Kalpana Dudhal : ‘धग असतेच आसपास’ मधून शेतकऱ्यांच्या वेदनांना मोकळी वाट
Pune News : पुणे ः ‘‘ते पुन्हा पुन्हा रान सजवायचे ऊस लावायचे, कापूस पिकवायचे आम्ही त्यांना कारखान्यातल्या काट्यावर मारायचो, आवक-जावक हाताशी धरून भाव पाडायचो ते कांदा चाळीत आयुष्य साठवायचे, आम्ही नासवून घालायचो!’’
शेतकरी कवयित्री कल्पना दुधाळ यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर बोट ठेवले. निमित्त होते महिला किसान अधिकार मंचातर्फे आयोजित विविध माध्यमांतून जाणून घ्या शेतकरी महिलांचे आयुष्य ‘भविष्य पेलताना’ या कार्यक्रमाचे. या वेळी कल्पना दुधाळ यांनी त्यांच्या ‘धग असतेस आसपास’ या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले.
रासायनिक खतांमुळे मातीची उगवण नैसर्गिक राहिली नाही, त्यामुळे आज माती म्हणते आहे, की आता माझे सिझर कर. ही आजच्या शेतीची झालेली अवस्था त्यांनी आपल्या ‘सिझर कर म्हणतेय माती’ या कवितेतून मांडली. जमिनीचा पोत रासायनिक खतांमुळे बिघडला आहे अशा वेळी सेंद्रिय खत घेणे देखील शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यांना रासायनिक खतांचा पर्याय घ्यावा लागतो.
पुढे त्या म्हणतात, की माती ही आई असते, महिला आपल्या आईची सेवा मन लावून करतात. सौंदणीचे झाड जसे पाणी साठवून ठेवते, त्याप्रमाणे महिलाही कुठून ना कुठून पाणी आणून आपला संसार चालवत असतात. महिला आणि सौंदणीच्या झाड यातील साम्य त्यांनी अत्यंत चपखल शब्दात मांडले आहे. शेतीचा खर्च निश्चित आहे, मात्र त्यातून येणाऱ्या उत्पन्नाची मात्र हमी नाही. अनिश्चिततेच्या झोक्यावर हेलकावे खाऊन खाऊन आता शेतकऱ्यांनाही आपल्या मुलांनी शेती करावी,असे वाटतं नाही. यावर त्या म्हणतात,
‘‘काही काळानंतर लोक म्हणतील पूर्वी इथं शेती करणारे लोक राहायचे,
निराशेची वावर नांगरून, भयंकर काबाडकष्टानं धान्य पिकवायचे, आम्ही सतत त्यांना मातीत घातलं म्हणून नाही तर आज त्याचं राज्य असतं...’’
त्या पुढे म्हणतात...
त्यांच्या लेकरांनाही उच्च शिक्षणाची स्वप्न पडायची शैक्षणिक कर्जासाठी ते ताटकळून राहायचे भांबावून रडकुंडीला यायचे. पीककर्ज मात्र लवकर मंजूर करायचे नव्या जुन्याच्या फेऱ्यात परत परत शेती करायला भाग पाडायचे,
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीवर त्यांनी याद्वारे बोट ठेवले आहे. ‘कार्यशाळा’ या कवितेच्या ओळीतून त्या म्हणतात, लांबून जे शेती व्यवस्थेचा विचार करतात. त्यांना वाटते की गरीब शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत, आम्ही केलेल्या संशोधनाचा उपयोग केला पाहिजे. परंतु जे खरे शेती करतात त्यांना त्यांच्या अडचणी माहिती असतात.
बाहेरून शेती पाहणाऱ्या माणसाला त्या अडचणी तितक्यात जाणवत नाहीत. सौंदण, घालमेल, शास्त्र, कार्यशाळा, या कवितांतून कल्पना दुधाळ यांनी शेतकऱ्याच्या भावनांना आपल्या कवितांमधून मांडल्या आहेत.यानंतर या कार्यक्रमात ‘पुष्कळा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यातील निवडक कथांचे अभिवाचन तसेच निवडक महिला शेतकऱ्यांशी या वेळी स्वाती सातपुते यांनी संवाद साधला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.