Parbhani News : या वर्षीच्या (२०२२-२३) हंगामात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) (MSP) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या (नाफेड) (Nafed) वतीने राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) आणि विदर्भ सहकारी महासंघ (व्हीसीएफ) अंतर्गत परभणी आणि हिंगोलीत १८ केंद्रांवर गुरुवारी (ता. ३०)पर्यंत ३१ हजार १४० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.
या दोन जिल्ह्यांतील १५ खरेदी केंद्रांवर १ हजार ७०१ शेतकऱ्यांकडून २८ हजार ४१३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. या हरभऱ्याची एकूण किंमत १५ कोटी १५ लाख ८३ हजार ३५५ रुपये आहे. शेतकऱ्यांना अद्याप हरभऱ्याचे चुकारे अदा करण्यात आलेले नाहीत.
राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर १८ हजार ५९१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. केंद्रांवर मोजमापासाठी हरभरा आणण्यासाठी ३ हजार २७० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले.
गुरुवार (ता. ३०)पर्यंत परभणी, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ७ केंद्रांवर ८५१ शेतकऱ्यांकडून १४ हजार ६६४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर १० हजार ८४९ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.
त्यापैकी ३ हजार २१३ शेतकऱ्यांना हरभरा आणण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले. हिंगोली, कनेरगाव, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा या ७ केंद्रांवर ७९४ शेतकऱ्यांकडून १२ हजार ६०१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात येळेगाव आणि वारंगा फाटा या दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एकूण खरेदी केंद्रांची संख्या ९ झाली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.
विदर्भ सहकारी पणन महासंघच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रांवर १ हजार ७०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. त्यापैकी ५६ शेतकऱ्यांकडून १ हजार १४८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा...
राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गतच्या केंद्रांवर १४ मार्च ते २७ मार्च या कालावधीत हरभरा खरेदी सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी केंद्रावरील ५५६ क्विंटल, सेनगाव केंद्रावरील ११९४ क्विंटल, कनेरगाव केंद्रावरील ४९७ क्विंटल असा एकूण २ हजार २४८ क्विंटल हरभरा राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.