
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Infrastructure Development : महाराष्ट्र राज्याची प्रगती होण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. राज्याची सद्यःस्थितीत असलेली ०.४३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरकडे कूच करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्याचे लॉजिस्टिकचे धोरण, ३५० किलोमीटरची मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेले आणि भारतातील ६४ टक्के समुद्र मार्गाने होणारा निर्यात व्यवसाय करणाऱ्या मुंबईतील जेएनपीटी बंदराची क्षमता बांधणी होत आहे. या बंदरापेक्षा तिप्पट क्षमता असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सुमारे ७६ हजार कोटींच्या वाढवण या दुसऱ्या बंदराची उभारणी, समृद्धी महामार्ग, गडचिरोली व जालनासारख्या स्टील उत्पादक शहरांची उभारणी, अटल सेतू उभारणी झाली आहे.
परकीय गुंतवणुकीत मागील तीन वर्षांपासून सलग पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्रातील गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय विमानतळांची उभारणी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध २५००० कोटींपेक्षा अधिक मूल्यांचे मॅग्नेट, पोकरा, स्मार्ट, नव-तेजस्विनी यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची उभारणी होत असल्याने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रगती करेल. याचे अनुभव विविध पातळीवर येत आहेत.
गोदाम उभारणीचे तंत्र
पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये गोदाम निर्मितीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी मूल्य साखळीशी निगडीत शाश्वत गोदाम आधारित साखळीची उभारणी आणि बळकटीकरणासाठी गोदाम उभारणी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. परंतु यासाठी वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी अत्यंत आवश्यक आहे. माहितीच्या अभावी वैज्ञानिक पद्धतीने गोदाम निर्मितीस अडथळे येऊ शकतात.
गोदाम उभारणी करताना निर्मितीमध्ये आवश्यक असणारे साहित्य गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. राज्यातील विविध योजना व प्रकल्पात गोदाम निर्मिती करताना गोदाम मालकास वैज्ञानिक पद्धतीने गोदाम कसे बांधावे याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी गोदाम मालकाने गोदाम उभारणी करताना काही घटकांचे पालन करावे.
गोदामाच्या इमारतीचा पाया भरताना काँक्रिटीकरण शक्यतो एकाचवेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. काँक्रीटची भराई करताना खडी, सिमेंट पाणी आणि वाळू यांचे विलगीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी.
इमारतीच्या पायावरील कॉलम वर उचलताना ते मीटरच्या टप्प्यात वर उचलावेत. एक झाल्यावर दुसरा टप्पा भरताना जुन्या टप्प्यांचा वरचा भाग स्वच्छ करून घ्यावा. त्यावरील मोकळे असलेले भाग काढून टाकावेत. कॉलम एका प्रमाणात भरावे आणि बीमवर येणारे वजन एका बाजूस येईल हे टाळावे.
गोदामाच्या प्लॅन आणि एस्टिमेटमधील नकाशामध्ये दाखविल्याप्रमाणे स्लॅबची जाडी ठरवावी. जितकी जाडी स्लॅबची हवी असेल तिथे प्रत्येक ठिकाणी रंगाने मार्किंग करावे, मोजायच्या मापकाने सरळ कडा तपासून पहाव्यात. जर शक्य असेल तर संपूर्ण स्लॅब न थांबता एकाचवेळी भरून घ्यावा.
काँक्रीट मिक्सरची छायाचित्रे आपल्या बिलाबरोबर जमा करावीत. गरजेची असणारी यांत्रिकी मिक्सरचे मिश्रण कंपन मशिनद्वारे दबाई आणि पाणी मारणे यांची छायाचित्रे त्यांच्या प्रत्येक देयकासोबत प्रकल्पाकडे सादर करावीत.
दगडी बांधकाम
गोदामाची इमारत किंवा पायाचे दगडी बांधकाम करताना त्यात पोकळी राहणार नाही याची खास काळजी घ्यावी. सिमेंट, वाळूचे लागणारे मिश्रण संपूर्ण बांधकामाच्या ०.४६ घनमीटर ते ०.४८ घनमीटर इतके असावे. बाहेरच्या भिंतीच्या बाहेरील बाजूच्या सांध्याचे १:३ प्रमाणात सिमेंट वाळू मिश्रणाने पॉइंटिंग करावे. ते जमिनीच्या भूभागाच्या खाली १५ सेंटिमीटरपर्यंत करावे. तसेच १:६ अशा प्रमाणात सिमेंट,वाळूचे मिश्रण करावे. भिंतीच्या कोपऱ्यांभोवती प्लॅस्टर करून घ्यावे. भिंतीचे कोपरे गोल करावे.
बांधकामासाठी दगड तळाच्या दगड खाणीतून घ्यावा. नंतर दगडाचे केवळ दुबळे कोपरे हातोडीने काढावेत. गोदाम इमारतीच्या समोरच्या बाजूला लावण्यासाठी दिसणारे दगड खाणीतून निवडताना त्याचा एकसारखा रंग व त्याच्या सर्व बाजू या गोष्टींकडे लक्ष द्यावे. एका दिवसात ६० सेंमी इतकेच दगडी बांधकाम पूर्ण करावे. प्रत्येक अर्ध्या चौरस मीटरवर एक आरपार दगड लावावा किंवा मोठ्या प्रमाणात सरळ दिसणारे दगड एक मीटर रुंदी आणि वर उभा अग्रभागी ४५ सेंटिमीटर लांब अशा पद्धतीने प्रत्येक चौरस मीटरसाठी लावण्यात यावा.
