Agriculture Warehouse : गोदाम उभारणीपुर्वी नियोजन आवश्यक

Warehouse Construction : नव्याने गोदाम उभारणी करण्यापूर्वी आपली संस्था आणि गावाच्या परिसरात उपलब्ध गोदाम सुविधेचा सर्वप्रथम उपयोग शेतकरी कंपनी किंवा सहकारी संस्थांनी करावा. जर जवळपास एखादे खासगी किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसेल किंवा उपलब्ध असेल परंतु ते भरलेले असेल तरच नवीन गोदाम उभारणीचा विचार करावा.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse News : शेतकरी कंपन्यांनी व्यवसाय उभारणी करताना निव्वळ कृषी पायाभूत सुविधा उभारणी करणे अपेक्षित नसून शासनाच्या कृषी पायाभूत सुविधांचा सुद्धा तितकाच उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्थांना व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने मार्गदर्शन करीत आहे. त्याचा अनेक संस्थांना फायदा होत आहे.

परंतु गोदाम व्यवसाय सुरू करताना समुदाय आधारित संस्था महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत उभारणी करण्यात आलेल्या गोदाम व्यवस्थेचा फारच कमी उपयोग करून घेत असून हे प्रमाण अत्यंत असमाधानकारक आहे.

विविध योजनांच्या माध्यमातून या संस्था मोठा खर्च करून गोदाम उभारणी करतात आणि नाफेड खरेदी साठी गोदामाचा वापर करतात, परंतु हा कालावधी अत्यंत कमी असल्याने संपूर्ण वर्षभर या गोदामांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.

काही संस्था बीजोत्पादन करीत असून नाफेड व बीजोत्पादन या माध्यमातून गोदाम काही प्रमाणात शेतीमालाने भरल्याने त्यातून काही उत्पन्न शेतकरी कंपनीस मिळत आहे.

त्यामुळे अशा संस्थांची गोदामे वर्षातील किमान नऊ महिने उपयोगात येत असून इतर संस्था मात्र त्यांचे गोदाम तीन महिने उपयोगात आणून उत्पन्न प्राप्त करीत आहे, परंतु हे पुरेसे नाही. त्याचप्रमाणे गोदाम भाड्याने देण्यापेक्षा त्यात व्यवसाय करणे केव्हाही नफ्यात नेणारे असेल.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : लक्षात घ्या गोदाम योजनेचे फायदे...

- नाफेडच्या खरेदीचा व्यवसाय उभारणीसाठी उपाय केला तर तो उपाय पूर्ण भरवशाचा नाही, हे प्रत्येक संस्थेला लक्षात आले आहे, परंतु मागील तीन ते पाच वर्षात प्रत्येक वर्षी दोन्ही हंगाम मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपये उशिरा का होईना मिळाल्याने हा व्यवसाय बऱ्याच शेतकरी कंपन्यांना सोडावासा वाटत नाही.

परंतु नाफेडचा व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. दोन दोन वर्ष शेतमाल संकलनाचे कमिशन शेतकरी कंपन्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. यातील रक्कमही थोडी थोडकी नसून कंपनीच्या ऐपतीनुसार हा आकडा २ लाखांपासून ३० लाखांपर्यंत असल्याचे दिसून येईल.

तरीही काही कंपन्या समाधानी आहेत, तर काही असमाधानी आहेत. याला विविध कारणे आहेत, परंतु नाफेड खरेदीमुळे राज्यात बऱ्याच शेतकरी कंपन्यांची निर्मिती झाली, हे कंपनी निर्मितीचे दुसरे कारण आहे.

- या पूर्वी शेतकरी कंपनी तयार होण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (२०१०-२०१९) हाच प्रकल्प प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे. नाफेडचे कामकाज करण्यात सुरवातीला दोन फेडरेशन होते.

