
Jalgaon News : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढून २००० हेक्टरवर होऊ शकते. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे १५०० हेक्टरपर्यंत होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी शेतकरी बियाणे खर्च कमी करण्यासाठी घरातील प्रक्रिया केलेले बियाणे वापरतील. तसेच काळ्या कसदार जमिनीत पुढील महिन्यात पेरणी गती घेईल, अशी स्थिती आहे.
बाजारात रब्बी किंवा उन्हाळ हंगामासाठी सोयाबीन बियाणे फारसे नाही. परंतु काही कंपन्यांनी हे बियाणे पुरविण्याचे नियोजन केले आहे. काही भागात आगाप उन्हाळ सोयाबीन पेरणी झाल्याची माहिती आहे. परंतु ही पेरणी अल्प आहे. धुळे व नंदुरबारमध्ये रब्बी सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही.
या भागात कृत्रीम जलसाठाधारक सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती देतात. थंडी अधिक पडेल व सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी भीती काही शेतकऱ्यांना आहे. परंतु प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी सोयाबीनचे चांगले उत्पादन रब्बीत घेत आहेत. नंदुरबार, धुळ्यातील पेरणी स्थिर राहील, असेही संकेत आहेत.
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी डिसेंबरमध्येच सुरू होणार आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात येईल, असे दिसत आहे. पाण्याची अडचण नसल्याने पेरणी वाढणार आहे. इतर पिकांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याचे नियोजन केले आहे.
सोयाबीनचे दर यंदा खरिपात अस्थिर आहेत. परंतु सोयाबीन उत्पादन कमी होईल. कारण पावसात पीकहानी झाली आहे. किमान ३२०० व कमाल ४३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या आहे. नंतरही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
या महिन्यात दरात सुधारणा झाली आहे. दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे. सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारमध्ये वाढण्याची शक्यता आहे. कारण सर्वच प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे.
काळ्या कसदार जमिनीत पेरणी
सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत होणार आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीन रावेर भागात कमी असतो. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात उन्हाळ सोयाबीन पीक असणार आहे.
पेरणी डिसेंबरच्या सुरुवातीलाच अनेकांनी करण्यासाठी नियोजन केले आहे. आपल्याकडील बियाण्यांची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणीचे नियोजनही अनेकांनी केले आहे. यामुळे बियाण्यांवरील मोठा खर्च शेतकऱ्यांचा कमी होईल, अशी स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.