
Chh. Sambhajinagar News : थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांवर कारवाईसाठी महावितरणने धडक मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत गेल्या सव्वा महिन्यात साडेसात हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणतर्फे थकबाकीदारांना बिल भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच थकबाकी भरण्याची मुदत संपल्यानंतर मोबाइलवरून वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात येत आहे. त्यानंतरही बिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात १ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ कालावधीत ७ हजार ६५५ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात २३४६, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात २०९१, तर जालना मंडलात ३२१८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली आहेत.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणकडे थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत जोडला जात आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा तातडीने भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे, असे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले.
सव्वा चार लाख ग्राहकांकडे २३१ कोटी थकित
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ४ लाख २१ हजार १७९ वीजग्राहकांकडे जानेवारीअखेर २३१ कोटी ४७ लाख रुपये थकबाकी आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १ लाख १८ हजार ६४४ ग्राहकांकडे ५९ कोटी ३९ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात १ लाख ७८ हजार ६०९ ग्राहकांकडे ५९ कोटी ५८ लाख, तर जालना मंडलात १ लाख २३ हजार ९०६ ग्राहकांकडे ११२ कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.