आता या यादीत आणखी सहा संस्थांची भर पडली आहे. यामुळे आता ३ ऐवजी आता आठ मुख्य संस्थांनी नाफेड खरेदी केंद्राचे काम घेतल्याने आता या क्षेत्रातही खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेमुळे चालू वर्षी ,तर मागील दोन वर्षात ज्या संस्थांकडे नाफेड खरेदी केंद्र होते, अशा काही संस्थांना हे काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांची फार मोठी निराशा झाली.

- मागील दोन वर्षातील अर्थसंकल्पात नाफेडची तरतूद २०२१-२२ या आर्थिक वर्षात २,२६८ कोटी रुपये होती तर तीच तरतूद २०२२-२३ मध्ये १,५०० कोटी रुपये करण्यात आली. परंतु चालू आर्थिक वर्षात ही तरतूद अत्यंत नगण्य आहे. थोडक्यात नाफेड सारखे पर्याय हाताळताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे शेतकरी कंपन्या व सहकारी संस्था यांनी बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- गोदामासारखी कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध असो किंवा नसो कृषी विक्री व्यवसायात उतरणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच नव्याने गोदाम उभारणी करण्यापूर्वी आपल्या संस्था आणि गावाच्यापरिसरात उपलब्ध गोदाम सुविधेचा सर्वप्रथम उपयोग शेतकरी कंपनी किंवा सहकारी संस्थांनी करावा.

समजा जर जवळपास एखादे खासगी किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसेल अथवा उपलब्ध असेल परंतु ते भरलेले असेल तर मगच नवीन गोदाम उभारणीचा विचार करणे आवश्यक आहे.

- गोदामांची सुविधा

गोदाम उभारणी करण्यापूर्वी शेतकरी कंपनीकडे स्वत:चे भांडवल असेल तर प्रथम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम अथवा गोदामातील जागा आवश्यकतेनुसार भाड्याने घेऊन कृषी व्यवसाय सुरवात करण्याचा अत्यंत उत्तम पर्याय हाती घेण्यास प्राधान्य द्यावे. गोदामातील अंतर्गत जागा आवश्यकतेनुसार भाड्याने घेऊन वर्षातून कितीही वेळा शेतमाल गोदामात ठेवता येतो व बाहेर काढता येतो.

अल्प दरामध्ये गोदाम उभारणी न करता आपल्या स्वत:च्या गोदामाप्रमाणेच या गोदाम व्यवस्थेचा उपयोग करता येऊ शकतो. याकरिता नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या केंद्रप्रमुखांना भेटून संपूर्ण माहिती घेता येते.

याबाबत सर्व केंद्र प्रमुखांचे संपर्क क्रमांक वखार महामंडळाचे संकेतस्थळ www.mswarehosuing.com वर उपलब्ध आहेत. वखार महामंडळाच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारचे दर उपलब्ध असून महामंडळाच्या गोदामांची नोंदणीसुद्धा करण्यात आले आहे. गोदामाचे ठिकाण पहायचे असेल व त्यात किती व कोणता माल साठविला आहे हे समजून घ्यायचे असेल तर तशी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Agriculture Warehouse
Warehouse Scheme : गोदाम योजनेत सोसायट्या, ग्रामपंचायतींचा समावेश

‘वखार आपल्या दारी‘ उपक्रम

वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांनी शेतीमाल साठवणूक करावी यासाठी राज्यात सुमारे २३ ठिकाणी सर्वच धान्य उत्पादक जिल्ह्यांमध्ये ‘वखार आपल्या दारी‘ मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या.

यात सुमारे ५,००० महिला व पुरुष शेतकरी वर्गाने सहभाग घेतला होता. महिला बचत गटांनी पहिल्यांदा गोदामाची पायरी चढली असावी. परंतु या ५,००० सहभागी शेतकरी वर्गापैकी सुमारे १,००० महिला शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाल्याने या पुढील काळात गोदामात धान्य साठवणुकीसाठी महिलांमार्फत पुढाकार घेण्यात येईल, असे चित्र लवकरच निर्माण होईल.

संपर्क - प्रशांत चासकर,९९७०३६४१३०

(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ , प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com