Agriculture Management : तुरीसोबत आंतरपिकांचे नियोजन

Intercropping Management : कमी पाण्यात, कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात तूर किंवा तूर + आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Tur Crop
Tur Crop Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. सचिन सदाफळ

अवर्षणप्रवण भागातील कोरडवाहू क्षेत्रात बाजरी, सूर्यफूल, तूर, उडीद मूग, हुलगा, मटकी इत्यादी महत्त्वाची खरीप पिके आहेत. अति उथळ जमिनीवर हुलगा किंवा मटकी आणि उथळ जमिनीत बाजरी किंवा सूर्यफूल + तूर (२:१) ओळी या प्रमाणात आंतरपिकांची लागवड करावी. कमी पाण्यात, कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात तूर किंवा तूर + आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरते. त्याच बरोबरीने जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

पट्टा पद्धतीत तूर पेरणी केल्यानंतर जोड ओळीतील प्रत्येक तुरीच्या झाडास भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा मिळते. फुलांचे शेगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे उत्पादकतेत वाढ होते. तुरीच्या पिकातून जमिनीवर पडणाऱ्या पालापाचोळ्याचे सेंद्रिय खत होते.

या खतामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एकरी अर्धा टन सेंद्रिय खत जमिनीत मिसळले जाते. तूर पिकामुळे पुढील पिकास एकरी ५० ते ८० किलो नत्र मिळते. तुरीच्या वाढीच्या काळात जमिनीवर पालापाचोळयाचे आच्छादन तयार होते, त्यामुळे जमिनीतील ओलाव्यावर येणाऱ्या लव्हाळा व इतर तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

Tur Crop
Sugarcane Intercropping : उसात कोणते आंतरपीक जास्त फायदेशीर?

१) पारंपरिक पद्धतीत तुरीच्या दोन ओळींतील अंतर दोन ते अडीच फूट ठेवतात. मात्र यामुळे फवारणी करण्यात अनेक अडचणी येतात. तुरीच्या दोन ओळींत ९० सेंमी अंतर आणि १८० सेंमी. पट्टा आणि परत ९० सेंमी. अंतराच्या तुरीच्या जोडओळ लागवडीच्या प्रयोगातून उत्पादकता वाढविण्याबरोबरच आंतरपिकांचा लाभ मिळवता येतो. तुरीच्या दोन ओळींत जी सरी पडली जाईल, त्यामध्ये पावसाचे पाणी मुरेल. या ओलाव्याचा तुरीला लाभ होईल. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जातात,त्यामुळे जमीन भुसभुशीत पोकळ होते.

२) सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामध्ये अनेक वर्षांच्या प्रयोगातून फायदेशीर असणारी बाजरी+ तूर (२:१) किंवा सूर्यफूल+ तूर (२:१) या आंतरपीक पद्धतीमुळे अनुक्रमे ७० आणि ८४ टक्के उत्पादनात वाढ झाली आहे.

३) भिन्न कालावधी,भिन्न मूळ रचना असणारी पिके निवडली तर ती एकमेकांबरोबर अनिष्ट स्पर्धा न् करता पूरक ठरतात. उदा. बाजरी + तूर (२:१) किंवा सूर्यफूल + तूर ( २:१ ) आंतरपिकातील बाजरी व सूर्यफुलाचा कालावधी ८० ते ९० दिवसांचा असतो. तर तुरीच्या जातीनुसार हा कालावधी १२५ ते १६० दिवसांचा असतो.

४) बाजरी किंवा सूर्यफूल काढल्यानंतर राहिलेल्या कालावधीतील पाऊस,सूर्यप्रकाश, जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्ये आणि जागेचा तुरीच्या वाढीस उपयोग होतो.

५) बाजरी/सूर्यफुलाची मुळे तंतुमय असल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील ओलावा,अन्नद्रव्यांचे शोषण होते. तुरीचे सोटमूळ असल्यामुळे जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये आणि ओलाव्याचे शोषण होते.त्यामुळे ती एकमेकांस पूरक ठरतात. तुरीच्या मुळावरील गाठीत रायझोबियम जिवाणू असतात. ते हवेतील नत्र शोषून जमिनीत गाडतात आणि पुढील पिकास उपलब्ध करून देतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

६) तूर तयार होतेवेळी निम्मा पाला जमिनीवर पडतो. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून पोत सुधारतो. द्विदल पिकांचा समावेश आंतरपीक पद्धतीत केल्यास जमिनीची सुपीकता व पोत टिकून राहते.

७) आंतरपिकांसाठी तुरीच्या मध्यम मुदतीच्या जाती असाव्यात. अलीकडच्या काळात तूर + सोयाबीन (१:३ किंवा १:४) पद्धतीने पेरल्यास दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येते. सोयाबीनच्या ओळीमध्ये ३० सेंमी आणि दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवावे. सोयाबीनच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. तुरीच्या दोन ओळींतील अंतर १२० सेंमी येते. तुरीच्या दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. प्रति हेक्टरी ६० ते ६५ किलो सोयाबीन बियाणे आणि ५ किलो तुरीचे बियाणे पुरेसे होते.

Tur Crop
Tur Crop : तूर पिकाचा पीक पद्धतीत समावेश असावा

८) आंतरपीक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखाली अधिक क्षेत्र आणता येते आणि उत्पादनात स्थिरता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपीक पद्धतीत दोन पिके असली तरी मुख्य एका पिकासाठी खत देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकांस उपयुक्त ठरते.

९) बाजरी + तूर किंवा सूर्यफूल + तूर या आंतरपीक पद्धतीत बाजरी/सूर्यफूल काढल्यानंतर मशागत करणे महत्त्वाचे असते. कारण मुख्य पीक निघाल्यानंतर, दुसऱ्या पिकांकरिता ओल टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्याकरिता पीक काढल्याबरोबर कुळव चालवून तण व धसकटे उपटून काढून तेथेच वाळू द्यावीत.

आंतरपीक पद्धतीचे फायदे ः

- वर्षात दोन/ तीन पिके घेता येतात.

- जमिनीस कमी मशागत लागते.

- पाऊस, सूर्यप्रकाश कालावधीचा उपयोग करता येतो.

- जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्ये आणि जागा यांचा पुरेपूर उपयोग होतो.

- जमिनीची सुपीकता सुधारते. हेक्टरी अधिक उत्पादन होते.

- विपरीत व प्रतिकूल हंगामात एखादे तरी पीक हाती येते.

- एकूण मशागत खर्च कमी हेक्टरी नफ्याचे प्रमाण अधिक वाढते.

चौकट ः अवर्षण क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची आंतरपिके

पावसाचे आगमन आठवडा---आंतरपिके

१) जुलै पहिला आठवडा ---बाजरी + तूर (२:१), सूर्यफूल+ तूर (२:१), गवार+ तूर (२:१), गवार + एरंडी (२;१)

२) जुलै दुसरा आठवडा ---सूर्यफूल+ तूर (२:१ ), गवार+ तूर (२:१ )

३) ऑगस्ट पहिला आठवडा ---सूर्यफूल+ तूर (२:१), एरंडी+ दोडका (मिश्र पीक), सूर्यफूल+ तूर (२:१)

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com