
Akola News : मागील खरीप हंगामामध्ये पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत परतीच्या पावसामुळे अनेक भागांतील शेतकरी अडचणीत सापडले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक मदत घोषित केली असून बुलडाणा, अकोला जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने २२ कोटी ७३ लाख ८६ हजारांची मदत मंजूर केली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात सुमारे ३०० कोटींचा निधी मिळणार आहे. मागील वर्षी खरीप हंगामात जून व जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ९ हजार ५८८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. या अतिवृष्टीमुळे १५२ गावांमध्ये नुकसान झाले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४ लाख ३५ हजार ९०८ रुपयांची आवश्यकता आहे. ही भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसतानाच १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान तेल्हारा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता.
या नुकसानीचे पंचनामे संयुक्तपणे करण्यात आले. याचा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तयार करण्यात आला होता. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने २२ कोटी ७३ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
असा बसला होता फटका
कोरडवाहू क्षेत्र ः पावसामुळे १२ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. ४ हजार ९८० हेक्टरवरील कापूस पीक बाधित झाले. सहा हजार ५९५ हेक्टरवरील सोयाबीनचेही नुकसान झाले. ८५३ हेक्टरवरील तुरीचे पीक बाधित झाले. १३ हेक्टरवरील ज्वारी व ३४२ हेक्टरवरील अन्य पिकांना फटका बसला होता. ४५ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता ही मदत मंजूर झाली आहे.
बागायती क्षेत्र ः पावसाचा बागायती ८९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. याचा १ हजार ५११ शेतकऱ्यांना फटका बसला होता. तेल्हारा तालुक्यातील १६४.८७ हेक्टरवरील भाजीपाला, ४८१ हेक्टरवरील केळी, ९४ हेक्टरवरील पपई व १५५ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले.
फळ बागा : ८१६ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. १९० हेक्टरवरील लिंबू, ६१० हेक्टरवरील संत्रा व १६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. ६६२ हेक्टरवरील फळ पिकांची अवकाळी पावसामुळे हानी झाली.
असे आहे मदतीचे स्वरूप
बाधित गावे : ११०
नुकसानग्रस्त शेतकरी : १४ हजार ७०६
बाधित क्षेत्र : १४ हजार ४९३.८७ हेक्टर
मंजूर मदत : २२ कोटी ७३ लाख ८६ हजार २९० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.