Crop Planting : पीक लागवडीआधी पूर्वतयारी महत्त्वाची

Agriculture Update : कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, सरी काढणे, बांधबंदिस्ती करणे इत्यादी कामांचा समावेश होतो.
Preparation of Crop Planting
Preparation of Crop PlantingAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

Indian Agriculture : कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, सरी काढणे, बांधबंदिस्ती करणे इत्यादी कामांचा समावेश होतो. साधारणपणे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जमीन भुसभुशीत झाल्यावर उतारास आडवी कुळवाची पाळी द्यावी. नांगरटीनंतर १५ दिवसांनी कुळवाची पाळी द्यावी.

त्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. कुळवणीमुळे जमीन चांगली भुसभुशीत होते. तसेच जमिनीत हवा खेळती राहते. पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात. तणांचा बंदोबस्त होतो. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते. जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

रान तयार करणे

रान तयार करत असताना, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शेताच्या बांधावरील, मशागतीस व पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडपे तोडावीत. काही वेळा झाडाच्या वसव्यामुळे पिकांची वाढ होत नाही. अशी झाडे काढून टाकावीत.

बांधावरील गवत, काडीकचरा, झुडुपे कापून जाळावीत. त्यामुळे कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते.

फळझाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ आटोपशीर ठेवावी. झाडावरील रोगग्रस्त, वाळलेल्या आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.

Preparation of Crop Planting
Orchard Planting : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उपाय

पावसाचे पाणी म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यासाठी उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत. जेणेकरून पावसाचे पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मुरले जाईल. या साऱ्याचा आकार साधारण ६ बाय ६ मीटर इतका ठेवावा.

याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे ६० सें.मी. खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो. या उपायांमुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी ४ क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

जमिनीत पाणी मुरविण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजीव बांध घालून जमिनीचा उतार कमी करता येतो. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूपही कमी होते. असे सजीव बांध करण्यासाठी सुबाभूळ सारख्या वनस्पतीचा उपयोग करता येते. अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्वमशागत करताना समपातळीत सरी वरंबा करून सजीव बांधाची मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी.

शेतातून पावसाचे जास्तीचे वाहून जाणारे पाणी लवणांच्या जागी शेततळी खोदून अडवून ठेवण्याची योजनाही पूर्वमशागत करताना अमलात आणावी. या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय नालासरळीकरण, नाल्यातील प्रवाहाला दगडाचे अडथळे करणे ही कामेही करणे हिताचे ठरते.

Preparation of Crop Planting
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

जमीन नांगरून तापू देणे (सॉईल सोलरायझेशन)

पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून चांगली तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत ‘सॉईल सोलरायझेशन’ असे म्हणतात. उन्हाळ्यात तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वर गेले की १५ सें.मी. खोलीपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते. अशा मशागतीमुळे जमिनीतील विविध बुरशींच्या तसेच किडींच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते. जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांची घनता वाढते. त्यामुळे आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते.

सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते, तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते. त्याशिवाय मुळांची वाढ चांगली होत नाही. पावसाचे पाणी कडक जमिनीवरून लगेच वाहून जाते. पावसाच्या पाण्याची ओल खोलपर्यंत जात नाही. याउलट नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते. जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते. त्यामुळे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.

शेणखताचा वापर

पेरणीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळणे हे खरीपाच्या पूर्वतयारीमधील अत्यंत महत्त्वाचे काम आहे. पेरणीपूर्वी साधारण ४ ते ६ आठवडे अगोदर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. विविध पिकांच्या प्रकारानुसार शेणखताची मात्रा ही वेगळी असते.

पीक शेणखत मात्रा (प्रतिएकर)

तृणधान्य व इतर पिके ४ ते ५ टन

फळपिके १० ते १५ टन

भाजीपाला पिके ८ ते १० टन

शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी

शेतामध्ये टाकण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत वापरावे.

शेणखताचा खड्डा मे महिन्याच्या सुरुवातीस रिकामा करावा.

शेणखतासोबत हुमणीच्या अळ्या, अंडी, कोष शेतात जाण्याची शक्यता असते. त्यासाठी शेणखताची तपासणी करावी.

शेणखतासोबत आलेले विविध तणांचे बियाणे, गवताचे तुकडे इत्यादी घटक शेतात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

बऱ्याच वेळा उकिरड्यावर जनावरांवर उपचार करण्यासाठी वापरलेले साहित्य जसे की सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुया, प्लास्टिक हातमोजे, पिशव्या इत्यादी टाकले जाते. हे साहित्य शेणखतासोबत शेतात जाण्याची शक्यता असते. त्यासाठी शेणखताची पाहणी करून अशा वस्तू शेणखतातून शेतामध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

अर्धवट कुजलेले किंवा बायोगॅस स्लरी जशीच्या तशी शेतात वापरू नये.

शेणखताचे फायदे

पिकास पोषक अन्नघटक मिळतात.

जमिनीचा भुसभुशीतपणा टिकून राहण्यास मदत होते.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

जमिनीतील हवा व पाणी यांचा समतोल राहतो.

जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते.

जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com