
Parbhani News : सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येक घरी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सेलूला राज्यातील पहिले सौर शहर (सिटी) बनवणार आहोत, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले.
सेलू येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या महावितरणच्या सेलू विभागाचे लोकार्पण पालकमंत्री साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रूपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता (सेलू) उमेश धोंगडे, अभियंता मंदार वाग्यानी उपस्थित होते.
पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की ग्राहकांच्या सेवेसाठी तसेच प्रशासकीय सोयीकरिता महावितरणच्या परभणी विभाग क्र. १ व २ ची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले. परभणी विभाग क्र.२ चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरित करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सेलू येथे १३२ केव्ही मंजूर झाले होते, पण येथील अधिकाऱ्यांनी १३२ केव्हीची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठवला होता.
असा अहवाल पाठविणारांवर कारवाई होणार आहे. सेलू येथे कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग कारखाने आहेत. कापसापासून रुईच्या गाठी तयार केल्या जातात. इतर वस्तूंचा व्यापार होतो. उद्योग-कारखान्यांना सुरळीत वीजपुरवठा होण्यसाठी सेलू येथे महावितरणच्या १३२ केव्हीची आवश्यकता आहे.
गतिमान सरकारच्या टॅगलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. ते काम तत्परतेने झाले पाहिजे. सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिंतूर मतदार संघात ५० हजारांवर नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.