
Buldana News : राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी पशू पालकांना विविध अडचणी येत आहेत. गाय, म्हशीच्या कानाला टॅग बंधनकारक आहे. पण विभागाकडे ग्रामीण भागात हे टॅग नसल्याने अडचणी तयार झाल्या आहेत.
राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत उत्पादक शेतकऱ्यांना फॅटनुसार संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन देणे बंधनकारक आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर ‘डीबीटी’द्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२३ मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन १४९ लाख लिटर प्रतिदिन इतके आहे. प्रस्तावित पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित २३० कोटी इतके अनुदान आवश्यक राहणार आहे. ही योजना ११ जानेवारी, २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीकरिता राबविण्यात येणार आहे.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरांची नोंदणी (ईअर टॅग) ‘भारत पशुधन’ पोर्टलवर असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. ही महत्त्वाकांक्षी योजना फायद्याची असली तरी यामध्ये काही अडचणी येत आहेत.
अनेक पशुधनाच्या कानाला लावलेले टॅग पडले तर काही खराब झालेत. काही शेतकऱ्यांनी नवीन गायी खरेदी केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गायीच्या कानाला टॅग असणे बंधनकारक आहे. मात्र पशुपालक मोताळा येथील पशू संवर्धन विभागात आले असता टॅग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग असल्याशिवाय या योजनेत नोंदणी होत नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. आडविहीर येथील निना अरुण कोलते, गौतम मुकुंद सरकटे, अनिकेत राजेंद्र पाटील, गणेश ओंकार कोलते हे पशुपालक या विभागात गेले असता त्यांना टॅग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. टॅग तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
पशुधनाचा आधार इअर टॅग
शासनाने प्रत्येक व्यक्तीला जसे आधार अनिवार्य केले आहे. तसे प्रत्येक पशुधनास इअर टॅग अनिवार्य आहे. यावरून राज्यात कोणते पशुधन किती व कुठले याचा संपूर्ण डाटा शासनाकडे राहतो. मात्र हे टॅग उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.