली जाते.
सुधारित तंत्रज्ञान
पारंपरिक भात रोवणीऐवजी पट्टा पद्धतीवर किशोर यांनी भर दिला आहे. त्यासाठी दहा बाय दहा फुटांचा पट्टा पाडून, त्यात दोरी बांधून तीन मजुरांच्या साह्याने लागवड केली जाते. दोन रोपांतील अंतर १५ ते १८ सेंमी, तर दोन ओळींतील अंतर २५ ते ३० सेंमी ठेवले जाते.
दहा फुटांनंतर एक फूट गॅप सोडली जाते. अशा पट्टा पद्धतीने रोवणीमुळे एकसारखी रोवणी, आंतरमशागत करण्यात सुलभता आणि वाढत्या पिकात हवा खेळती राहते. परिणामी, त्यांना सुपर फाइन वाणाची एकरी २३.८६ क्विंटल अशी उत्पादकता मिळाली.
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या तिलक वाणावर त्यांचा भर असतो.सिंदेवाही येथील प्रादेशिक संशोधन केंद्रातून भाडेतत्त्वावर रोवणी यंत्राचा वापर केल्यामुळे मजूर खर्चात बचतीसोबतच उत्पादनामध्ये वाढ मिळाल्याचेही किशोर यांनी सांगितले.
युरिया बिक्रेटचा वापर
गेल्या दोन वर्षांपासून युरिया ब्रिकेटचा वापर भात रोवणीमध्ये करत आहेत. गावातील बलराम शेतकरी गटाकडे युरिया ब्रिकेट तयार करण्याची यंत्रणा असून, २ ते अडीच हजार बॅगचे उत्पादन केले होते. या गटामध्ये त्यांचाही समावेश आहे. युरिया आणि डीएपीचे योग्य (६ः४) प्रमाण घेऊन युरिया ब्रिकेट तयार केली जाते. परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत वितरण केले जाते.
या युरिया डीएपी ब्रिकेटच्या वापरामुळे खत वाहून वाया जात नाहीत, तर सावकाश पिकांना उपलब्ध होत राहते. परिणामी, ३० ते ३५ टक्के खतांची बचत होते. सामान्यतः शेतकरी शेतकरी २०ः२०ः० हे १०० किलो, डीएपी ५० किलो व त्यात २० किलो युरिया या प्रमाणे खते देतात. त्यासाठी ३ हजार रुपये खर्च होतो. त्या तुलनेमध्ये युरिया ब्रिकेटसाठी एकरी फक्त १६०० रुपये लागतात. तरीही जोमदार उत्पादन मिळते. भात काढणीनंतर बोरू बियाणे एकरी १५ किलो प्रमाणात लावून गाडले जाते.
प्रयोगशीलतेतूनच उत्कर्षाकडे...
किशोर हटवादे यांच्या आजोबांकडे ८ एकर जमीन होते. त्यात त्यांच्या वडिलांनी १४ एकरांची भर घातली. आता किशोर यांच्या पिढीने आपल्या प्रयोगशीलतेने २६ एकर क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे काकांसोबत वाटण्या झाल्यानंतरही आज त्यांच्याकडे ३८ एकर शेती राहिल्याचे ते सांगतात.
सिंदेवाही येथील प्रादेशिक संशोधन केंद्राचे डॉ. आर. जी. श्यामकुंवर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनीही त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले आहे.
किशोर हटवादे, ९४२०८६८०२०
(शब्दांकन : विनोद इंगोले )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.