वीट बांधकाम
बांधकाम करताना द्वितीय दर्जाच्या विटांचा वापर करावा. मधल्या सांध्याची जाडी १२ मिलिमीटर पारंपरिक विटांसाठी आणि १० मिलिमीटर आयएसएस प्रकारच्या विटांसाठी असावी. बांधकामासाठी इंग्लिश बॉण्ड किंवा प्रमाणित असलेला दुसरा असा जोड वापरावा. वीट वापराच्या आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावी. विटेवरती असणारा छापा नेहमी वरच्या बाजूस असावा. सिमेंट आणि वाळू यांच्या मिश्रणाचे प्रमाण १:६ इतके असावे. मोकळ्या दिसणाऱ्या विटांची बाजू ही स्वच्छ असावी.
सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण ओले असतानाच बांधकामाचे त्याच्या जाडीइतके सांधे काढून टाकावेत. कट केलेले सांधे स्वच्छ करून त्यातून मिळालेले सुटे कण ओले करून १:६ या मिश्रणात फावड्याने मिसळून घ्यावेत. बांधकामाला १४ दिवस पाणी मारावे. साधारण वीट वापरताना ती आयएसएस प्रमाणित (२३ × १० × ७.५) सेंटिमीटर या मापाची वापरावी. वेगळी असेल तर ती अभियंत्याच्या परवानगीने वापरावी. एका संपूर्ण कामासाठी एकाच मापाच्या विटांचा वापर करावा. शक्य असेल तेवढ्या एकसारख्या विटांचा वापर करावा.
विटांची तपासणी करताना त्या विटेच्या कोरड्या वजनापेक्षा २२ टक्के इतके विटेचे भिजवलेल्या स्वरूपातील वजन असावे, परंतु शक्यतो यापेक्षा ते जास्त नसावे. आयएसएस नं. १०७७-१९७० याच्या आधारे कोरड्या अवस्थेत विटेची तुटण्याची क्षमता ३९.३३ कि.ग्रॅम प्रति चौ.मी. यापेक्षा कमी नसावी आणि भिजवल्यानंतर २९.०७ कि.ग्रॅम प्रति चौ.मी. यापेक्षा कमी नसावी.
गिलावा
सिमेंट आणि वाळू यांच्या मिश्रणाचे प्रमाण १:४ इतके असावे. सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण १२ मिलिमीटर जाडीचे कट केलेल्या सांध्यात भरावे. प्रत्येक कोपरा आणि कोन हा ओळंब्यात असला पाहिजे.गिलावा सुकून मजबूत झाल्यावर त्यावर पाणी मारण्यास सुरवात करावी, तोडफोड टाळावी. जास्तीत जास्त प्रमाणात गिलावा केलेला भाग ओला ठेवावा. गिलावा करण्यापूर्वी बांधकाम पूर्ण भिजलेले असावे.
गोदामाला रंगकाम करणे हा गोदाम निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असून गोदामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोदामाला योग्य रंग योग्य पद्धतीने लावणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
पांढऱ्या चुन्याचा वापर
चुना हा जळालेल्या पांढऱ्या रंगाच्या चुनखडीपासून तयार केलेला असावा. चुना हा गरजेप्रमाणे पाणी मिसळून त्यात विरघळून घ्यावा (प्रत्येक १ किलो चुन्यासाठी ४ ते ५ लिटर पाणी वापरावे.) पूर्ण भिंतीवर काळजीपूर्वक केलेले मिश्रण घट्ट अशा पातळ क्रीमसारखे होते. स्वच्छ गरम पाण्यात मिसळून तो सोयीचे असलेल्या प्रमाणात २ ग्रॅम अरॉबिकचे मिश्रण १ लिटर चुन्यामध्ये मिसळावे.
रंग देण्याच्या पृष्ठभागावरच्या सर्व पडलेल्या सिमेंट, वाळू मिश्रणाचे कण आणि नको असलेले पदार्थ वायर असलेल्या ब्रशने काढून टाकावेत. २० मिलिमीटर जाडीच्या रंगाचे दोन थर देणे आवश्यक असून, पहिला ब्रशच्या थराचा हात वरपासून ते खाली आणि दुसरा खालपासून ते वर असा देण्यात यावा. पहिल्या थराच्या हातावर दुसऱ्या थराचा हात व तिसऱ्या थराचा हात हे पहिले दोन हात सुकण्यापूर्वीच मारावेत. रंग दिलेल्या पृष्ठभागावर कपडा किंवा हात लावू नये. शक्यतो वॉटर प्रूफिंगचा बिटूमीनस पेंटचा वापर करण्यात यावा.
सिमेंट रंग
जलरोधक सिमेंट रंग हा प्रमाणित उत्पादकाचा असावा. त्याचा रंग व पोत इंजिनिअरने दिलेल्या मंजुरीप्रमाणे असावा. गोदामाच्या भिंतीला रंग देण्यापूर्वी भिंतीचा पृष्ठभाग हा धुळीपासून स्वच्छ केलेला असावा. तो ब्रश आणि पाण्याने धुऊन स्वच्छ केलेला असावा.
कोरडा सिमेंट रंग हा काळजीपूर्वक स्वच्छ पाण्यात मिसळावा. आवश्यकतेप्रमाणे घट्ट करावा. रंगकाम करण्यासाठी ब्रशचा वापर करावा. नवीन रंग केलेला पृष्ठभाग किमान दोन दिवसांकरिता ओलसर ठेवावा आणि त्याचे सरळ येणाऱ्या सूर्यकिरणांपासून रक्षण करावे. रंग दिलेल्या पृष्ठभागावर कपडा किंवा हात लावू नये. रंग ओलसर राहण्यासाठी त्यावर पाण्याचा वापर करावा.
प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.