Summer Groundnut : नियोजन उन्हाळी भुईमूग लागवडीचे..

Summer Groundnut Cultivation : भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. पेरणीसाठी भुईमुगाच्या लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या या प्रकारांतील वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.
Summer Groundnut
Summer GroundnutAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

भुईमूग हे तेलबियावर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. भुईमूग पिकाची तीनही हंगामांमध्ये लागवड करता येते. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले, तरी उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी प्रमाणात उद्‍भवते. ओलिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी इत्यादी आंतरपिके किंवा मिश्रपीक म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस इतके आवश्यक असते. उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते. त्याचा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

जमीन ः

- मध्यम प्रकारची भुसभुशीत, चुना (कॅल्शिअम) व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण योग्य असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी.

- जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ इतका असावा.

पूर्वमशागत ः

- जमिनीची १२ ते १५ सेंमी खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात.

- नांगरणी केल्यानंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी अगोदर हेक्टरी १० ते १५ टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.

Summer Groundnut
Groundnut Crop : उन्हाळी हंगामासाठी भुईमूग वाण अन् वैशिष्ट्ये

प्रकार ः

भुईमुगाच्या लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रमुख प्रकार आहेत.

उपट्या (हळवे) ः

- तीन ते चार महिन्यांत तयार होणारे.

- झाडे सरळ वाढतात. शेंगा झाडाच्या बुंध्यापाशी झुपक्यात थरतात.

पसरे आणि निमपसरे (गरवे) ः

- चार ते सहा महिन्यांत तयार होणारे.

- झाडांच्या फांद्या जमिनीच्या कमी जास्त प्रमाणात पसरत जातात. त्यांना जागोजाग जमिनीत शेंगा धरतात.

Summer Groundnut
Summer Groundnut Verity : उन्हाळी भुईमुगासाठी निवडा सुधारित वाण

बीजप्रक्रिया ः

- बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.

- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम चोळावे. त्यानंतर रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम याप्रमाणे चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.

पेरणी ः

- उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.

- पेरणीपूर्वी जमीन ओलवून नंतर वाफशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी.

- टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागते व उगवण

चांगली होते.

- पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंमी व दोन झाडांमधील अंतर १० सेंमी ठेवावे.

- लागवड इक्रिसॅट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी.

बियाणे प्रमाण ः

- छोट्या आकाराचे दाणे असणाऱ्या जातींसाठी १०० किलो, मध्यम आकाराचे १२५ किलो तसेच टपोरे दाणे असणाऱ्या जातींसाठी १२५ किलो बियाणे वापरावे.

लागवडीसाठी वाण ः

वाण---प्रकार---पक्व होण्यास लागणारा कालावधी (दिवस)---सरासरी उत्पादन (किं/ हे.)---शिफारस

एस.बी.-११---उपट्या---खरीप, उन्हाळी---१०५ ते ११०, ११५ ते १२०---१२ ते १५, १५ ते २०---संपूर्ण महाराष्ट्रासाठी

जे. एल.-२४ (फुले प्रगती)---उपट्या---खरीप---९९ ते १०४---१८ ते २०---संपूर्ण महाराष्ट्रासाठी

टी. अे. जी.-२४---उपट्या---खरीप/ उन्हाळी---१०० ते १०५, ११० ते ११५---२० ते २५, २५ ते ३०---संपूर्ण महाराष्ट्रासाठी

टी. पी. जी.-४९---उपट्या---रब्बी/उन्हाळी---१२५ ते १३०---२५ ते ३०---जाड दाण्याची, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी, जळगाव, धुळे, व अकोला जिल्ह्यांकरिता.

टी. जी. -२६---उपट्या---खरीप/उन्हाळी---९५ ते १००, ११० ते ११५---१५ ते १६, २५ ते ३०---संपूर्ण महाराष्ट्रासाठी

जे.एल. ५०१---उपट्या---खरीप/उन्हाळी---९९ ते १०४, ११० ते ११५---१६ ते १८, ३० ते ३२---म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे

फुले ६०२१ (आर एआरजी- ६०२१)---निमपसरी---उन्हाळी---१२० ते १२५---३५ ते ४०---पश्‍चिम महाराष्ट्रासाठी

फुले उन्नती---उपट्या---खरीप/उन्हाळी---११० ते ११५, १२० ते १२८---२५ ते ३०, ३५ ते ४०---संपूर्ण महाराष्ट्रासाठी

जे. एल. ७७६ (फुले भारती)---उपट्या---खरीप/ उन्हाळी---११५ ते १२०---३० ते ३५---उत्तर महाराष्ट्रासाठी

केडीजी- १६० (फुले चैतन्य)---उपट्या---उन्हाळी---१०५ ते ११०---२० ते २४---आंध्र प्रदेश, तेलगंणा, तमिळनाडू

खतमात्रा ः

- पूर्वमशागतीवेळी शेवटच्या कुळवणीअगोदर हेक्टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून द्यावे.

- पेरणीवेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खते द्यावीत.

- अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांच्या मात्रेसोबत,

जिप्सम ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो व आऱ्या सुटताना २०० किलो) प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे.

- आऱ्या सुटण्याच्या अगोदर युरियाची मात्रा देऊ नये.

आंतरमशागत ः

- पीक २० दिवसांचे झाल्यावर फुले येईपर्यंत एक खुरपणी व दोन कोळपण्या करून पीक तणविरहित ठेवावे.

- आऱ्या निघाल्यानंतर कोणतीही आंतरमशागतीची कामे करू नयेत. आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी एक मोठा रिकामा ड्रम पिकावरून फिरवावा. त्यामुळे आऱ्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.

आंतरपीक पद्धती ः

- भुईमुगाचे पीक हे कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू, राजमा व भात अशा विविध खरीप व रब्बी पिकांच्या फेरपालटीत घेता येते. बाजरी, मूग, चवळी, तीळ, सूर्यफूल इत्यादी पिकांमध्ये आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणूनही घेता येते.

- सुरू उसात आंतरपीक म्हणून उपट्या भुईमूग वाणाची लागवड करावी. यासाठी ९० सेंमी अंतरावर सरी पाडून त्यात उसाची लागवड करावी. त्यानंतर एका आठवड्याने १० सेंमी अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूंस भुईमुगाची लागवड करावी.

पाणी व्यवस्थापन ः

- उगवण चांगली होण्यासाठी पेरणीनंतर ३ ते ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे.

- जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १० दिवसांनी पाण्याच्या १० ते १२ पाळ्या द्याव्यात.

- भुईमूग पिकांस तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करणे फायदेशीर ठरते.

- पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण देणे अत्यंत आवश्यक आहे.

- पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ओलावा असणे फार महत्त्वाचे आहे.

वाढीच्या संवेदनशील अवस्था ः

संवेदनशील अवस्था---दिवस

फुले येण्याची अवस्था---पेरणीनंतर २५ ते ३० दिवस

आऱ्या सुटण्याची अवस्था---पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवस

शेंगा पोसण्याची अवस्था---पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस

---------------------------------------------------

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद् शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com