Droupadi Murmu Kolhapur : 'अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल', राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे कोल्हापूर दौऱ्यावेळी वक्तव्य

Kolhapur Warana Sakhar Karkhana : ‘स्त्री शक्तीची सोनपावलं’ असे ब्रीद घेऊन आयोजित केलेल्या सुवर्ण सोहळ्याला वारणा खोऱ्यातील शेकडो महिलांनी हजेरी लावली.
Droupadi Murmu Kolhapur
Droupadi Murmu Kolhapuragrowon
Published on
Updated on

Cooperative Societies : सहकारी संस्थांनी देशात दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या काळात सहकारी संस्थांनीही स्वत:ला बदलण्याची गरज आहे. त्यांनी अधिकाधिक नवतंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधावी, तसेच व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल(ता.०२) व्यक्त केली. महिलांच्या संघटन शक्तीला पुढे नेण्यासाठी वारणा समूह प्रयत्न करीत असून त्याचे मला समाधान वाटते, असेही त्या म्हणाल्या.

श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचे उद्‍घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा बझारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख उपस्थित होते. ‘स्त्री शक्तीची सोनपावलं’ असे ब्रीद घेऊन आयोजित केलेल्या सुवर्ण सोहळ्याला वारणा खोऱ्यातील शेकडो महिलांनी हजेरी लावली.

Droupadi Murmu Kolhapur
Kolhapur Rain : दुष्काळी घोषीत झालेल्या तालुक्यात भरपूर पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ८७.१८ टक्के पावसाची नोंद

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, ‘‘समाजातील शक्तीचा वापर करण्यासाठी सहकार सर्वोत्तम माध्यम आहे. देशात आज साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकाराची मुळे खूप मजबूत आहेत; पण सहकाराची पूर्ण क्षमता अजूनही वापरली जात नाही. अनेक सहकारी संस्था भांडवल आणि संसाधनांचा अभाव, प्रशासन आणि व्यवस्थापन, कमी सहभाग अशा समस्यांशी झुंजत आहेत. त्यावर अधिकाधिक युवावर्गाला सहकारात सहभागी करून घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

प्रशासन, व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश करून युवावर्ग त्या संस्थांना नवसंजीवनी देऊ शकतात. सहकारी संस्थांनी सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण, इको-टुरिझमसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही सहकारी संस्था कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि फायद्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सहकारात खरे सहकार्य हवे, व्यक्तिहित नको.’’

वारणा समूहाच्या प्रगतीचा आनंद

महिला हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कोणताही समाज विकास करू शकत नाही. महिलांच्या क्षमतेवर आणि शक्तीवर विश्वास व्यक्त करून, त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने तात्यासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी महिला सहकारी उद्योग समूहाची स्थापना केली होती. आज येथे उपस्थित असलेल्या मुली, बहिणींकडे पाहून मी म्हणू शकतो की त्यांचा विश्वास योग्य होता. त्यांनी विविध उपक्रमांद्वारे महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत जोडलेले उद्योग नेहमी प्रगती करतात. सहकारातून वारणा सहकारी उद्योग समूहाने केलेल्या प्रगतीचा मला मनस्वी आनंद आहे असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

आमदार कोरे म्हणाले, ‘‘वारणेत महिला शक्तीने निर्माण केलेल्या उद्योग कार्याचा आणि शैक्षणिक क्रांतीच्या वाटचालीत भर टाकणारा आजचा दिवस आहे. रणरागिणी ताराराणी यांच्या शौर्याची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरातील महिलांनी आपले कर्तृत्व विविध उद्योगांतून दाखवून दिले आहे. वारणेत तर महिला सन्मानाचे शक्तिपीठ अस्तित्वात आले आहे.

मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात महाशक्तीच्या सन्मानाचे वेगळे पर्व सुरू झाले आहे. वारणा आज विद्यापीठ म्हणून अस्तित्वात येत असून त्याच्या माध्यमातून परिसरातील नवी पिढी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सन्मानाने स्थान निर्माण करेल. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नावलौकिक मिळविता येते, याचे प्रतीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत.’’

या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाधक्ष समित कदम, वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा कोरे, विश्वेश कोरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com